सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण, कार्यक्षम फवारणी यंत्र

सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण, कार्यक्षम फवारणी यंत्र
सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण, कार्यक्षम फवारणी यंत्र

नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी राज्यात अग्रेसर आहे. कोणतेही परदेशातील यंत्र, तंत्र वापरण्यात येथील शेतकरी मागे नाहीत. मात्र, परदेशी यंत्राच्या तोडीचे किंबहुना त्याहून अधिक कार्यक्षम व नावीन्यपूर्ण यंत्राच्या निर्मितीतही ते मागे नाहीत. याचा परिचय येतो, तो सटाणा (जि. नाशिक) येथील राजेंद्र जाधव व त्यांच्या मुलांनी तयार केलेल्या फवारणी यंत्रातून. रॅडियल पद्धतीचे दुहेरी पंखे असलेल्या अभिनव व स्वस्त यंत्रामुळे फवारणीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. साधारणपणे ५५ वर्षांपूर्वी सटाणा येथील पणजोबा काळू नारायण जाधव यांनी सुरू केलेल्या अवजारे निर्मिती व्यवसायामध्ये आजोबा छबुलाल यांनी लक्ष घातले. परिस्थिती यथातथाच असल्याने वडील राजेंद्र जाधव यांनाही शिक्षण सुरू असतानाच वर्कशॉपमध्ये काम करावे लागे. परिणामी, राजेंद्र यांचे शिक्षण केवळ १० वीपर्यंत होऊ शकले, तरी त्यांचे गणित एकदम पक्के आहे. आज त्यांची चौथी पिढीतील दोन्ही मुले मंगेश (शिक्षण - मेकॅनिकल पॉलिटेक्निक), धनंजय (शिक्षण - आयटीआय, पदवी) शिक्षित असून, याच व्यवसायात उतरली आहेत. राजेंद्र यांनी सन १९८८ मध्येच ब्लोअर तयार केला होता. जाधव कुटुंबीय शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पलटी नांगर, टिलर, केनी, बेड यंत्र, सारा यंत्र, मका नांगर अशा अनेक लहान व मोठ्या ट्रॅक्‍टरला जोडली जाणारी अवजारे, ट्रेलर तयार करून देत. मागील बावीस वर्षांपासून ते नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष देऊ लागले. गेल्या दशकामध्ये आयात झालेल्या विविध फवारणी यंत्रांनी त्यांचे लक्ष वेधले नसते, तरच नवल! द्राक्ष शेतीमध्ये अत्याधुनिक फवारणी यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने कमी वेळेत, कमी श्रमात फवारणी शक्‍य झाली. परदेशातील आयात तंत्रज्ञानावर आधारित विकसित किंवा आयात केलेली ही यंत्रे अत्यंत महागडी असून, बहुतांश यंत्रे २४ व त्यापेक्षा अधिक एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरवर चालतात. म्हणजे शेतकऱ्याला फवारणी यंत्र आणि ट्रॅक्टर अशी दुहेरी १२ ते १३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. परिणामी, ती सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच राहिली आहेत. ही बाब जाधव यांनी हेरली. सन २००० पासून वर्कशॉपमध्ये प्रयत्न सुरू झाले. यंत्राचे प्रारूप तयार करायचे, त्याच्या स्वत:च्या शेतीत व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात चाचण्या घ्यायच्या. त्यात आढळणाऱ्या त्रुटी कमी करायच्या, असे काम सतत सुरू राहिले. यातून १५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्‍टरलाही उत्तम परफॉर्मन्स देणारे फवारणी यंत्र विकसित करण्यात यश मिळवले आहे. कल्पकता, जिद्द या जोरावर सामान्य शेतकरीही उच्च दर्जाचे यंत्र किंवा तंत्रज्ञान आपल्या शिवारात तयार करू शकतो, हेच यातून दिसून येते. फवारणी तंत्रज्ञानातील नेमका फरक जाणून घेऊ. ६०० लिटर क्षमतेचे दुहेरी रॅडियल फॅन फवारणी यंत्र अन्य यंत्राप्रमाणेच दिसत असले, तरी अंतर्गत रचना, ऊर्जा, कार्यक्षमता, अचूकता, थेंबाचा आकार व त्यातील समानता या बाबतीतील अधिक सरस असल्याचा दावा धनंजय जाधव यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार...

सिंगल ॲक्सल फॅन आधारित तंत्रज्ञान डबल रॅडियल फॅन आधारित तंत्रज्ञान
१. यात एका ॲक्सलवर फिरणारा एक पंखा आहे. बाहेरून हवा खेचली जाते. असून, त्यातून सेंट्रीफ्युगल फोर्सने पाणी विशिष्ट तंत्राने बाहेर फेकले जाते. अ) यामुळे नोझल दोन्ही बाजूने दिले असले, तरी दोहोंतील कार्यक्षमतेमध्ये फरक राहतो. ब) फवारणीतील थेंबाचा (ड्रॉपलेट) आकारामध्ये फरक पडतो. क) बाह्य वातावरणातील हवेच्या विरोधामुळे परिणाम होतो. १. यात दोन ॲक्सलवर फिरणारे दोन रॅडियल प्रकारचे विरुद्ध बाजूने (घड्याळाच्या दिशेने व विरुद्ध) फिरणारे पंखे आहेत. त्यामुळे बाहेरील हवा अधिक खेचली जाऊन दोन्ही भिन्न बाजूने फेकली जाते. अ) दोन्ही बाजूच्या नोझलची कार्यक्षमता समान राहते. ब) फवारणीतील थेंबाचा आकार एकसारखा राहतो. क) दोन फॅनमुळे बाह्य वातावरणाचा परिणाम कमी राहतो.  
२. यात ऊर्जेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. हा पंखा २७०० फेरे प्रतिमिनिट वेगाने फिरवावा लागतो. यातून ३२ मीटर प्रतिसेकंद वेगाने हवा बाहेर फेकली जाते. २. यात ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर होत असल्याने दोन्ही पंखे केवळ १५०० फेरे प्रतिमिनिट वेगाने फिरवले जातात. यातूनही ३२ मीटर प्रतिसेकंद वेगाने हवा बाहेर फेकली जाते.
३. फवारणी यंत्र योग्य क्षमतेने चालवण्यासाठी २४ एचपी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर लागतो. फवारणी यंत्रासह ट्रॅक्टरसाठी गुंतवणूक १२ ते १३ लाख रुपये. ३. फवारणी यंत्रासाठी १५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टरही पुरेसा आहे. बेसिक फवारणी यंत्राची किंमत कमी असून, वेगळा ट्रॅक्टर घेण्याची गरज राहत नाही. अगदी ट्रॅक्टरसह फवारणी यंत्र यासाठी साधारणतः ८.५ लाखांपासून पुढे गुंतवणूक लागते.
४. यामध्ये नोझलची सेटिंग बदलण्यामध्ये अडचणी आहेत. ४. नोझलला हात न लावता झाडाची उंची व लागवडीची अवस्था यानुसार हवेच्या दाबावर सेटिंग करता येते. यामध्ये टोमॅटो, ऊस, द्राक्षे, डाळिंब, चिकू, संत्रा, लिंबूवर्गीय पिके, आंबा, पेरू, शेवगा अशा कमी अधिक उंचीच्या पिकांवर फवारणी करता येते.

विविध पिकांवर चाचण्या घेतल्या जाधव पिता-पुत्रांनी स्वत:च्या शेतातील पिकांबरोबरच सटाणा, देवळा, नाशिक भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात चाचण्या घेतल्या. सटाणा येथील राजेंद्र सोनवणे, मनोहर दगाजी देवरे, मुंजवाड येथील खुशाल जाधव, चौगाव येथील उमेश शेवाळे, तिळवणचे प्रा. शांताराम जाधव, वीरगाव येथील रवींद्र ठाकरे, भास्कर ठाकरे, किरण पाटील, जोरण येथील के. ए. सावकार या शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला पिकांवरील कीडरोग नियंत्रणासाठी या यंत्रांचा वापर केला आहे. त्यांच्या सूचना व संवादानुसार त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या. परिणामी, अंतिम टप्प्यात सादर केलेले यंत्र हे शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे उपयुक्त बनले असल्याचा दावा धनंजय यांनी केला. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी राष्ट्रीय स्तरावर दखल भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया’ या संस्थेतर्फे सन २०१८ मध्ये राजेंद्र जाधव यांना उत्कृष्ट नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, अभिनेता अक्षय कुमार हे प्रमुख अतिथी होते. या यंत्राच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. उत्पादनासाठी सी. के. एंटरप्रायझेस ॲण्ड ॲग्रो इक्विपमेंट्स लि. या नावाने स्टार्टअप कंपनीची स्थापना केली आहे.

संपर्क : धनंजय जाधव, ९६२३१२९५५८

शेतकऱ्यांशी सतत संवाद हेच संशोधनासाठी चालना देत असते. आमच्या वर्कशॉपमध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांचा सारखा राबता असतो. त्यांच्या सूचनांवर विचार केल्यानेच अवजारे व यंत्रांची उपयुक्तता वाढते. - राजेंद्र जाधव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com