देशी गायीच्या दुधाला मिळवले मार्केेट

गटाच्या या उपक्रमाला रायगड, पुणे तसेच अन्य भागांतील दीडशेहून अधिक शेतकरी व जर्मनी येथील तज्ज्ञांनी भेट देऊ कौतुक केले अाहे.
 लावंघर, जि. सातारा येथील गीर गायींचे संगोपन करणारे संत ज्ञानेश्वर गटाचे सदस्य
लावंघर, जि. सातारा येथील गीर गायींचे संगोपन करणारे संत ज्ञानेश्वर गटाचे सदस्य

देशी गायीच्या दुधाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील लावंघर येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत गीर गायींचे यशस्वी संगोपन केले आहेच; शिवाय एकत्रितरीत्या दुधाची पॅकिंगमधून विक्री सातारा शहरात करण्यास सुरवात केली आहे. ‘संत ज्ञानेश्वर’ या गटाने दुधासाठी सुमारे ५० ग्राहक तयार केले आहेत. याशिवाय गोमूत्र, तूपनिर्मितीही केली जात असून, त्यास चांगली बाजारपेठ तयार केली आहे. सातारा हा ऊस, आले, हळद या मुख्य पिकांसाठी प्रसिद्ध जिल्हा. अर्थात जिल्ह्याच्या विविध भागांत पाणी, हवामान यानुसार विविध पीकपद्धतीही पाहण्यास मिळते. सातारा तालुक्‍यातील लावंघर हे गाव उरमोडी धरणाच्या उत्तरेला असलेले छोटेसे गाव. पावसाळ्यात अतिपाऊस तर उन्हाळ्यात पाणीटंचाई अशी टोकाची परिस्थिती. याबरोबच जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने नोकरीच्या निमित्ताने अनेक जण मुंबईसारख्या महानगरात असतात. गीर गायींचे महत्त्व समजले सातारा शहरापासून सुमारे २० किलोमीटरवर लावंघर हे गाव आहे. गावातील सुमारे २० शेतकऱ्यांनी एकत्र येत संत ज्ञानेश्वर पुरुष शेतकरी बचत गट तयार केला आहे. गटाची ‘आत्मा’अंतर्गत नोंदणीही करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक उद्धव नाना पवार हे गटाचे सचिव आहेत. ‘आत्मा’ अायोजित सहलीतून एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कण्हेरी मठास भेट देण्याची संधी त्यांना मिळाली. त्या वेळी गीर जातीच्या गायी पाहण्यात आल्या. या गायींच्या दुधाची विक्री ७० रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जात असल्याचे त्यांना या वेळी समजले. त्यांचा या विषयातील रस अधिक वाढला. आपल्या गटातर्फे या गायींचे संगोपन करता येईल असे वाटले. देशी गाय संगोपनास सुरवात पवार यांनी देशी गायींच्या अनुषंगाने विविध माहिती संकलित करण्यास सुरवात केली. गटातील सदस्यांचाही पाठिंबा मिळाला. गटातील सदस्यांना घेऊन करमाळा, भवानीनगर येथील गीर गायी असलेले तांडे त्यांनी पाहिले. मिळणारे दूध, त्याचे दर, संगोपनाचा खर्च आदी बाबींचा अभ्यास केला. गटातील ११ सदस्यांनी मे २०१५ मध्ये भवानीनगर येथील तांड्यातून प्रत्येकी एकप्रमाणे ११ गायींची खरेदी १६ हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत केली. गटातील बहुतांशी सदस्यांचे पूर्वी गोठे होतेच. त्यामुळे संगोपनाची अडचण नव्हती. त्यामुळे कमी भांडवलात दुग्ध व्यवसाय सुरू झाला. दुधाचे मार्केट मिळवले संध्याकाळच्या वेळेस काढले जाणारे दूध शीतकरण अवस्थेत ठेवले (फ्रिज) जाते. सर्व सदस्यांकडील दुधाचे संकलन केले जाते. साधारण ४५ ते ५० लिटरपर्यंत एकूण संकलन होते. एक व अर्धा लिटर वजनामध्ये पॅकिंग केले जाते. सातारा शहरात गटातील शेतकऱ्यांनी आपल्या दुधाला मार्केट तयार करण्यास सुरवात केली आहे. सुमारे ५२ ग्राहकांना आज दुधाचे दररोज रतीब घातले जाते. त्यासाठी पगारावर तरुणांची नेमणूक केली आहे. सुमारे ७० रुपये प्रतिलिटर दराने दुधाची विक्री होत आहे. आता पूर्वीएवढ्याच कष्टात अधिक चांगला दर दुधाला मिळत असल्याने आत्मविश्‍वास वाढू लागला आहे. व्यवसायात वृद्धी गटातील सदस्यांना व्यवसायात मिळत असलेले उत्पन्न पाहून उर्वरित सदस्यही व्यवसाय करण्यास सकारात्मक झाले. सन २०१६ मध्ये गुजरातमधून आणखी दहा गायी आणल्या. टप्पाटप्प्याने गायींच्या संख्येत वाढ होत असून, आज गटाकडे लहान मोठ्या मिळून ३२ गायी आहेत. त्यातून गटातील सदस्यांना चांगले अर्थाजन मिळते आहे. दूध उत्पादनाची साखळी चांगल्या पद्धतीने सुरू राहावी यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

विक्रीसाठी केलेले प्रयत्न अर्थात दूध विक्रीपूर्वी गटाने मार्केटचा शोध घेण्यास सुरवात केली. प्रथम गीर गायीचे दूध किती प्रकारच्या व्याधींवर उपयोगी ठरू शकते, तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते किती महत्त्वाचे अाहे याची यादी तयार केली. त्याचे पत्रक तयार करून सातारा शहरात घरोघरी जाऊन मार्केट तयार करण्यास सुरवात केली. शहरात लहान बॅनर्स लावूनही जाहिरात केली. मार्केटिंग करताना चांगले-वाईट अनुभव येत असताना काम सुरू ठेवले. ग्राहकांना दुधाचे महत्त्व पटवून दिले. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‍गल यांच्यासह शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी या दुधाचे ग्राहक बनले आहेत. व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  •  गटातील सर्व सदस्य स्वंतत्रपणे गायींचे व्यवस्थापन करतात.
  •  दुधाचा दर्जा टिकण्यासाठी सातत्याने प्रयत्न. दुधातील फॅटची वेळोवेळी तपासणी.
  •  दुधाच्या दोन वेळच्या धार काढण्यांमध्ये १२ तास अंतर राहील याची काळजी
  •  दुधासंदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क करता येतो.
  •  गायींना जागेवर बांधून न ठेवता दररोज चरावयास नेले जाते. यामुळे खुराकावरील खर्च महिन्याला १८०० रुपयांपर्यंतच येतो.
  •  गोमूत्राची २० ते २५ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. शेणखत स्वतःच्या शेतात वापरले जाते.
  •  मागणीप्रमाणे तुपाची निर्मिती केली जाते. त्यास २५०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळतो.
  • दुधाचे संकलन व विक्री या संदर्भातील सर्व नोंदी ठेवल्या जातात.
  • गटातील सदस्य असे- अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष संजय पवार, सचिव उद्धव पवार, राजेंद्र पवार, शिवाजी पवार, गणेश पवार, आनंदराव खामकर, शिवाजी भिकू पवार, साहेबराव पवार, सदाशिव पवार, मधुकर धोंडीराम पवार, रामचंद्र पवार, मनोज पवार, चंद्रकांत पवार, शरद पवार, प्रदीप पवार, रवींद्र माने, लक्ष्मण पवार, विठ्ठल पवार.
  • भविष्यातील नियोजन गीर गायीच्या दुधाचे, तुपाचे ब्रॅडिंग व पॅकिंग करून विक्रीची इच्छा आहे. साबण व अगरबत्ती तयार करण्याचा व संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा मानस आहे. आत्मा विभाग व तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांचे सहकार्य गटाला मिळाले अाहे. उद्धव पवार ः ९८८१७०८४३२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com