लोकसहभागातून घडला जुनोनी वॉटरमीटर प्रकल्प यशश्वी

सरपंच महापरिषदेमध्ये जुनोनी वॉटर मीटर प्रकल्पावर आयोजित परिसंवादात बोलताना प्रा. डॉ. भूपाल पाटील, त्या वेळी (डावीकडून) भारत व्हनमाने, लक्ष्मण केंगार, सरपंच संजय कांबळे, व्यासपीठावर बाजूला अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण
सरपंच महापरिषदेमध्ये जुनोनी वॉटर मीटर प्रकल्पावर आयोजित परिसंवादात बोलताना प्रा. डॉ. भूपाल पाटील, त्या वेळी (डावीकडून) भारत व्हनमाने, लक्ष्मण केंगार, सरपंच संजय कांबळे, व्यासपीठावर बाजूला अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण

आळंदी, जि. पुणे- गावाची इच्छाशक्ती, सहभाग आणि प्रामाणिकपणे प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही योजना सहजपणे अंमलात येऊ शकते असा सूर शेतीसाठी उत्तम जलव्यवस्थापन या चर्चासत्रात उमटला. शेतीसाठी ‘वॉटर मीटर’द्वारे पाणी वापरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी गावचे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांनी या वेळी चर्चेत सहभाग घेतला. येथे आयोजित सातव्या सकाळ- अॅग्रोवन सरपंच महापरिषदेच्या दुसऱ्या दिवशी (ता. १६) पहिल्या सत्रात हे चर्चासत्र रंगले. जुनोनी येथील ग्रामस्थांनी शेतीमध्ये ‘वॉटरमीटर’ बसवून अनोखा यशस्वी प्रयोग केला आहे. या प्रयोगात अग्रेसर असणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एकत्रित व्यासपीठावर आणून या योजनेची माहिती उपस्थित सरपंचांना करून देण्यात आली. हा आश्‍वासक प्रयोग साकारताना आलेल्या अडचणी व त्यातून काढलेला मार्ग असा प्रवास उपस्थितांना नवी दिशा देऊन गेला. या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी मांडली. वॉटरमीटरचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि नावीण्यपूर्ण आहे, गावागावांत तो होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत असे ते म्हणाले. या योजनेचे लाभार्थी प्रा. डॉ. भुपाल पाटील म्हणाले, की कायम दुष्काळी व आणि पाण्यासाठी वणवण असणाऱ्या जुनोनीला पाणी कमी मिळत होते. ज्या वेळी टेंभू योजनेचे पाणी आले त्या वेळी ते घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी चढाअोढ लागायची. यामुळे सर्वांना समान पाणी मिळणे दुरापास्त व्हायचे. परिणामी फायदा कोणालाच व्हायचा नाही. गावात २९.५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा तलाव आहे. यामध्ये योजनेचे पाणी साठविले जाते. हे पाणी घेताना कोणतीच मर्यादा नसल्याने पाणी पुरेसे व्हायचे नाही. यामुळे शेतकऱ्यांत असमाधानाचे वातावरण होते. यातूनच वॉटरमीटरची कल्पना सुचली. याचा माझ्याही डाळिंब बागेला फायदा झाला. त्यासाठी पाणी पुरेसे होत असल्याने बागेच्या क्षेत्रात वाढ केली. लोकांत मिसळून काम केल्याचे समाधान लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण केंगार यांनी अॅग्रोवनने पहिल्यांदाच बोलण्यासाठी व्यासपीठ दिले अशी कृतज्ञता व्यक्त करीत सरपंचांशी संवाद साधला. आजपर्यंत मी खूप कामे केली. मात्र स्टेजवर कोणी बोलावले नाही असे सांगत त्यांनी जुनोनीतील यशकथेचा प्रवास सांगितला. मी अनेक वर्षांपासून या भागात काम करतो. जलसंधारणाची अनेक कामे केली. परंतु, ज्या वेळी वॉटर मीटरची कल्पना पुढे आली, त्या वेळी सरकारी अधिकारी असल्याचे विसरून जाऊन जास्तीत पद्धतीने लोकांच्या पुढे गेलो. त्यांना कल्पना समजावून सांगितली. त्यांना शासकीय पातळीवरची सर्व माहितीही दिली. यामुळे ही योजना पूर्णत्वास गेली. ग्रामस्थांची बदलली मानसिकता सरपंच संजय कांबळे यांनी या प्रयोगासाठी ग्रामस्थांची मानसिकता कशी बदलली याबाबतचा प्रवास विषद केला. आधि केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पहिल्यांदा आपल्या शेतात मीटर बसविले. त्यानंतर त्याचे फायदे लोकांना सांगितले. सरपंचानीच या कामी स्वत:च ही पद्धत वापरून पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी त्याला प्रतिसाद दिला. यामुळे गावात मीटरने पाणी वापराबाबत चांगले वातावरण तयार झाले. प्रत्येकाला ही बाब पटल्याने मग सर्वांनीच मीटर बसविण्यास सुरवात केली. आता त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. गट तट विसरून मी प्रत्येकाच्या घरी गेलो. दहा- दहा वेळा बैठका घेतल्या. माझी धडपड नक्की कशासाठी आहे हे ग्रामस्थांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी मीटरने पाणी उपशास संमती दाखविली असे त्यांनी सांगितले. अनिर्बंध पाणी वापरावर नियंत्रण बीट कारकून भारत व्हनमाने म्हणाले, की अनेक गावांमध्ये पाणीपट्टी थकीत असते. मात्र आम्ही आगाऊ पैसे भरून नंतरच तितके पाणी घेतो. असे उदाहरण कोणत्या गावात नसेल. कारण तलावातील एकूण पाणी, लागणारे पाणी याचे गणित करूनच आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला किती पाणी आवश्‍यक आहे त्या प्रमाणे पाणीपट्टी आकारतो. त्यानुसार तो शेतकरी जेवढे पाणी वापरतो तेवढीच रक्कम देतो. ही सूत्रता आल्याने अनिर्बंध पाणी वापरावरही नियंत्रण आले. याचा फायदा भूजल पाणी पातळी वाढण्यावरही झाला. जो शेतकरी मीटरने पाणी घेण्याबाबत टाळाटाळ करतो, सहकार्य करत नाही त्याच्यावर कारवाई केली जाते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी याबाबत बैठक घेऊन योजनेतील शेतकऱ्यांचा आढावा घेतला जातो. असहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मीटर बंद करण्यासारखी कारवाई केली जाते. त्यामुळे शेतकरी नियमाप्रमाणे पाण्याची उचल करतात. असा आहे जुनोनी ‘वॉटर मीटर’ पॅटर्न

  • आठवड्यातून दोन दिवस शेतकऱ्यांना पाणी
  • दिवसभरात आठ तास पाणी
  • एकशे अठ्ठेचाळीस वीजपंपांच्या माध्यमातून २९६ शेतकऱ्यांच्या ५९२ एकर क्षेत्राला पाणी दिले जाते.
  • तीन ते पाच अश्‍वशक्तीचे मीटर बसवले आहेत.
  • तलावाचा पाणीसाठा व मीटरच्या ‘रीडिंग’प्रमाणे शेतकऱ्यांकडून बिल आकारले जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com