जमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची किफायतशीर शेती

तुळशीराम फडतरे
तुळशीराम फडतरे

जमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील फडतरवाडी येथील तुळशीराम विठ्ठल फडतरे या तरुण शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुरमाड जमिनीत तलावातील गाळ भरून त्याने आपली जमीन सुपीक केली आहे. त्यातून आले, कांदा या मुख्य पिकांची किफायतशीर शेती त्यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील नेर तलावानजीक असलेले फडतरवाडी (ता. खटाव) हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव आहे. नेर तलावचे पाणी उपलब्ध झाल्याने गावातील बहुतांशी शेतजमीन बागायत आहे. गावातील तुळशीराम विठ्ठल फडतरे हे तरूण शेतकरी. शिक्षण सुरू असतानाही बंधू जयवंत यांच्यासमवेत शेतीकामांचा अनुभव ते घेत होते. त्यांची वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन होती. त्यांचे वडील बीएसटीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. सन २००१ मध्ये फडतरे कुटूंबाने बुध गावच्या परिसरात काही मुरमाड जमीन खरेदी केली. आज त्यांची एकूण शेती सुमारे सात एकरांवर पोचली आहे. जमीन केली लागवडयोग्य तुळशीराम यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये खरेदी केलेली जमीन पिकाऊ करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन मुरमाड, चढ उताराची होती. यात यशस्वी शेती करायाची हा इरादा मनात ठेवूनच त्यांनी कामाला सुरवात केली. ही जमीन तीन ठिकाणी होती. सुरवातीला ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने नांगरट, जेसीबी यंत्राच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यास सुरवात केली. शेतजमिनीच्या आकारानुसार आठ प्लॉटसमध्ये विभागणी केली. नेर तलाव गाळाने भरला होता. त्यातून तीन हजार ट्रेलर गाळ भरून त्याचा वापर केला. जमिनीचे सपाटीकरण झाले. बागायत शेतीसाठी पाइपलाइन खटाव तालुका दुष्काळी असला तरी नेर तलावामुळे या परिसरात पाणीटंचाई तुलनेने कमी आहे. मात्र शेती बागायत करण्याच्या दृष्टीने साडेसात हजार फूट पाइपलाइन करत तलावातील पाणी शेतात आणले. यानंतर रताळे, बटाटा, कांदा, ज्वारी, भाजीपाला पिके घेण्यास सुरवात केली. जे करायचे ते मनापासून जिद्द असल्याने हळूहळू उत्पादनाला आकार येत गेला. पाण्याचे मूल्य अोळखलेल्या तुळशीराम यांनी ठिबक सिंचनावरच भर दिला. आले पिकाची शेती जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, सातारा या भागात आले मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकर चव्हाण यांनी त्यांना हे पीक घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी २० गुंठे क्षेत्राची निवड केली. त्यानंतर आजगायत तेवढ्याच क्षेत्रात लागवड केली जाते. साधारण पंधरा महिन्यांच्या पुढे पीक ठेवले. यामध्ये १७ टनांच्या पुढे उत्पादन मिळाले. प्रति गाडीस (प्रति ५०० किलो) सात हजार रुपये दर मिळाला. उत्पादन चांगले मिळाल्याने ६० हजार रुपये रक्कम शिल्लक राहिली. त्यापुढील वर्षीही २० गुंठ्यांत लागवड केली. त्यात शेणखत, कोंबडी खताचा वापर केला. यावेळीही उत्पादन १७ टनांपर्यंत मिळाले. सध्याचे पीक दमदार असून उत्पादनात असेच सातत्य राहील, असा अंदाज असल्याचे तुळशीराम यांनी सांगितले. व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • शेणखत व कोंबडी खताचा अधिक वापर.
  • जमिनीची मशागत वेळेत करण्यावर भर
  • गरजेइतकाच रासायनिक खतांचा वापर, त्यावरील खर्चात बचत केली आहे.
  • विद्राव्य खतांचाही वापर
  • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर
  • भांगलणीसह शेतातील कामे घरातील सदस्य करतात. त्यातून मजुरीखर्चात बचत.
  • गोमूत्र ठिबकद्वारे पिकांना दिले जाते.
  • जमाखर्चाच्या नोंदी ठेवल्या जातात.
  • मदत आई, वडील, बंधू, पत्नी, वहिनी, बहीण तसेच मित्र बबन श्रीरंग बर्गे यांची मोठी मदत तुळशीराम यांना होते. आले पिकाव्यतिरिक्त कांदा, वाटाणा ही पिकेही घेतली जातात. कांद्याचे अडीच एकरांत ५० टन म्हणजे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेतल्याचे तुळशीराम यांनी सांगितले.

    सातारी आले भारीच! पण दरांचा मोठा फटका "आले आलं तर नाहीतर गेलं' या म्हणीप्रमाणे दराअभावी आले पिकाची अवस्था झाली आहे. दरातील अस्थिरतेमुळे आले उत्पादक शेतकरी प्रत्येक वेळी अडचणीत येत आहेत. सातारा जिल्हा या पिकासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. माहिम-२ या वाणाची राज्यात प्रथम सातारा जिल्ह्यात लागवड करण्यात आली होती. यामुळे सातारी आले या नावाने ते प्रसिद्ध आहे. येथे लागवड केलेल्या आल्यातील तिखटपणा तुलनेने जास्त असल्याने ग्राहकांकडून त्याला चांगली मागणी असते. जिल्ह्यात सुमारे २५०० हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे या पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून हे पीक घेतले जाते. दरात अस्थिरता असतानादेखील जिल्ह्यात लागवड सातत्याने सुरू असते हे विशेष. यंदाही दर कमी असताना लागवड करण्यात आली. जून महिन्यात दरात सुधारणा होऊन ते प्रति गाडीस (५०० किलोच्या) ३५ हजार रुपयांपर्यंत गेले. दर वाढतील यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले विक्रीस काढले नाही. मात्र हे दर अगदी थोड्या कालावधीपुरते राहिले. त्यानंतर दरांत पुन्हा घसरण होत ते २५ ते २८ हजार रुपयांवर आले. या काळात बेणे उपलब्ध नसल्याने लागवडीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली नाही. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पुन्हा एकदा दरात घसरण झाली. सध्या प्रति गाडीस २० ते २२ हजार रुपये दर मिळत आहे. या हंगामात आले क्षेत्रात ४०० ते ५०० हेक्‍टरने घट झाल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

    संपर्क- तुळशीराम फडतरे - ९९२३४५७४२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com