डोंगररांगांच्या कुशीत देशी पीकवाणांचा ठेवा

नैसर्गिक समृद्ध जीवन साधे, नैसर्गिक समृद्ध जीवन कसे जगायचे हे या अकोले तालुक्यातील आदीवासी महिलांकडून शिकावे. शांताबाई किंवा ममताबाई, दोघीही निरक्षर. पण त्यांचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की परसबाग पाहणीसाठी आलेल्या ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे, एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. कळसुबाई शिखराच्या आजूबाजूच्या अनेक खेड्यांमध्ये असे अनेक शेतकरी पाहावयास मिळतात.
राहिबाई पोपेरे यांनी देशीपीक वाणांचे जतन केले आहे.
राहिबाई पोपेरे यांनी देशीपीक वाणांचे जतन केले आहे.

नगर जिल्ह्यात अकोले हा निसर्गाने समृद्धी बहाल केलेला तालुका आहे. येथील आदिवासी महिलांनी परसबागांमधून विविध दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण देशी पीक वाणांचे जतन करून त्यांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे. त्यासह सेंद्रिय शेतीला चालना देत कुटुंबाचे सक्षमीकरण करीत सामाजिक व आर्थिक स्तरही उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.    शांताबाईंची परसबाग नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराचा रम्य परिसर. पावसाळा संपल्यानंतर सारं रान आबादानी होऊन गेलेलं. खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भाताचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगरावरील नागमोडी सडक आणि उताराच्या बाजूला वसलेली आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण गाव. त्यात पारंपरिक पद्धतीचे शांताबाई धांडे यांचे कौलारू घर. शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. घराभोवताली उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे, घराच्या भिंतीपर्यंत पोचलेले दोडक्याचे वेल, कारल्याचा मांडव. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत फुले, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत वाल, घेवडा. सर्व भाज्या स्थानिक किंवा देशी. घरच्यासाठी उत्पादीत मालाचा वापर. शिल्लक माल विक्रीसाठी बाजारात नेला जातो. शांताबाईचे पती खंडू सांगतात की, दूरवरून विविध लोक अगदी परदेशी पर्यटकही आमची परसबाग पाहायला येतात. शांताबाईंचा एम.ए.बी.एड. झालेला मुलगा सोमनाथ यालाही आईचा खूप अभिमान वाटतो. दुर्मिळ वाणांनी समृद्ध परिसर दुर्मिळ किंवा लुप्त होत चाललेल्या पीकवाणांनी समृद्ध असा हा परिसर आहे. येथे कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समिती कार्यरत आहे. बायफ या स्वयंसेवी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकरी समितीचा कार्यभार चालवतात. हैबतराव भांगरे समितीचे प्रमुख आहेत. देशी बियाणे संवर्धनाला मुख्यत्वे भागातील आदिवासी महिलांचा हातभार लागला आहे. यात शांताबाई यांच्यासह ममताबाई भांगरे, हिराबाई गभाले, राहीबाई पोपेरे, जनाबाई भांगरे आदींचीही नावे घेता येतील. आदिवासी महिला बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येत सेंद्रिय शेती व देशी बियाणे संवर्धनाची चळवळ त्यांनी सुरू केली आहे. अन्नाबाबत स्वयंपूर्ण ममताबाईंची शेती आंबेवंगणच्या पुढेच देवगाव ही आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे कौलारू घर व बाजूला पडवी आहे. घरापुढे बोगनवेलीचा ऐसपस मांडव. प्रसन्न वातावरण. घराच्या सभोवताली इंचन् इंच जागेचा लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर. रताळे, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. बारा प्रकारचे वाल. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला फळझाडे. थोड्याफार पालेभाज्या. सासू-सासऱ्यांमुळे रानभाज्यांचे ज्ञान झाले. पूर्वी रानातून त्या तोडून आणायचो. आता घराजवळच लागवड केल्याचे ममताबाई सांगतात. चहा, साखर, तेल, मीठ सोडले तर धान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही घरचे. गांडूळखताचे लहान गोळे करून ते वाळवून ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर ममताबाईंनी सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या कल्पकतेची खूप प्रशंसा झाली. ‘सीड क्वीन’ राहीबाई ‘सीड क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंभाळणेच्या राहीबाई पोपेरें यांची कीर्ती तर राज्याबाहेरही आहे. कौलारू घरात राहून बियाणे बँक सुरू करून कुटुंबाचा चरितार्थ चालवताना सात्विक धान्य पुरविण्याचे काम त्या करतात. बायफ संस्था त्यांच्याकडून देशी बियाणे विकत घेते. त्यातून त्यांना मासिक उत्पन्न मिळते. त्यांच्या शेतात काही वाणांच्या चाचण्या घेतल्या जातात. त्या बदल्यातही मानधनाची रक्कम दिली जाते. याशिवाय बियाणे संच (सीड कीट) विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. राहीबाईंकडे सातत्याने विविध लोक शेतमाल वा बियाण्यांसाठी येत असतात. भीमथडी किंवा अन्य प्रदर्शनातूनही त्या भाग घेतात. अशी होते देशी वाणांची शेती

  • घराभोवतीच्या काही गुंठ्यांत योग्य नियोजनाद्वारे विविध देशी पीकवाण
  • हंगामी आणि बहुवर्षांयू अशा दोन्ही पिकांचा समावेश
  • स्थानिक वाण एकत्र करून त्यांचा बियाणे संच (सीड कीट). यात भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यासारख्या वीस ते बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे.
  • बहुवर्षांयू प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता.
  • त्यातून आदिवासी कुटुंबांना दररोज शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक अन्न. यातून विविध विकार कमी होण्याबरोबरच कुपोषणही दूर होते.
  • देशी वाण असल्याने बियांचा पुनर्वापर
  • रोग, किडींना प्रतिकारक, खाण्यासाठी रुचकर, आरोग्यदायी घटकांनी भरपूर असे हे वाण
  • शेणखत, गांडूळ खत आदींचा वापर
  • देशी वाणांचा प्रसारही काळभाताचेही मोठ्या प्रमाणावर बियाणे या महिलांनी उत्पादीत केले आहे. त्यातून कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक स्थरही उंचावला आहे. राहीबाईंकडे सुमारे १७ पिकांचे विविध ४८ वाण असल्याचा डाटा बायफने संकलित केला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात राहीबाईंचा उल्लेख "मदर ऑफ सीड "असा केला आहे. ममताबाईंचीही समृद्ध बियाणे बँक अाहे. देशी वाणांचा प्रसार करण्याचे काम या महिला व्याख्यानाद्वारे करतात. या भागातील लुप्त होत चाललेले डांगी जनावर, काळभात आदींना पुनरुज्जीवीत करण्यासाठीही इथल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प अकोले तालुक्यातील दहा गावांमध्ये सुरू आहे. यामध्ये बाएफच्या डॉ. विठ्ठल कौठाळे (प्रकल्प समन्वयक), संजय पाटील, योगेश नवल व जतीन साठे आदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते आहे. संपर्क- राहिबाई पोपेरे- ८४०८०५५३८७          ममताबाई भांगरे- ८००७११४३०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com