जिद्द, प्रयत्न रसायनमुक्त डाळिंब पिकवण्याची

कैलास बंगाळे यांच्या शेतातील डाळिंबे
कैलास बंगाळे यांच्या शेतातील डाळिंबे

गेल्या पाच वर्षांत डाळिंब लागवडीकडे वऱ्हाडात असलेला कल कमी होत चालला अाहे. किडी-रोगांचा प्रादुर्भाव, बाजारपेठ, हवामान, दर आदी बाबी त्यास कारणीभूत ठरत अाहेत. त्यामुळे अनेकांनी अन्य पिके घेणे सुरू केले. त्याचवेळी देऊळगावराजा- अंभोरा (जि. बुलडाणा) येथील कैलास बंगाळे यांनी मात्र डाळिंबाच्या शेतीत सातत्य ठेवले आहे. जमिनीतील जिवंतपणा जोपासण्यासाठी अधिक उत्पादनाचा मोह टाळत रसायनमुक्त शेतीचा ध्यास धरला. त्यांचा हा प्रयत्न वाखाणण्‍याजोगा म्हटला पाहिजे.  

बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कैलास बंगाळे यांची ३० एकर शेती अाहे. संपूर्ण शेती ते मागील चार वर्षांपासून रसायन मुक्त पद्धतीने कसण्याचा प्रयत्न करीत अाहेत. यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका अशी पारंपरिक पिकेच नव्हे तर डाळिंबाची बागही त्यांनी घेतली अाहे. यात उत्पादनावर होणारा खर्च कमी करण्यात यश अाले आहे. त्यात होणारी बचत हा एक प्रकारचा नफा असल्याचे बंगाळे सांगतात.   विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या या भागात अंभोरा गावशिवारात बंगाळे यांनी काही वर्षांपूर्वी पडीक व कोरडवाहू असलेली ३० एकर शेती विकत घेतली होती. कैलास यांनी या शेतीची जबाबदारी घेत संपूर्ण जमीन टप्प्याटप्प्याने सुधारली. अाता संपूर्ण क्षेत्र अोलिताखाली अाणले अाहे.

पाण्याच्या समस्येवर मात अंभोरा शिवारात किंवा देऊळगावराजा तालुक्यात नेहमी दुष्काळी परिस्थिती राहते. साहजिकच सिंचनाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली अाहे. हंगामी सिंचनावरच अनेकांना सोय करावी लागते. ही स्थिती पाहता बंगाळे यांनी २०१३ मध्ये शेततळे घेतले. त्यावरच सिंचन केले जाते. यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. विहिरींचे पाणी अवघे अर्धा ते पाऊण तास मिळायचे. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा बनला होता. या बिकट परिस्थितीत नैसर्गिकरित्या उपलब्ध साधनांचा वापर करीत बाग फुलविली. सध्या बागेतील फळांची काढणी सुरू असून गेला महिना-दीड महिना पाणी देता अालेले नाही. अशाही स्थितीत फळांचा दर्जा, वाढ चांगली झाली अाहे. यासाठी पाण्याचा काटेकोर वापर, पीक अवशेषांचे अाच्छादन, जैविक घटकांचा वापर या बाबी फायदेशीर ठरल्या.

रासायनिक अवशेषमुक्त डाळिंब उत्पादन बंगाळे यांनी सन २०१३ मध्ये पाच एकरात डाळिंबाची लागवड केली. स्वतःच्या बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या जालना, अौरंगाबाद या जिल्ह्यांतील बागांना लागवडीपूर्वी भेटी दिल्या. डाळिंब बाग व्यवस्थापनाचा खर्च एकरी लाख ते दीड लाख रुपयांवर जातो ही बाब तेव्हा निदर्शनास अाली. शिवाय रासायनिक खते व कीडनाशकांच्या भडीमारामुळे जमिनीचे होणारे नुकसान व पर्यावरणाची हानी हे घटकही महत्त्वाचे असतात याचीही जाणीव होती. यामुळे बंगाळे यांनी नाशिक येथे पत्नी सौ. सुमन यांच्यासह निसर्ग शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पूर्णपणे रसायनमुक्त शेतीत स्वतःला वाहून घेतले. अाता त्यांचे प्रयत्न पाहण्यासाठी अनेक भागांतून शेतकरी येथे येतात. गेल्याच अाठवड्यात घेतलेल्या कार्यक्रमात नऊ जिल्ह्यांतून अडीचशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.     खर्च केला कमी रासायनिक निविष्ठांचा वापर थांबविल्याने खर्चात बचत होण्यास सुरवात झाली. अाज रासायनिक पद्धतीच्या डाळिंब बागेचा खर्च एकरी किमान सव्वा लाख रुपयांपर्यंत असतो. बंगाळे यांनी त्यात सुमारे ४० टक्क्यापर्यंत बचत केली आहे. डाळिंबाचे अाजवर दोन बहार घेतले अाहेत. सध्या तिसऱ्या बहरातील फळांची विक्री सुरू आहे. पहिल्या बहरात त्यांना एकूण साडेसातशे क्रेट (प्रति २० किलो) उत्पादन तर सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. बहुतांश माल नाशिक बाजार व काही जागेवरच विकला. डाळिंबाचा दुसरा बहर १२० क्विंटल उत्पादन देऊन गेला. दर कमी असल्याने सरासरी तीनहजार रुपये क्विंटल (प्रति किलो ३० रुपये) दर पडला. तीन लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. अांतरपिकातून १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. या बहरासाठी ९० हजार खर्च झाला. तो वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या बहारात सरासरी ५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.     जैविक घटकांमधून अन्नद्रव्यांची पूर्तता झाडांची अन्नद्रव्यांची गरज जैविक घटकांमधून पूर्ण केली जाते. यात निंबोळी पेंड, एकदल-द्विदल धान्यवर्गीय पीक अवशेषांचा वापर आदी उपाय केले जातात. आच्छादनातून जमिनीत अोलावा टिकवला डातो. ठिबक सिंचनातून जीवामृत दिले जाते. दशपर्णी अर्क, गोमूत्र यांचा वापर केला जातो.

आरोग्यदायी अन्न पुरविण्याचा अानंद अधिक सध्याच्या काळात रासायनिक शेतीतून पिकणाऱ्या अन्नाच्या तुलनेत नैसर्गिक शेतीत पिकणारे अन्न अधिक आरोग्यदायी असते. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी याच शेतीचा अवलंब व तसे अन्न पुरवण्यात अापला खारीचा वाटा असणे ही समाधान देणारी बाब असल्याचे बंगाळे सांगतात. ज्वारी, गहू, मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, शेवगा आदी पिकेही याच पद्धतीने पिकवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  

जमिनीचा पोत सुधारला पडीक जमीन विकत घेत त्यात सुधारणा घडविण्याचे काम बंगाळे यांनी केले. शेणखताचा वापर वाढविला. गेल्या तीन हंगामात नांगरटही केलेली नाही. वरच्यावर मशागत करून लागवड केली जात अाहे. सध्या शेतातील जमीन अत्यंत भुसभुशीत झालेली अनुभवता येते. यावर्षी जूनमध्ये खरीप पिकांची लावण केली. पेरणीनंतर एक पाऊस झाला. दुसऱ्या पावसापर्यंतचा खंड २० दिवसांपेक्षा अधिक पडला. या काळात अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत बंगाळे यांच्याकडील पिके अधिक तजेलदार दिसून येत होती. अंभोरा शिवारात रसायनमुक्त पिकांचे मिळत असलेले परिणाम पाहून कुटुंबानी सिनगाव जहाँगीर येथील शेतातही याच पद्धतीने शेती करण्यास प्रारंभ केला अाहे.

संपर्क : कैलास बंगाळे, ७७९८२०७४०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com