देशी दूध, तूप, प्रक्रिया उत्पादनांना मिळवली बाजारपेठ

सुधाकर यांच्या गोठ्यातील देशी गायी
सुधाकर यांच्या गोठ्यातील देशी गायी

भादोले (जि. कोल्हापूर) येथील सुधाकर पाटील सध्या सुमारे १३ देशी गीर गायींच्या संगोपनात रमले आहेत. देशी दूध, तूप यांची मागणी अोळखून त्यानुसार ग्राहक तयार केले आहेत. शिवाय, गोमूत्र अर्क, गोवऱ्या व अन्य संबंधित उत्पादनांसाठीही त्यांनी बाजारपेठ तयार केली आहे. आरोग्यदायी अन्न पुरवण्याचे ध्येय बाळगूनच त्यांचा रसायनमुक्त शेतीचा प्रवास सुरू आहे.   कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे सुधाकर पाटील यांची सात एकर शेती आहे. ऊस हे त्यांचे मुख्य पीक आहे. त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. काही काळ त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. परंतु, त्यात अपेक्षित यश मिळू शकले नाही. सेंद्रिय शेतीला सुरवात

  • घरची शेती सांभाळताना परदेशी भाजीपाला पिके घेतली. त्यात ते यशस्वी झाले. परंतु, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर करून उत्पादन घेणे त्यांना पटेना. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा मार्ग त्यांनी निवडला.
  • ही शेती करताना सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे होते. त्यादृष्टीने अभ्यास सुरू झाला.
  • माती सुपिक राहिली पाहिजे, या हेतूने रासायनिक निविष्ठांचा वापर थांबवून. जिवामृत, स्लरी यांचा वापर सुरू केला. सध्या त्यांचे सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन एकरी पन्नास टनांपर्यंत येते.
  • ऊस सध्या कारखान्याला जात असला, तरी येत्या काळात सेंद्रिय गूळनिर्मितीकडे वळण्याचा विचार आहे. गुळाच्या टेस्टसाठी नमुने दिले आहेत.
  • देशी गोसंगोपन सेंद्रिय शेतीसाठी सुधाकर यांना देशी गोपालन करणे महत्त्वाचे वाटले. त्यादृष्टीने पंधरा गुंठे क्षेत्रात गोशाळा उभारली आहे. यात पाच गुंठ्यांत गोठा, तर दहा गुंठे क्षेत्रात चारा पीक घेतले जाते. सध्या गोशाळेत गीर जातीच्या नऊ मोठ्या, तर लहान पाच गायी आहेत. गुजरातमधून त्या आणल्या आहेत. देशी जातींमध्ये गीर जातीची वैशिष्ट्ये अधिक प्रभावी वाटल्याने त्यांचीच निवड केली. एका मजुराच्या आधारे गायींची देखभाल केली जाते. वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती पहाटेच्या सुमारास सुधाकर यांचा दिवस सुरू होतो. ग्राहकांच्या मागणीनुसार दूध, तूप व अन्य उत्पादनांपासून विविध उत्पादनांची निर्मिती सुरू होते. ताक घुसळण्यासाठी यांत्रिक रवीचा वापर होतो. सुधाकर यांनी यापूर्वी गुजरात राज्यात पंचगव्य निर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचा त्यांना आज उपयोग होतो. याशिवाय अनेक ठिकाणी ते प्रशिक्षणही घेतात. उत्पादनांना मागणी व विक्री

  • दररोज सुमारे तीस लिटर दुधाचे संकलन होते. यापैकी सकाळी व संध्याकाळी मिळून सुमारे सहा ते सात लिटर दुधाची थेट विक्री केली जाते. देशी गायीचे दूध असल्याने त्याला ग्राहकही चांगले असल्याचे सुधाकर सांगतात. औषधी वापरासाठी व लहान मुलांसाठी दुधाला मुख्य मागणी असते.
  • दररोज सुमारे २५ लिटर दुधापासून तूप बनविले जाते. ते साधारण एक किलो मिळते. तूप तयार करताना त्यात साय घेतली जात नाही. अधिक कसदार व औषधी उपयुक्ततेचे गुण त्यात यावेत, असा भर असतो.
  • तुपाची विक्री ३२०० रुपये प्रतिकिलो या दराने केली जाते.
  • गरजेनुसार ताकही बनविले जाते. काही ताक गायींना पाजले जाते.
  • शेणी तयार करताना त्या जमिनीवर थापल्या जात नाहीत. प्लॅ.िस्टक कागदावर थापून त्यांचा जमिनीशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घेतली जाते.
  • स्वत:च्या शेतात शेणखत वापरून उर्वरित मात्रेची विक्री केली जाते. याबरोबर द्रव व घनजीवामृत, गोमूत्र यांचीही विक्री केली जाते.
  • तूप हा घटक अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो. शेणीच्या राखेपासून वड्या करून त्या विकल्या जातात.
  • औषधी गुणधर्म असलेले तेल, ‘फेसवॉश’, शॅंपू, धूपकांडी, डासांना पळवून लावणारी कांडी, फरशी स्वच्छ करणारा घटक आदी उत्पादनेही तयार होतात.
  • दुधाची विक्री ८० रुपये प्रतिलिटर दराने केली जाते. तर, शेणी पाच रुपये प्रतिनग, शेण १० रुपये प्रतिकिलो, घनजीवामृत २५ रुपये प्रतिकिलो, प्रतिलिटर दराने जीवामृत २० रुपये, गोमूत्र २० रुपये, ताक २५ रुपये याप्रमाणे विक्री केली जाते.
  • गायत्री गोशाळा या नावे उत्पादनांची निर्मिती होते.
  • असे केले मार्केटिंग

  • व्हॉट्‌स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सुधाकर यांनी ग्राहकांचे जाळे तयार केले. त्याचबरोबर ज्या ग्राहकांनी
  • उत्पादने यापूर्वी खरेदी केली आहेत त्यांच्याद्वारे ‘माऊथ पब्लिसिटी’देखील होते. तसेच, रस्त्याच्या बाजूला शेत असल्याने आपल्या उत्पादनांविषयीचे पोस्टरदेखील दर्शनी भागात लावले आहे.
  • अशा प्रयत्नांमधूनच उत्पादनांना मार्केट तयार होण्यास मदत झाल्याचे सुधाकर म्हणाले.
  • आरोग्य मिळविले देशी गायीच्या संगोपानापासून सुधाकर यांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्यही जपले आहे. कुटुंबातील सदस्यदेखील याच उत्पादनांचा नियमित वापर करतात. याचबरोबर ग्राहकांचे आरोग्य सुधारण्यासही आपल्यामुळे मदत होत असल्याची भावना सुधाकर व्यक्त करतात. सुधाकर सांगतात, व्यवसायाचे महत्त्व सुधाकर म्हणतात, की अलीकडील काळात रासायनिक निविष्ठांच्या अतिरेकांमुळे अन्नातील सकसताही कमी झाली आहे. त्यामुळे विविध रोगांना आमंत्रण होत आहे. निरोगी आरोग्य जपण्यासाठी अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. दूध, शेण, गोमूत्र या तीनही घटकांचा मूल्यवर्धित वापर केल्यास देशी गायींचे पालन फायदेशीर ठरू शकते, हा सुधाकर यांचा अनुभव आहे. संपर्क ः​   सुधाकर पाटील, ९८२३६३८३४३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com