चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून प्रशंसनीय प्रगती

रमेश व अर्चना या दांपत्याने जिद्दीने आपली शेती फुलवली आहे.
रमेश व अर्चना या दांपत्याने जिद्दीने आपली शेती फुलवली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश व अर्चना या भोसले दांपत्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीशी टक्कर देत मोठ्या जिद्दीने व चिकाटीने शेती व पूरक व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेंद्रिय शेतीसह अझोला, कडकनाथ कोंबडीपालन, गांडूळखत आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक या नात्याने अर्चनाताईंनीदेखील विविध उपक्रमांत सक्रिय राहून आपल्या कामाचा विस्तार केला आहे.   माणसाचा सर्वांत मोठा गुरू परिस्थिती आहे असे म्हणतात. आपल्या हाता-पायातले साखळदंड सैल करून थोडं स्वत:ला आजूबाजूच्या वातावरणाशी ताडून घेता आलं पाहिजे. मन मारून परिस्थितीला शरण जायचं की तिच्यावर स्वार होऊन स्वत:मध्ये बदल करायचे या निर्णयातच पुढील प्रगतीची नांदी दडलेली असते. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) (ता. तुळजापूर) येथील रमेश व अर्चना या भोसले दांपत्याने जिद्द व चिकाटीच्या जोरावरच आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही मिळवले.

परिस्थितीशी सामना भोसले यांची शेती तशी कोरडवाहू. दुष्काळाची स्थिती कायम. पूर्वी रमेश दोन गायींची राखण करीत जमेल तशी शेती कसायचे. भूकंपात गावाला फटका बसलेला. पत्र्याच्या शेडमध्ये भोसले दांपत्याला न संसार थाटावा लागला. अशा परिस्थितीतही अर्चना यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. डी.एड. करण्याचे त्यांचे स्वप्न होते. कारण शिक्षिकेची नोकरी मिळाली, तर घराचा गाडा सुरळीत चालेल असा हेतू होता. पण ते शक्य झाले नाही. गावातच माहेर. माहेरी त्या वेळी मोठी आग लागून दुर्घटना झाली. आई, वडील, बहीण तिघांचाही आगीत मृत्यू झाला. दोन लहान भाऊ व एक बहीण तेवढे वाचले.

हिमतीने सांभाळली जबाबदारी

एक वर्षाचा एक, चार वर्षाचा व एक आठ वर्षे वयाच्या भावंडांची जबाबदारी अर्चना यांच्यावर आली. समोर दारिद्र्य आ वासून उभे होते. पण पहाडाच्या काळजाच्या अर्चना यांनी लहान वयातच सासर व माहेर अशा दोन्ही घरांची जबाबदारी अंगावर घेतली. दोन्ही भावांना होस्टेलमध्ये तर बहिणीला स्वत:जवळ ठेवले. पुढे एक भाऊ इंजिनिअर तर एक प्राध्यापक झाला. बहिणीला शिकवून चांगल्या घरी लग्नही लावून दिले. त्यांचीही शेती अर्चना पाहू लागल्या.

बचत गटात सहभाग

पुढे संसाराची गाडी रुळावर येऊ लागली. भोसले दांपत्याने आपल्या शेतीचा विकास सुरू केला. आर्थिक परिस्थितीपायी रमेश यांनी सुमारे १० वर्षे अन्यत्र रोजंदारीची खडतर कामे केली. त्या काळात अर्चना यांना सुभद्राबाई, चंचलादेवी या शेतकरी महिलांनी बचत गटाची प्रेरणा दिली. मग पुढे देवसिंगा येथेच पहिल्या महिला बचत गटाची स्थापना झाली. तुळजापूर येथे सोळा किलोमीटरवर जाऊन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत बचत खाते उघडले. त्यातील वीस महिला आता सेंद्रीय शेतीचा गट चालवतात. याद्वारे विविध शासकीय विभाग, स्वयंशिक्षण प्रयोग परिवार, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, कृषि विभाग, आत्मा यांच्याशी संपर्क झाला. नवनवीन योजना कळत गेल्या.

सेंद्रिय शेती व पूरक व्यवसाय

आज मोठ्या मेहनतीतून, प्रयत्नांतून, आपले नेटवर्क वाढवून व शिकाऊ वृत्ती ठेऊन भोसले दांपत्याने आपल्या शेतचा विकास साधला आहे. त्यांनी शेतीला पूरक व्यवसायांची जोड देत व्यावसायिक पद्धतीची घडी बसवली आहे. ती पुढीलप्रमाणे ः-

  • शेती - पाच एकर - त्यातील एक एकरात घरच्या गरजेनुसार धान्य वा शेतीमाल
  • अन्य क्षेत्रात - गहू, सोयाबीन आदी हंगामनिहाय पिके, सेंद्रिय पद्धतीचा वापर
  • हुलगा, कारळा, तीळ, राळे, भगर, जवस, मटकी, वटाणा, ज्वारी, गहू, हरभरा आदींमधून पिकांची विविधता जपण्याचा प्रयत्न. त्यातून जमीन सुपीक ठेवतात.
  • गांडूळखत, कोंबडीखत, दशपर्णी, जीवामृत यांच्या वापरातून भाजीपाला घेतला. सोयाबीन एकरी १५ क्विंटल, हरभरा दहा क्विंटलपर्यंत उत्पादन.
  • हलक्या जमिनीत चार एकरांतील काळी गाळाची तळ्यातली माती आणून टाकली. त्यासाठी मोठा
  • खर्च केला.
  • पूरक व्यवसाय

  • कडकनाथ कोंबडीपालन - सुमारे २५० पक्षी - पिले, मोठे पक्षी व अंडी मिळून मागील वर्षी सुमारे
  • ११ लाख रुपयांचे उत्पन्न. पक्षी विक्री - प्रति नग - ९०० ते १०००. अंडे - ५० रुपये.
  • कृषी विज्ञान केंद्राकडूनही १२०० पक्ष्यांची ऑर्डर मिळाली.
  • गांडूळखत - दोन बेड - प्रति बेड १ टन खतनिर्मिती. ९ ते १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री.
  • मागील वर्षी ३५ हजार रुपयांचे मिळवले उत्पन्न.
  • अझोला - किलोला १०० रुपये दराने विक्री, त्यातून १० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले.
  • बहुतांश विक्री जागेवरच होते.
  • लघू डाळमिल
  • शेळ्यासाठी शेड बांधले. सुमार ४० शेळ्यांची पैदास. विक्रीतून उत्पन्न कमावले.
  • तज्ज्ञ प्रशिक्षक झाल्या

    शेती व पूरक व्यवसायातून तसेच आर्थिक नियोजनातून दांपत्याने आर्थिक सक्षमता मिळवली. कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथूनही अर्चना यांना तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून बोलावणे येऊ लागले. बचत गट, लघुउद्योग, सेंद्रिय शेती या विषयावर त्या मार्गदर्शन करतात. सन २०१२ मध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अभ्यास दौरा ‘युनिसेफ’ने आयोजित केला होता. त्यासाठीही त्यांची निवड झाली. तिथे बोलण्याची संधी मिळाली. सन २०१३ मध्ये सखीरत्न पुरस्कार, २०१५ मध्ये ॲग्रोवर्ल्ड, तसेच कृषी रसायन कंपनीचा सर्वोत्तम महिला, तर यंदा एका खासगी बॅंकेचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

    घरची प्रगती

    भोसले दांपत्याने आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. एक मुलगी एम.ए. इंग्रजी, एक बी.ए. करीत आहे. एकीचे लग्न झाले असून, मुलगा बारावीत आहे. २०१० पर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे दांपत्य आता गावात स्लॅबचे चांगले घर बांधून समाधानाने राहात आहे.

    शेतकरी कंपनीत सक्रिय

    गावात मागील वर्षी विजयालक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापाना झाली आहे. अर्चना कंपनीच्या संचालक आहे. यात सुमारे १० सदस्य आहेत. जिल्ह्यातील ही महिलांची पहिली कंपनी असावी, असा अंदाज अर्चना व्यक्त करतात. कंपनीच्या सदस्यांनी विविध पारंपरिक बियाण्यांची बॅंक उभारली आहे. सुमारे २० ते २५ पिके त्यात असावीत. गरजेनुसार सर्वांना हे बियाणे उपलब्ध करून दिले जाते.

    अर्चना भोसले, ९६३७९६१०९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com