शेतीला दिली शेळीपालनाची जोड

ओलाव्यापासून शेळ्यांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यातील फलाटाची रचना.
ओलाव्यापासून शेळ्यांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यातील फलाटाची रचना.

पाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर केळदकर यांनी धानेप (ता. वेल्हा, जि. पुणे) येथील दोन एकर माळजमीन लागवडीखाली आणली. पुणे शहरात थेट ग्राहकांना तांदळाची विक्री करत स्वतःची बाजारपेठ तयार केली. केवळ शेतीवर अवलंबून न रहाता केळदकर यांनी शेळीपालनास सुरवात केली आहे. पूरक उद्योगाची जोड देत शेती किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे. वडिलोपार्जित पंधरा एकर शेती वरसगाव धरणाच्या पाण्यात गेली. पाटबंधारे खात्यात नोकरी करत असलेल्या वडिलांचे छत्र सातवीत असतानाच हरपले. त्यानंतर दुसऱ्याची शेती खंडाने कसून आई, एक भाऊ, बहिणीसह कुटुंबाची गुजराण करत कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पुढे शिक्षण घेता आले नाही. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतरही शेतीची आस्था टिकून होती. नोकरी करत असताना शेतीच्या आवडीने थोडीशी जमीन खरेदी केली. आजही नोकरी सांभाळून शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी धानेप (ता. वेल्हा, जि. पुणे) येथील शेती नियोजनात मी मग्न असतो... राम केळदकर गेल्या सोळा वर्षांतील शेती विकासाचे अनुभव सांगत होते. पाटबंधारे खात्यात कार्यरत असणारे राम चंदर केळदकर सध्या पुण्यातील किरकटवाडी येथे राहतात. त्यांनी २००२ मध्ये सासुरवाडी असलेल्या धानेप गावात डोंगर उतारावरील दोन एकर शेतजमीन खरेदी केली. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पुणे ते वेल्हा अशी सुमारे ७० किलोमीटर ये-जा करत माळ जमीन लागवडीखाली आणली. याचबरोबरीने विहीरगाव येथे तीन एकर हलकी जमीन विकत घेऊन ती विकसित करण्याचे काम सुरू आहे. शेती विकासाबाबत राम केळदकर म्हणाले, की दोन एकर माळरानातील खडक फोडून त्यातील दीड एकर जमीन लागवडीखाली आणली. पावसाळ्यात भरपूर पाऊस, तर उन्हाळ्यात दुष्काळ अशी स्थिती असताना मी भात, हरभरा या पिकांची लागवड करतो. दोन वर्षांपूर्वी पडजमीन आणि शेती बांधावर हापूस आंबा कलमांची लागवड केली आहे. बांधावरील रायवळ आंबा झाडेही चांगली जोपासली आहेत. शेती नियोजनात माझे सासरे नामदेव चोरघे आणि सासू सौ. जनाबाई चोरघे यांची मोलाची साथ मिळते. स्वतःची शेती विकसित करताना मी सासऱ्यांचीदेखील शेती विकसित केली. शेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून दोन वर्षांपूर्वी शेळीपालन सुरू केले. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी तीन वर्षांपूर्वी कूपनलिका घेतली. शेती आणि शेळीपालनाच्या नियोजनासाठी मी गावातील दोन मजुरांना कायमचा रोजगार दिला आहे. इंद्रायणी भाताला पसंती भात लागवडीबाबत राम केळदकर म्हणाले, की वेल्हे परिसरात पाऊस जास्त असल्याने खरिपात भात लागवडीचे नियोजन असते. दरवर्षी दीड एकरावर चारसुत्री पद्धतीने भाताच्या इंद्रायणी जातीची लागवड करतो. पीक व्यवस्थापनासाठी नातेवाइकांचे मार्गदर्शन घेतो. परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करतो. दीड एकरातून मला सरासरी २७ क्विंटल भाताचे उत्पादन मिळते. व्यापाऱ्यांना भात न विकता मी गिरणीत भरडून तांदूळ तयार करतो. एकूण उत्पादनापैकी दरवर्षी किमान १४ क्विंटल तांदळाची पुण्यातील ग्राहकांना ४५ रुपये प्रतिकिलो या दराने थेट विक्री करतो. तांदूळ खरेदी करणारे ग्राहक ठरलेले आहेत. काही तांदूळ घरी ठेवतो. तसेच नातेवाईक, ओळखीच्या लोकांना विकतो. त्यामुळे विक्रीची समस्या नाही. खर्च वजा जाता नव्वद हजारांचे उत्पन्न तांदूळ विक्रीतून मिळते. भातकाढणी झाल्यानंतर एक एकरावर देशी हरभरा लागवड करतो. जमिनीतील ओलाव्यावर हरभऱ्याचे सरासरी तीन क्विंटल उत्पादन मिळते. उर्वरित क्षेत्रामध्ये मका, ज्वारी या चारापिकांची लागवड असते. पूरक व्यवसायाचे नियोजन राम केळदकर यांनी शेळीपालन व्यवसाय वाढविण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात चारशे शेळ्यांच्या संगोपनासाठी सुधारित पद्धतीची शेड उभारणार आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पाचशे गावरान कोंबड्यांची पोल्ट्री उभारण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे. याच परिसरात आणखी शेतजमीन खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न अाहे. शेती आणि पूरक व्यवसायासाठी वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी गुंजवणी धरणातून पाइपलाइन करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. शेती विकासाची सूत्रे

  • दै. ॲग्रोवनमधील लेख, यशोगाथातून माहिती घेत पीक व्यवस्थापनात बदल, शेळीपालनाला चालना.
  • प्रयोगशील शेतकरी, कृषी प्रदर्शनाला भेटी देऊन नवीन तंत्राची माहिती, शेतीमध्ये अवलंब.
  • जमीन सुपीकतेसाठी शेणखत, लेंडीखताचा जास्तीत जास्त वापर.
  • शेतीला शेळीपालनाची जोड. शेतकऱ्यांना शेळ्यांची थेट विक्री.
  • ग्राहकांना थेट तांदूळ विक्रीवर भर.
  • शेळीपालन ठरले फायदेशीर वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भातशेतीला केळदकर यांनी शेळीपालनाची जोड दिली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दोन लाख रुपये खर्च करून शेळीपालनासाठी शेड बांधले. शेळीपालनाबाबत केळदकर म्हणाले, की मी नगर जिल्ह्यातील शेळीपालक आणि परिसरातील बाजारपेठेतून ४५ शेळ्या आणि एक बोकडाची खरेदी केली. यामध्ये काही गावठी तर काही उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी एक मजूर ठेवला. शेळीपालन करण्यापूर्वी मी परिसरातील शेळीपालक आणि पशुवैद्यकाकडून शेळ्यांच्या व्यवस्थापनाबाबत तांत्रिक माहिती घेतली. गेल्या दोन वर्षांत माझ्या शेडमध्ये शेळ्या आणि बोकडांची संख्या शंभरावर झाली. शेळ्यांना कडबाकुट्टी, डोंगरी गवत, पेंड, गहू आदी खाद्य दिले जाते. पावसाळी वातावरणामुळे शेडमध्ये शेळ्यांना बसण्यासाठी फलाट तयार केले आहेत. दररोज शेळ्यांना डोंगर परिसरात चरायला सोडतो. तीन महिन्यांतून एकदा पशुतज्ज्ञांकडून लसीकरण केले जाते. परिसरातील शेतकरी शेडवर येऊन शेळ्यांची खरेदी करतात. त्यामुळे मला विक्रीसाठी व्यापारी किंवा जनावरांच्या बाजारात जावे लागत नाही. यंदा मी ५० शेळ्या आणि १५ बोकडांची विक्री केली. यातून खर्च वजा जाता सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले. सध्या माझ्याकडे ४० शेळ्या आणि २० बोकड आहेत. जमीन सुपीकतेवर भर शेळीपालनातून वर्षभरात सुमारे दोन ट्रक लेंडीखत मिळते. केळदकर लेंडीखत विकण्यापेक्षा त्याचा वापर स्वत:च्या शेतीमध्ये करतात. त्यामुळे हलकी, माळ जमीन आता बऱ्यापैकी सुपीक होऊ लागली आहे. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होत आहे.  शेणखत, लेंडीखताच्या वापरामुळे रासायनिक खतांसाठी होणारा खर्चही वाचला आहे. संपर्क : राम केळदकर,  ९४२२५६१३३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com