एकत्रित कुटुंबाच्या जोरावर पेलली एकात्मिक शेतीची मदार

दोन एकरांवर केलेली डाळिंबाची लागवड. झाडाला लगडलेले दर्जेदार फळ
दोन एकरांवर केलेली डाळिंबाची लागवड. झाडाला लगडलेले दर्जेदार फळ

ढोरजळगाव ने (जि. नगर, ता. शेवगाव) येथील उगले कुटुंबाने केवळ घरच्या सामूहिक बळावर आपली २९ एकरांवरील एकात्मिक शेती आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे पेलली आहे. घरचे किमान दहा सदस्य शेतीत राबतात. कापूस, ऊस, भुसार पिकांबरोबरच आंबा, डाळिंब, केळी या आदी फळबागांची शेतीही त्यांनी फुलवली आहे. जोडीला दुग्ध व्यवसाय व किराणा व्यवसाय यातून उत्पन्नाचे स्त्रोत विस्तारले आहेत.

 नगर जिल्ह्यातील ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथे लक्ष्मण रंगनाथ उगले व त्यांचे बंधू निवृत्ती, मनोहर असे तीन भावांचे जुन्या पिढीचे राहते. लक्ष्मण यांना दोन तर निवृत्ती व मनोहर यांना प्रत्येकी एक मुलगा. सुमारे २२ सदस्य गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या कुटुंबाची पुढील पिढी सध्या शेतात राबत आहे.

शेतीचा विस्तार उगले कुटुंबाची दहा एकर वडिलोपार्जीत शेती होती. टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करत ती २९ एकरांपर्यंत नेली आहे. सध्या निवृत्ती यांचे पुत्र भाऊसाहेब शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात. काळाचा वेध घेत पारंपरिक पिकांत बदल करत या कुटुंबाने एकात्मिक शेती व त्यातही फळपिकांना प्राधान्य दिले आहे.

शेतीची वैशिष्ट्ये गोमूत्र, शेणखताचा वापर शेतीचे नियोजन करताना संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर नसला तरी डाळिंबाला महिन्यातून दोन वेळा गोमूत्र, गूळ, शेण, डाळीचे पीठ यातून तयार केलेली स्लरी प्रति झाडा अर्धा लिटर देतात. घरच्या  जनांवरामुळे वर्षाकाठी पंचवीस टन शेणखत उपलब्ध होते. प्रति झाड डाळिंबाला दहा किलो, केळीला आठ किलो तर आंब्याला पंधरा किलो त्याचा वापर होतो.

आंतरपिकांतून उत्पन्न डाळिंबाची नवी बाग असताना दोन वर्षे रब्बी कांद्याचे आंतरपीक घेतले. एकरी बारा टनांपर्यंत त्याचे  उत्पादन मिळाले. नाशिकला १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली. आंब्यातही सुरवातीला चार वर्षे कडधान्य, चारा यांचे आतरपीक घेतले. कांदा साठवणीसाठी तीस टन क्षमतेची चाळही उभारली आहे.

उसाचे उत्पादन वाढवले उगले उसाचे पंचवीस वर्षांपासून पीक घेतात. चार फुटी सरीने लागवड केली आहे. सुरवातीला सरासरी तीस ते चाळीस टन प्रति एकरी उत्पादन मिळायचे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, खतांच्या आवश्‍यक मात्रा आणि अन्य बाबींतून एकरी ९० टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. सिंचनाची उपलब्धता ढोरजळगाव ने शिवाराला मुळा कालव्यातून पाणी मिळते. त्यामुळे या भागात ऊस अधिक आहे. उगले यांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी चार विहिरी आणि दोन विंधनविहिरी घेतल्या. कालव्याला पाणी आले की विहिरी, विंधनविहिरीला पाणी उपलब्ध होते. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असली तरी नियंत्रित  पाणी देत पाणी बचतीवर भर असतो.

घराचे स्वप्न साकारले आयुष्यभर राबून शेतीत प्रगती करणाऱ्या उगले कुटुंबाच्या घराचे स्वप्न २०१२ मध्ये पूर्ण झाले. पूर्वी हे कुटूंब माती-पत्र्याच्या घरात राहायचा. शेतीतील उत्पन्नातून देखणे, टुमदार घर बांधणे शक्य झाल्याचा कुटुंबाला अभिमान आहे.

मजुरीबळ वाचवून आर्थिक बचत शेतीत कुटुंबातील दहा माणसे नियमित राबतात. त्यामुळे बाहेरील मजुरांची गरज भासत नाही. वर्षाकाठी त्यातून सुमारे दोन लाख रुपयांच्या मजुरीखर्चात बचत होते. टॅक्‍टरसह अन्य औजारांचाही वापर होतो.

दुग्ध व्यवसायाने दिली दिशा उगले परिवारातील सदस्य पूर्वी शेती सांभाळून मजुरी करायचे. त्यांनी साधारण १९८२ च्या सुमारास दोन म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. तो नेटक्या पद्धतीने चालवला. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवली. दररोज शंभर लिटर दूधविक्री व्हायची. काळाच्या अोघात दुग्ध व्यवसाय कमी केला आहे. मात्र भाकड म्हशी खरेदी करायच्या. गाभण झाल्यावर विक्री करायची हा व्यवसाय आज केला जातो. वर्षभरात साधारण पंधरा म्हशीची खरेदी- विक्री होते. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळते. कुटुंबातील मनोहर यांचे गावात किराणा दुकान आहे. त्यातूनही उत्पन्नाचा हातभार लागतो.

शेती दृष्टिक्षेपात

  • १६ एकर ऊस- उत्पादन- एकरी ९० टन.
  • अडीच एकर डाळिंब- दुसरा हंगाम- उत्पादन सात टन  
  • दोन एकर केळी व आंबा
  • बाकी मका, घास, कापूस, बाजरी आदी पिके
  • कांदा- उत्पादन १२, १५ टनांपासून कमाल एकरी २५ टनांपर्यंत (हवामान व हंगामावर अवलंबून)  
  • डाळिंब : दोन वर्षांपूर्वी दोन एकरांवर भगवा डाळिंबाची लागवड केली. अांतरमशागत करता यावी, यासाठी चौदा बाय दहा फूट अंतर ठेवले. गेल्याच वर्षी पहिले उत्पादन पाच टनांपर्यंत मिळाले. त्याची पुण्यात ६५ रुपये प्रति किलो दराने विक्री केली. यंदा बारा ते पंधरा टनांपर्यंत उत्पादनाचा अंदाज आहे.

    केळी : ढोरजळगाव ने शिवारात फारसे केळीचे पीक घेतले जात नाही. उगले यांनी मात्र त्याचा प्रयोग केला. आठ दिवसांत विक्री करता येणार आहे. अजूनही दोन एकरांवर लागवडीचे नियोजन आहे.

    आंबा : दोन एकरांवर हापूस आंब्याची सात वर्षांपूर्वी लागवड केली. जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. यंदा चाळीस टनांपर्यंत एकूण उत्पादन मिळाले. सरासरी पंचवीस ते पस्तीस रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

    उगले यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • तिसऱ्या पिढीतही एकत्रित कुटुंबाचा शेतीत राबता
  • बहुवीध पिकांसह दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार
  • शेतीतील उत्पन्नातूनच मुलांचे शिक्षण
  • पारंपरिक पिके कमी करुन फळपिकांकडे कल
  • सर्व क्षेत्राला ठिबकचा वापर
  • संपर्क : भाऊसाहेब उगले, ९६२३२६११६५, मनोहर उगले, ९४२०३४३३०९   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com