कपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर

जालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यशस्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात.
बाबासाहेब काटकर यांनी शेतात लावलेला कामगंध सापळा.
बाबासाहेब काटकर यांनी शेतात लावलेला कामगंध सापळा.

जालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यशस्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात. काटकर यांची गावाच्या दोन भागांत शेती विभागलेली आहे. गतवर्षीपर्यंत दोन्ही विभागांत ते कपाशी घेत होते. मात्र त्यामुळे कीड - रोगांच्या व्यवस्थाबाबत योग्य नियोजन करता येत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्याचा कपाशीसारख्या पिकाला फटका बसत होता. परिणामी, यंदा त्यांनी गावाच्या एकाच भागातील ७ एकरांवर कपाशी लागवड केली आहे. यंदा त्यांनी दोन टप्प्यांत चार बाय दीड फूट अंतरावर कपाशीची लागवड केली. पहिल्या टप्प्यात ६ जूनला तीन एकरांवर, तर दुसऱ्या टप्प्यात २२ जूनला ४ एकरांवर कपाशीचे पीक घेतले आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर कपाशीची लागवड केल्यानंतर खताची प्राथमिक मात्रा (बेसल डोस) देण्यास शेतकऱ्यांकडून पुष्कळदा चूक किंवा उशिर होतो. परिणामी खताची दुसरी मात्रा देताना शेतकऱ्यांकडून नत्राचे प्रमाण वाढविले जाते. मात्र त्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ होऊन त्यांच्यावर कीड -रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे यांच्या निदर्शनास आले. तसेच उशिरा खतमात्रा दिल्याने रस शोषण करणाऱ्या किडींची औषध प्रतिकारक्षमता वाढते. परिणामी त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येतात, असेही काटकर सांगतात. आपल्याकडूनही अशी चूक होऊ नये यासाठी लागवड करण्यासाठी फुल्या पाडल्या की ते खताची प्राथमिक मात्रा देऊन टाकतात. यंदा प्राथमिक खतामात्रा देताना त्यांनी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार एकरी युरिया २५ किलो अधिक १०:२६:२६ - १०० किलो अशी खतमात्रा दिली. त्याचबरोबर झिंक, फेरस व मॅग्नेशिअम सल्फेट या सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचीही दिली. त्यासाठी एकरी झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट पाच किलो व मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अशी मात्रा दिली. त्यामुळे कपाशीची रोपावस्थेपासूनच सुदृढ वाढ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिणामी पिकाची प्रतिकारक्षमता चांगली राहिल, असे ते सांगतात. फवारणीच्या माध्यमातूनही ते खतांची मात्रा देणार असून त्यासाठी येत्या महिन्याभरात ते  डीएपीची २ टक्‍क्‍यांची (२० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करणार आहेत. योग्य फवारणी व्यवस्थापन पिकाच्या प्राथमिक अवस्थेत रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची कीड - रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे यंदा त्यांनी लागवडीनंतर पहिल्या महिन्यातच निंबोळी अर्काची (५ टक्के) पहिली फवारणी उरकली आहे. पीकसंरक्षणासाठी जवळपास पाच ते सहा फवारण्या ते करतात. प्रत्येक औषधासोबत निंबोळी अर्काचा वापर ते प्राधान्याने करतात. त्यामुळे किडींची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन कीटकनाशकांच्या फवारणीचाही अत्यंत चांगला फायदा होतो, असे ते सांगतात. कामगंध सापळ्यांचा वापर यंदा कपाशीची लागवड केल्यानंतर आठवडाभरातच गुलाबी बोंड अळीसाठीच्या ल्यूर व कामगंध सापळे लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यानुसार एकरी १० ते १६ सापळे लावले आहेत. सामूहिकरीत्याही गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असून दहा शेतकऱ्यांचा गट बनविला आहे. सर्वांनी शेतात कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, सापळा पिकांची लागवड करून मित्रकिडींची संख्या वाढविणे, सामूहिकरीत्या कीटकनाशक फवारणी अादी नियोजन करणार आहेत. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.   सापळा पिकाची लागवड काटकर यांनी कपाशी पिकात आंतरपीक म्हणून चवळी या सापळा पिकांची लागवड केली आहे. तसेच शेताच्या चारी बाजूंनी त्यांनी मका या पिकाचीही एक ओळ लावली आहे. त्यामुळे चवळीवर मावा या किडीचा प्रादुर्भाव होऊन तिला खाण्यासाठी मित्रकीटक येतील व ते माव्याबरोबर गुलाबी बोंड अळी व इतर कीटकांनाही भक्ष्य बनवतील असे त्यांचे नियोजन आहे. संपर्क : बाबासाहेब काटकर, ९५४५०५७५२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com