यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून समृद्धीच्या वाटेवरील कवठे

पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन यांत्रिकीकरणावर आधारीत शेती कवठे गावातील शेतकरी करू लागले आहेत. त्याद्वारे श्रम कमी झाले आहेत. शेतीची उत्पादकताही वाढली आहे. गावच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. -लालासाहेब पाटील- ९५४५३०३३७७ सरपंच, कवठे
ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर केला जातो.
ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर केला जातो.

कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या कवठेगावाने शेती, त्यातील यांत्रिकीकरण व सुधारीत तंत्रज्ञान या बाबींच्या आधारे प्रगतीचा मार्ग धरला आहे. उसातील यंत्रे, ठिबक, अवजारे यांचा वापर करून तंत्रज्ञान वापरात इथले शेतकरी कुशल होत आहेतच, शिवाय पुरुषांच्या बरोबर महिलांनीही शेती तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्यातील प्रयोगशीलता सिद्ध केली आहे.

बारमाही वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी वसलेले कवठे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) हे सुमारे दोन हजारांवर लोकवस्ती असलेले गाव आहे. साहजिकच गावची शेतजमीन बागायती आहे. विहिरी आणि कॅनालचाही गावातील सिंचनाला मोठा आधार असतो. भेदिक शाहिरी कलेची परंपरा कवठे गावाला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गावाला भेट दिल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या कलेचा एक भाग असलेल्या भेदिक शाहिरीचीही गावाला परंपरा आहे. तेथील कलाकारांनी गेली अनेक वर्षे ही परंपरा आजही जपली अाहे. विकासकामांमध्ये आघाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायतीने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामसचिवालयाची देखणी इमारत उभी केली. लोकनियुक्त सरपंच लालासाहेब पाटील, उपसरपंच पुष्पा पाटील, ग्रामसेवक सूरज कुलकर्णी व ग्रामपंचायत सदस्यांमार्फत गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, स्मभानभूमी, अंगणवाडीची इमारत उभारण्याची मोठी कामे साकारण्यात जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांचाही वाटा राहिला आहे. काळाच्या गरजेनुसार नव्या तंत्राचा स्वीकार ऊस हे गावचे मुख्य पीक आहे. भाजीपाला, पालेभाज्यासह केळी, ज्वारी, आले, सोयाबीनसारखी नगदी पिके येथील शेतकरी घेतात. शेतीतील आजच्या समस्या व काळाची पावले ओळखून शेतीत बदल करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. अलीकडे मजुरांची मोठी कमतरता भासत आहे. त्यावर उपाय म्हणून पारंपरिक अवजारानां फाटा देऊन यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या योजनांचा आधार घेतला जात आहे. जे जे सुधारीत औजार बाजारपेठेत येईल त्याचा अभ्यास करून गरजेनुसार अवजारांची खरेदी व वापर करण्याचा येथील शेतकऱ्यांचा मानस असतो. वेळ, पैसा आणि श्रम वाचवून कमी कालावधीत कामे होण्याबरोबरच पीक उत्पादन वाढीसाठीही त्याची मदत झाली आहे. विकासकामांमध्येही गावाने आघाडी घेत आपली ओळख निर्माण केली आहे. यांत्रिकीकरणातून मजुरी समस्येवर मात यांत्रिकीकरणातून मजुरी समस्येवर मात करता येते हे कवठे गावातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कवठे शिवारातील ऊस सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला घातला जातो. ऊसतोडीसाठी मजुरांची मोठी कमतरता भासत होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी गावातील हिंदुराव यादव यांनी ऊसतोडणी यंत्र कृषी विभागाच्या सहकार्याने खरेदी केले आहे. त्याद्वारे कवठे व परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. कमी कालावधीत ऊस तुटून कारखान्याला जात असल्याने शेत लवकर मोकळे होते. पुढच्या पिकासाठी रान तयार करण्यास वेळ मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या यंत्राद्वारे ऊस एकसारखा तोडला जातो. गावातील अशोकराव पाटील यांनी उसाचे बुडखे एकसारखे ‘कटिंग’ करण्याचे यंत्र घेतले आहे. त्याच्या वापराने उसाची एकसमान वाढ होण्यास मदत होत अाहे. दुग्ध व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर गावातील बाळासाहेब यादव यांनी मुक्त गोठा पद्धतीने गायींचा सांभाळ केला आहे. त्यामध्येही पारंपरिक पद्धत न वापरता यांत्रिक पद्धतीने गोठा तयार केला आहे. दूधही यंत्राद्वारे काढले जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप केला जात नाही. संबंधित यंत्राद्वारे दूध संकलित करून ते डेअरीला दिले जाते. कडधान्यासह गहू, ज्वारीही मळणीही यंत्राद्वारे केली जाते. त्यामुळे वाया जाणाऱ्या धान्याची बचत होऊन श्रम आणि वेळही वाचत असल्याचे शेतकरी सांगतात. मशागतीसाठीही अवजारांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नदीकाठी गाव असूनही पिकांना ठिबकद्वारे पाणी कवठे नदीकाठी असल्याने पाण्याची कमी नाही. मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्याने जमिनीचा पोत बिघडून ती क्षारपड होण्याचाही धोका अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पिकांना आवश्यकतेएवढेच पाणी मिळत अाहे. जमिनीची धूप थांबून सुपिकताही टिकण्यास मदत होत आहे. ग्रामपंचायतीची महिलांसाठी अभ्यास सहल कवठेत कुटुंबातील महिलाही शेतीत सक्रियपणे राबतात. तसे पाहायला गेल्यास अख्खी कुटुंबेच शिवारात राबून एकमेकांचे श्रम हलके करताना दिसतात. महिलांनी शेतीतील तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना अभ्यास सहलीसाठी नेले जाते. बोरगाव येथील कृषी चिकित्सालयातील पिकांच्या नव्या जाती, उत्पादन पद्धती, वाई येथील रेशीम उद्योग, महाबळेश्वर येथील मध संकलन व उत्पादन आदी ठिकाणी सहली नेण्यात आल्या आहेत. घराच्या उताऱ्यावर पत्नीचीही नोंद घर पतीच्या नावावर असले की अनेक समस्या निर्माण होतात. एकाच्याच नावावर घर असल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचा विचार करून कवठे ग्रामपंचायतीने घराचे उतारे पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर असावे, असा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सर्व घरांच्या उताऱ्यांवर पत्नींचीही नावे घालण्यात आली आहेत. अन्य ग्रामपंचायतींसाठी हा आदर्शवत उपक्रम आहे. महिला बचत गटांनाही मार्गदर्शन गावातील महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहावे आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा या हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे नाबार्ड आणि सातारा जिल्हा बॅंकेच्या वतीने त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्याद्वारे महिला छोटे व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी बालवयातच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी तयार केली आहे. त्यामध्ये विविध सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. प्रतिक्रिया शेतीमध्ये गावातील महिलाही मागे नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबरीने शेतीत काम करतात. अभ्यास सहलींच्या माध्यमातून त्यांना नवनवीन माहिती होऊन त्याचा वापर शेतीत करणे शक्य झाले आहे. -पुष्पा पाटील उपसरपंच, कवठे आम्हाला पाण्याची मुबलकता आहे. तरीही ठिबक केले आहे. त्यामुळे पिकांना गरजेएवढेच पाणी देणे शक्य होत आहे. पाण्याची बचत होत आहे. -सुभाष कुंभार शेतकरी, कवठे   आम्ही मजूर समस्येमुळे त्रस्त झालो होतो. अवजारांच्या वापरातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेबरोबर श्रम वाचण्यासही मदत झाली आहे. -माणिक यादव शेतकरी, कवठे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com