रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती स्थिरावले तूर प्रक्रिया उद्योगात

शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा (ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती) येथील निवृत्ती अजाबराव बारब्दे यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली. रोजगाराच्या शोधार्थ दीवदमण, पुण्यापर्यंत संघर्ष केला. मात्र, उत्पन्नाचा मार्ग गवसला नाही. अखेरीस तज्ज्ञांच्या मदतीने डाळनिर्मितीचा हुकमी पर्याय सापडला. प्रयत्न व चिकाटी व कुशलता या गुणांद्वारे आज या व्यवसायात त्यांनी पाय रोवले आहेत. व्यवसायाचा विस्तार सुरू झाला आहे.
तूरडाळनिर्मिती सुरू असताना... दुसऱ्या छायाचित्रात निवृत्ती बारब्दे
तूरडाळनिर्मिती सुरू असताना... दुसऱ्या छायाचित्रात निवृत्ती बारब्दे

शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा (ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती) येथील निवृत्ती अजाबराव बारब्दे यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली. रोजगाराच्या शोधार्थ दीवदमण, पुण्यापर्यंत संघर्ष केला. मात्र, उत्पन्नाचा मार्ग गवसला नाही. अखेरीस तज्ज्ञांच्या मदतीने डाळनिर्मितीचा हुकमी पर्याय सापडला. प्रयत्न व चिकाटी व कुशलता या गुणांद्वारे आज या व्यवसायात त्यांनी पाय रोवले आहेत. व्यवसायाचा विस्तार सुरू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी  हा सिंचन सुविधांमुळे केळी तसेच औषधी पिकांसाठी पुढारलेला तालुका आहे. अनेक वर्षांपासून सफेद मुसळी, पानपिंपरी तसेच खाऊच्या पानांचे उत्पादन या तालुक्‍यात होते. खाऊच्या पानाला तर खानदेशातून खूप मागणी असते. अशा प्रकारची व्यावसायिकता या तालुक्‍याने जपली आहे. उपजीविकेसाठी संघर्ष अंजनगावपासून २० किलोमीटरवरील कोकर्डा येथे बारब्दे कुटुंबीयांची चार एकर शेती आहे. यात तूर, उडीद यांसारखी पिके घेतली जातात. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय आहे. परंतु, उदरनिर्वाहासाठी शेतीतील उत्पन्नाचा एकमेव स्राोत पुरेसा ठरत नव्हता. मग शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय शोधण्यासाठी २००७ मध्ये निवृत्ती बारब्दे यांनी गाव सोडत दीवदमण गाठले. तेथील पॅकेजिंग व्यवसायात दररोज ६० रुपये वेतनावर काम केले. हे काम देखील समाधान देण्यास पुरेसे नसल्याने पुणे गाठत सुतारकामाचा अनुभव घेतला. गावी परतून हा व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यामुळेही अर्थकारण काही जुळत नव्हते.   ॲग्रोवन प्रदर्शनातून मिळाले बळ शाश्‍वत उत्पन्नासाठी नव्या पर्यायाच्या शोधात असलेल्या निवृत्ती यांनी पुण्यात आयोजित ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला २०१३ मध्ये भेट दिली. तेथे विविध प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळाली. शेतीपूरक उद्योग फायदेशीर ठरू शकतो याची जाणीव झाली. या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला. पूरक कोणता उद्योग करावा याची कल्पना येत नव्हती. दरम्यान अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाला भेट दिली. येथील डॉ. प्रदीप बोरकर यांची भेट घेत आपल्या मनातील घालमेल सांगितली. डॉ. बोरकर यांनी निवृत्ती यांच्या भागातील पीकपद्धती जाणून घेतली. त्यातून तुरीची शेती व त्या अनुषंगाने मिनी डालमिलचा पर्याय समोर आला. निवृत्ती यांनी त्यावर अधिक अभ्यास करून यावरच काम करण्याचे ठरवले.   तूर उत्पादक भाग कोकर्डा कोकर्डा हा भाग अंशतः खारपाणपट्‌ट्यात आहे. जमिनीत क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने बागायती पिके घेणे शक्‍य होत नाही. परिणामी, परिसरात तुरीचे क्षेत्र अधिक आहे. शेतकरी प्रक्रिया न करता थेट कच्चा माल विकून मोकळे होतात असे निरीक्षण अभ्यासाअंती निवृत्ती यांनी नोंदविले. याच तुरीचे मूल्यवर्धन डाळ स्वरूपात करण्यासाठी युवा शेतकरी निवृत्ती पुढे सरसावले.   प्रकल्पाची उभारणी कृषी विद्यापीठातील डॉ. बोरकर, श्री. मुरुमकार यांनी कोकर्डा गावाला भेट दिली. त्यांच्या सूचनेनुसार ३२०० चौरस फूट जागेपैकी ३० बाय २८ फूट आकाराचे बांधकाम करून शेडची उभारणी करण्यात आली. त्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेकडून कर्ज घेण्यात आले. सन २०१४ मध्ये कृषी विद्यापीठाद्वारे विकसित मिनी डालमिल ७५ हजार रुपयांना तर ग्रेडर ३५ हजार रुपयांना खरेदी केले. त्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेतून ५० टक्‍के अनुदान मिळाले.   व्यवसायाची सुरवात व्यवसायाची सुरवात कच्च्या मालाच्या उपलब्धतेपासून होणार होती. त्यासाठी ‘लाऊडस्पीकर’ च्या माध्यमातून लगतच्या १७ गावांमध्ये डाळमिल उद्योगाविषयी प्रचार करण्यात आला. कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. परिणामी, त्याचा अजून प्रसार होण्यास मदत झाली.   उद्योगाचा होणार विस्तार डाळमिलच्या माध्यमातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करणाऱ्या निवृत्ती बारब्दे यांनी व्यवसायात चांगला जम बसविण्यास सुरवात केली आहे. आता व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी जागाखरेदी संदर्भात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद जागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने पहिल्या वर्षी सुमारे ६०० क्‍विंटल मालावर प्रक्रिया करण्यात आली. शेतकऱ्यांनी तूर आणल्यानंतर प्रक्रियेकामी ५०० रुपये प्रतिक्‍विंटल याप्रमाणे शुल्क आकारणी होते. प्रति दिवसात सरासरी दहा क्‍विंटल मालावर प्रक्रिया शक्‍य होते. विजेची उपलब्धता व्यवसायावर परिणाम करणारा घटक ठरतो. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत प्रक्रिया करता येते. त्यानंतर पावसामुळे आर्द्रता राहात असल्याने हे काम थांबवावे लागते. या कालावधीत सरासरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता ४० ते ५० टक्‍के सरासरी नफा राहतो, असे निवृत्ती यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंत्राच्या खरेदीवर झालेल्या खर्चातील मोठ्या प्रमाणातील रकमेची वसुली पहिल्याच वर्षी झाली. मसाला पिकांची मागणी व शास्त्रज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली निवृत्ती यांनी पल्वरायजरची खरेदी केली. व्यवसायाच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न केला. घरच्या तुरीवरही प्रक्रिया घरच्या शेतात उत्पादित तुरीवरही प्रक्रिया होते. डाळ उद्योगस्थळावरूनच विकण्यात येते. रासायनिक प्रक्रियेविना डाळ उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहतो. यावर्षी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने डाळीची विक्री करण्यात आली. प्रतिक्‍विंटल तुरीपासून ७० क्‍विंटल डाळ तर उर्वरित ३० टक्‍के चुरी राहते. पशुपालकांना ती २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकली जाते. उद्योगस्थळातील यांत्रिक क्षमता (प्रतितास)

  • १०० किलो
  • मिनी डाळमिल
  • १५० ते २०० किलो
  • सफाई प्रतवारी यंत्र
  • ५० किलो
  • पल्वरायझर
  • फ्लोअर मिल
  • ३० किलो
  • वजन काटा
  • संपर्क : निवृत्ती बारब्दे, ९७६५६६६५०४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com