एकात्‍मिक शेती तंत्रज्ञानाचा करडा कृषी विज्ञान केंद्राचा प्रयोग

केव्हीके ला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना ॲझोला निर्मितीबाबत माहिती देताना डॉ. रवींद्र काळे.
केव्हीके ला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना ॲझोला निर्मितीबाबत माहिती देताना डॉ. रवींद्र काळे.

वाशीम जिल्ह्यातील करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) काळाची पावले अोळखत एकात्मिक शेती या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपात तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी अडीच एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी प्रकल्प उभा केला आहे. त्यात उत्पादन व उत्पन्न वाढवणाऱ्या विविध घटकांचा समावेश करण्यात अाला अाहे. ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उत्पन्न करणारे व्यासपीठ म्हणूनही या प्रकल्पाककडे पाहता येते.   एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध तंत्रज्ञानाचा मिलाफ करून शेतीतील जोखीम कमी करता येते. त्यातून उत्पन्नात वाढ होऊ शकते हा संदेश वाशिम येथील कृषी विज्ञान केंद्राने प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. त्यासाठी प्रक्षेत्रावर विविध व्यवसायांचे प्रकल्प उभे केले आहेत.   

केव्हीकेचे असे आहेत प्रकल्प गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पात पशुधन म्हणून गाय, म्हैस व बकरी यांचे संगोपन हा महत्त्वाचा घटक समाविष्ट केलेला आढळतो. जनावरांपासून माेठ्या प्रमाणात शेण व लेंडीखत मिळते. त्याचे रूपांतर गांडूळ खतामध्ये करण्यासाठी युनिट उभे केले आहे. गांडूळांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात गांडूळखत तयार होते.  वर्षाला साधारणतः ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल अशी संधी त्यातून मिळत आहे. शिवाय केंद्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना गांडूळ कल्चर व खत निर्मितीचे ‘मॉडेल’ पाहण्यास मिळते.   व्हर्मीवॉश निर्मिती गांडूळखत युनिटद्वारे गांडूळखत पाणी अर्थात ‘व्हर्मीवॉश’ही मिळते. ते बनविण्यासाठी विशिष्ट पद्धत तयार केली आहे. या घटकात नत्र, स्फुरद, पालाश यांच्यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात अाहे. वर्षाकाठी सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न त्यातून मिळू शकते. निंबोळी पावडर, दशपर्णी अर्क निर्मिती येथे सेंद्रिय कीडनाशक युनिटही आहे. सुमारे दहा क्विंटल निंबोळ्या गोळा करून त्याची पावडर तयार केली जाते. वर्षाला सुमारे २० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न त्यातून मिळते. दहा प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा वापर करून दशपर्णी अर्काची निर्मिती केली जाते. वर्षभरात त्यातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न होते. अॅझोला विक्री; चारानिर्मिती दुधाळ जनावरांचे फॅट तसेच दूध वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त अॅझोलाची निर्मिती केली जाते. या जनावरांच्या आहारात दररोज त्याचा वापर होतो. गरजेनुसार शेतकऱ्यांनाही त्याची विक्री होते. एका एकरावर विविध प्रकारचा चारा लावला अाहे. यात यशवंत, जयवंत, डीएचएन- ६ व मका आदींचा समावेश आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे चारा पिके घेणे शक्य होत नाही. मग मुरघास साठविण्यासाठी पाच क्विंटल क्षमतेच्या बॅगचा वापर करून जनावरांना पौष्टीक चारा पुरविण्यात येतो. हायड्रोपोनीक्स पध्दतीने चारा निर्मिती होते. शोभिवंत मासे संगोपन येथे प्लॅस्‍टिक टाक्यांचा वापर करून रंगीत अर्थात शोभिवंत माशांचे संगोपनही केले जाते. माशांची विक्रीही साधली जातेे. या माध्यमातून वर्षाला पाच हजारांपर्यंत उत्पन्न प्राप्ती होऊ लागली आहे. तंत्रज्ञानाचा प्रसार केंद्रातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी जिल्हाभर विस्तार कार्य केले जाते. कृषी विज्ञान केंद्राच्या मुख्यालयी अादर्श मॉडेल उभारण्यासाठी येथील तज्ज्ञ डाॅ. रवींद्र काळे, तुषार देशमुख, आर. एस. डवरे, डी. एन. इंगोले, डाॅ. डी. एल. रामटेके यांचे तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी संकल्पनेची उभारणी केली. ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार मिळवून देणारे व्यासपीठ म्हणून या प्रकल्पाकडे पाहता येते. संपकर् : डॉ. अार. एल. काळे, ७३५०२०५७४६ वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, करडा जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com