भोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँड

निलकंठ भोंगळे यांच्या शेतातील शिंदीची लागवड.
निलकंठ भोंगळे यांच्या शेतातील शिंदीची लागवड.

माळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ भोंगळे यांनी सहा एकरांवर नीरेसाठी आवश्‍यक असणाऱ्या शिंदीच्या झाडांची लागवड केली. सहा वर्षांनंतर प्रत्यक्ष नीरा उत्पादनाला सुुरवात झाली. भोंगळे यांनी आता ‘कल्पतरू'' ब्रँड नेमने नीरा विक्रीस सुरवात केली आहे. याचबरोबरीने नीरेचा गूळ आणि काकवी निर्मितीतही त्यांनी वेगळेपण जपले आहे. टेंभुर्णी-अकलूज मार्गावर माळीनगरला रस्त्याकडेला घनदाट शिंदीची बाग लक्ष वेधून घेते. वास्तविक, कुठे तरी बांधावर दिसणाऱ्या शिंदीच्या झाडांचे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात फळबागेसारखी लागवड केल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटते; परंतु शिंदीच्या झाडाची वैशिष्ट्ये आणि उपयोगाची माहिती घेतल्यानंतर महत्त्व लक्षात येते. नीलकंठ भोंगळे यांची माळीनगर येथे बारा एकर शेती आहे. त्यांच्याकडे ऊस, डाळिंबाची लागवड होती; परंतु शाश्‍वत आणि नवीन शेतीप्रयोगाच्या उद्देशाने ते शिंदी लागवडीकडे वळले. २००२ मध्ये शिंदी पिकामधील तज्ज्ञ भालचंद्र पाटील, डॉ. जयंत पाटील यांच्याबरोबरीने त्यांनी चर्चा केली. शिंदी लागवडीबाबत तीन वर्षे अभ्यास केला. २००४ मध्ये कोसबाड (जि. पालघर) येथील कृषी संशोधन केंद्र, तसेच गुजरात, पश्‍चिम बंगाललाही भेट देऊन शिंदी लागवडीची माहिती घेतली. याचबरोबरीने बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, कृषिपर्यवेक्षक राजेंद्र पिंगळे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. याचदरम्यान, सांगोला तालुक्‍यातील अकोल्याचे भाऊसाहेब खटकाळे हेदेखील शिंदी लागवडीचा प्रयोग करत होते. त्यांच्याकडे काही रोपे तयार होती. त्यांच्याकडून भोंगळे यांनी काही रोपे खरेदी करून लागवड केली; तसेच अजित गिरमे यांनी दोन एकरांवर शिंदीची लागवड केली आहे. अलीकडे नीलकंठ यांचा मुलगा पृथ्वीराज हा पूर्णवेळ शेतीचे नियोजन पाहातो. नीरा उत्पादन, पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग या सगळ्या पातळीवर त्यांची धडपड सुरू आहे. शिंदी लागवड आणि व्यवस्थापन   लागवडीबाबत पृथ्वीराज भोंगळे म्हणाले, की २००५ च्या मे महिन्यात दोन ओळीत आणि दोन रोपात दहा फूट अंतर ठेवून एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा खड्डा शेणखत, माती मिश्रणाने भरून शिंदी रोपांची लागवड केली. एकरात सुमारे ४३५ रोपे आहेत. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिले. एक वर्षात झाडांची चांगली वाढ झाली. पूर्ण लागवडीला ठिबक सिंचन केले आहे. जून आणि आॅक्टोबर महिन्यांत झाडांना शेणखत दिले जाते. रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. साधारण सहा वर्षांनंतर झाडांची चांगली वाढ होऊन नीरा उत्पादनास सुरवात झाली. नीरा काढणीसाठी पाच बंगाली मजूर आणले. पहिल्या टप्प्यात ६० झाडांवर प्रयोग सुरू केला. याचवेळी पाउच पॅकिंग यंत्र, नीरा साठवण्यासाठी शीतयंत्रणेसह अन्य साहित्याची खरेदी केली. झाडांची संख्या आणि उपलब्ध मजूर लक्षात घेता, एकाचवेळी सर्व झाडाची नीरा काढणे अशक्‍य आहे. पण टप्प्याटप्प्याने नीरा काढता येते. हे लक्षात घेऊन ए,बी,सी अशा प्रत्येकी दोनशे झाडांचे वर्गीकरण केले. या वर्गीकरणानुसार आज ‘ए'' वर्गातील झाडाची नीरा काढल्यानंतर पुन्हा अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी ‘बी` आणि ‘सी` वर्गीकरणातील झाडाची नीरा काढली जाते. ऑक्‍टोबर ते जून असा नीरा उत्पादनाचा हंगाम चालतो. सध्या रोज साधारण ४०० लिटर नीरा उत्पादित होते. उन्हाळ्यात नीरेतील ब्रीक्‍सचे प्रमाण १४ ते १६ टक्के, तर हिवाळ्यात १९ ते २० टक्के असते. असे होते नीरा उत्पादन

  • नीरा हा गोड द्रवस्वरूपातील रस. १२ ते १४ टक्के गोडी असते. नारळाच्या पाण्याप्रमाणे नीरेची चव असते.
  • शिंदीच्या झाडापासून नीरा काढण्यासाठी झाडांना छेदन प्रक्रिया (टॅपिंग) केल्यानंतरच नीरा झिरपण्यास सुरवात होते. त्यासाठी देशी आणि बंगाली अशा दोन पद्धती आहेत. देशी पद्धतीत फोगर (लहान चाकू) मारून नीरा काढली जाते, तर बंगालीमध्ये छेदन करून नीरा काढली जाते; पण सर्रासपणे झाडाला छेदन करून त्याला मडके लावून नीरा काढणे योग्य ठरते. छेदन प्रक्रिया, रोजच्या रोज वेळेत मडकी लटकावणे आणि काढणे, हे कौशल्याचे काम आहे.
  • सूर्य मावळतीला जाताना झाडाला विशिष्ट ठिकाणी छेदन करून मडकी अडकवली जातात. त्यानंतर रात्रभर नीरा त्यात साठते. एका झाडापासून दीड ते तीन लिटर नीरा मिळते.
  • पहाटे सूर्योदयाआधी नीरा साठलेली मडकी झाडावरून उतरवली जातात. त्यानंतर नीरा मडक्‍यातून २० लिटर कॅनमध्ये गोळा करून गाळली जाते. त्यानंतर चिलिंग प्लॅन्टमध्ये संकलन होते.
  • झाडापासून नीरा काढताना २५ अंश सेल्सिअस तापमानात असते, ती थेट ४ अंश सेल्सियस तापमानात आणली जाते.
  • पॅकिंग मशिनवर २०० मि.लि.चे पाउच तयार होतात. हे पाउच डीप फ्रिजरमध्ये ठेवले जातात.
  • नीरेचे ‘मार्केटिंग' विक्रीबाबत पृथ्वीराज भोंगळे म्हणाले, की टेंभुर्णी-अकलूज हा राज्य मार्ग आमच्या शेतासमोरूनच जातो. या मार्गावर नीरा विक्रीसाठी पंधरा महाविद्यालयीन मुलांना छत्री, कोल्डबॉक्‍स दिले आहेत. दोनशे मि.लि.पाउचची किंमत १५ रुपये आहे. याचबरोबरीने अकलूज, सोलापूर, पंढरपूर  शहरातही मेडिकल, हॉटेल, किरकोळ दुकानांमध्ये विक्री केली जाते. गूळ आणि काकवी यांची विक्री  मागणीप्रमाणे केली जाते. नीरा काढणारे पाच मजूर, नीरा विक्री करणारे पंधरा मुले, पॅकिंग, ब्रॅँडिंग व शीतकरणाचा खर्च वजा जाता, दिवसाला किफायतशीर नफा मिळतो. नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँड नीरा उत्पादन आणि विक्रीसाठी परवान्याची आवश्‍यकता आहे. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यामार्फत प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शासकीय नियम आणि कायद्यानुसार नीरा उत्पादन वैयक्तिकरित्या घेता येत नाही. हा व्यवसाय सहकारी संघामार्फतच केला जावा, असा नियम आहे. त्यानुसार भोंगळे आणि गिरमे यांनी एकत्र येऊन कल्पतरू नीरा उत्पादक सहकारी संस्था स्थापली. या संस्थेमार्फत ‘कल्पतरू` ब्रँड तयार करून नीरा विक्री सुरू झाली आहे. नीरेपासून चवदार काकवी, गूळ हंगामात दर महिन्याला नऊ हजार लिटर नीरा तयार होते. भोंगळे नीरेपासून काकवी आणि गूळ तयार करतात. या उत्पादनांना चांगली मागणी आहे. नीरा हे स्वास्थ्यवर्धक थंड पेय आहे. रक्त व पचनशक्ती वाढवते. मूत्राशय आणि पोटविकारासाठी फायदेशीर आहे. नीरेमध्ये ग्लॅसॅमिक इंडेक्‍सचे (जीआय) प्रमाण सुमारे ३५ टक्के आहे. त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहाते.

    संपर्क : पृथ्वीराज भोंगळे, ८८०५६९१००९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com