पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचे
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचे

पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचे

अशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात मजूरटंचाई, भांडवलाची कमी उपलब्धता व पावसाच्या लहरीपणामुळे पाणी टंचाई आदी समस्यांचा दरवर्षी सामना करावा लागत होता. अखेर त्यांनी यांत्रिकीकरण ,मजुरांचा आवश्‍यकतेनूसार वापर व पिकनियोजन यांचा समन्वय साधून या समस्यांवर मात केली. जाणवणाऱ्या समस्या दर वर्षी खरीप हंगामात मजूरटंचाई ही मुख्य समस्या बनत आहे. पाणीटंचाई, पाऊस वेळेवर न पडणे, भांडवलाची योग्य वेळी उपलब्धता या समस्या तर आहेतच. त्याचप्रमाणे रासायनिक खते व कीडनाशकांवरील खर्चात दर वर्षी वाढ होत आहे. भांडवलासाठी बहुतांश वेळी सहकारी संस्था व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पुरेसे कर्ज उपलब्ध होत नाही. खासगी सावकाराकडून पैसे घेऊन भांडवल उभे करावे लागते.

खरिपातील कामाचे नियोजन   खरिपामध्ये कांदे, टोमॅटो, मूग, बाजरी यांसह हंगामी भाजीपाला पिकांचे नियोजन असते. उन्हाळ्यात पूर्ण शेताची नांगरणी करून, मे महिन्यात एकरी ४ ट्रॅक्टर शेणखत टाकून घेतो. आमच्याकडे २ ट्रॅक्‍टर आहेत. त्यापैकी ४५ हॉर्सपॉवर व दुसरा २५ हॉर्सपॉवर क्षमतेचा आहे. मशागत आणि फवारणी या साह्याने केली जाते. शेणखत मजुरांच्या साह्याने पसरून, रोटाव्हेटरने पुन्हा मशागत केली जाते. पाऊस पडण्यापूर्वी ट्रॅक्‍टरच्या फणाने मशागत केली जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दीड एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी गादीवाफे करून त्यावर मल्चिंग पेपर व इन लाइन ठिबक याचा वापर करतो. टोमॅटोची लागवड, बांधणी, खते देणे, विद्राव्य खते, पीक संरक्षण या सगळ्यांसाठी मजूर मोठ्या प्रमाणावर लागतात. टोमॅटो लागवड झाल्यानंतर १ महिन्याने १ एकर क्षेत्रावर फ्लॉवर लागवड करण्याचे नियोजन आहे.

  • पेरणीयोग्य पाऊस झाला, तर बाजरी, मूग आणि भुईमूग याची पेरणी केली जाते. मूग काढल्यानंतर त्याच क्षेत्रात कांदा लागवड होते. बाजरी ही मजुरांसाठी आणि घरातील अन्नासाठीच केली जाते. भुईमूग ही घरगुती गरजेपुरता करतो.  
  • १५ ते २५ जूनदरम्यान कांदा रोपेवाटिका तयार केली जाते. त्यासाठी बियाणे हे स्वत: विकसित केलेले असते. रोप तयार होत असतानाच्या काळात कांदा लागवडीचे क्षेत्राची मशागत व शेणखत टाकणे आदी पूर्ण कामे केली जातात. १५ ते २५ ऑगस्टदरम्यान २ ते ३ एकरांवर गादी वाफे तयार करून इन लाइन ठिबकच्या मदतीने लागवड होते. २ ते ३ एकरावर पारंपरिक पद्धतीने लागवड होते. भविष्यात पूर्ण क्षेत्र इनलाइन ठिबक लागवडीचे नियोजन आहे. त्यातून पाण्याची बचत होते. पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
  • हंगामाचे नियोजन वेळेपूर्वी करण्यावर भर दिला जातो. सर्वांत अगोदर मशागतीची कामे व्यवस्थितरीत्या पूर्ण करून घेतो. ज्या क्षेत्रात कांदा, टोमॅटो व इतर भाजीपाला पिके घ्यावयाची असतात. त्या क्षेत्रात भरपूर शेणखत टाकले जाते. शेणखत टाकल्यानंतर पुन्हा मशागत केली जाते.
  • बाजरी, मका, कडधान्ये आदी पिकांची पेरणी ही पेरणीयंत्राने केली जाते. कांदा व भाजीपाला पिकांसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे कल असतो. त्यात गादीवाफ्यावर लागवड, ठिबक सिंचन यांसह कीडनाशकांच्या फवारणीसाठी ब्लोअर तंत्रज्ञानावर आधा.िरत फवारणी यंत्राचा वापर करतो.
  • आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याची मोठी कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी शेततळ्याची उभारणी केली आहे.   
  • खर्च : पिकांच्या संपूर्ण कालावधीसाठी खालीलप्रमाणे खर्च होतो. त्याचे नियोजन सुरवातीपासूनच करण्याचा प्रयत्न असतो.  
  • कांद्याला एकरी ५५ ते ६० हजार रुपये काढणीपर्यंतचा खर्च येतो.
  • टोमॅटोला एकरी १ लाख ६५ हजारांपर्यंत खर्च. मात्र बाजारात चढ-उतार असते.
  • बाजरी, भुईमूग या शेतमालाची विक्री न करता घरासाठीच वापरले जाते.
  • मुगाचा हिरवळीचे खत म्हणून वापर होतो.
  • संपर्क : अशोक राघो बारहाते, ७५८८०३७६६४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com