वर्षभरात तीस पिकांची सेंद्रिय शेतीची प्रयोगशाळा

व्यावसायिक दृष्टिकोन ज्या पिकाला जेवढी मागणी आहे तेवढे त्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे असा शामसुंदर जायगुडे यांचा विचार असतो. उदा. बांधावरचा शेवगा कमी खर्चात वर्षाकाठी सुमारे ७५ हजार रुपये मिळवून देतो. पालाही वाया जात नाही. पुण्यातील एका औषध कंपनीला त्याची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळविल्याचे त्यांनी सांगितले. मोठे भाऊ माणिकराव अॅडव्होकेट असून त्यांची शेतीत मोलाची मदत होते.
जायगुडे यांची सेंद्रीय पिकांची शेती
जायगुडे यांची सेंद्रीय पिकांची शेती
पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्‍यामसुंदर जायगुडे बाजारपेठेचा अभ्यास करून १३ एकरांवर शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने वर्षभर सुमारे २५ ते ३० विविध भाजीपाला पिके घेत आहेत. सुमारे पाच कंपन्यांसोबत करारशेती केली आहे. नावीन्यपूर्ण पिकांचे प्रयोग करण्यातही त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. 
 
काही शेतकरी असे असतात, की त्यांच्या शेताला केव्हाही भेट द्या, आपले समाधान होत नाही. दर वेळी त्यांच्या शेतात नवे काही अनुभवायला मिळते. पुणे जिल्ह्यातील केळवडे येथील श्‍यामसुंदर जायगुडे हे त्यापैकीच एक. पाहुया त्यांची शेतीची प्रयोगशाळा.
  जायगुडे यांचे शेतीतील प्रयोग
  • एकूण संयुक्त शेती- २७ एकर. (दोन ठिकाणी शेती)
  • यातील १३ एकर- शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला- वर्षभर किमान ३० प्रकारचा भाजीपाला
  • उदा. पालक, शेपू, कांदा व लसूण (पातीसाठी), कढीपत्ता, बटाटा, गाजर, बीट, कारले, दोडके, दुधी भोपळा, घोसावळे, पडवळ, वांगी, टोमॅटो
  • दोन एकर- परदेशी (एक्सॉटिक) भाजीपाला. उदा. ब्रोकोली, आइसबर्ग, रेड कोबी, चायना कोबी, सेलरी, पार्सेली, लीक, लेट्यूस, चेरी टोमॅटो, पॅशन फ्रूट (मंडपावर), अमेरिकन बीन्स 
  • संपूर्ण उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार शेती- त्यामुळे दर बांधलेले. 
  •    अभ्यासू नियोजन
  • महामार्गानजिक गाव असल्याने पुणे व मुंबई शहरांशी असलेल्या   ‘कनेक्टिव्हिटी’चा फायदा करून घेतात.
  • मिश्र पीकपद्धतीचा वापर 
  • प्रत्येक पिकाचे यशापयश नेमके जाणून कोणत्या पिकातून किती उत्पन्न मिळाले पाहिजेत याचे आडाखे ठरलेले. तेवढे पैसे मिळाले तरच ते पीक पुढे घेतले जाते. 
  • शिवगंगा नदी जवळून वाहत असल्याने फेब्रुवारीपर्यंत पाणी राहते. उन्हाळ्यामध्ये विहीर व बोअरवर भागते.  
  •    नावीन्यतेचा ध्यास
    कोठेही नवे पीक दिसले की जायगुडे यांची उत्सुकता वाढते. त्यातील नफा- तोटा यांचे गणित मांडून प्रयोगाचा निर्णय घेतात. तमिळनाडू येथून आणलेल्या सांबर ओनियन नावाने अोळखल्या कांद्याची गेल्या वर्षी प्रथमच अर्धा एकर क्षेत्रात लागवड- तीन टन उत्पादन- विशिष्ट चवीमुळे ८० पासून ते तब्बल १४० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळाला.  यंदा मसाल्याच्या रोपांची लागवड. 
    पाच एकरांत कालीपत्ती चिकू १६०, लाल गराच्या पेरूची सघन पद्धतीने ४५० झाडे.फळबागेत भाज्यांचे आंतरपीक
       तांत्रिक वैशिष्ट्ये 
    दरवर्षी रोटाव्हेटरने कमीत कमी मशागत. पालापाचोळा, पिकांचे अवशेष बारीक करून गाडले जातात. बागेत झाडाखाली खड्डा तयार करून दरवर्षी पाच ते सहा टनांपर्यंत गांडूळ खतनिर्मिती. गांडूळ कल्चर अनेक शेतकऱ्यांना मोफत दिले. अलीकडे त्यासाठी पाचशे रुपये अनामत म्हणून घेतात. पुढे त्या शेतकऱ्याच्या शेतात वाढलेली गांडुळे पाहिल्यानंतर हळूच खिशातून पाचशे रुपये काढून त्याच्या हाती सरकवतात. मोफत दिलेली काही ठिकाणी गांडुळे मृत आढळल्यानंतर हे पाऊल उचलले. किडींच्या नियंत्रणासाठी मिश्रपीक पद्धती, चिकट सापळे, गंधसापळे, जैविक कीडनाशकांचा वापर. शेतात मित्रकीटकांची संख्या वाढली आहे. उदा. लाल भेंडीत प्रत्येक पानागणिक पाच ते सहा लेडीबर्ड बीटल मित्रकीटकाच्या अळ्या व प्रौढ आढळल्या. जायगुडे म्हणतात की हेच आमचे सैनिक असून माव्याचा फडशा पाडतात.  गरजेपुरते ठिबक. शेतीचा प्रत्येक भाग जिवंत आहे, त्यासाठी पाटाचेच पाणी हवे ना! अगदी तण देखील शेतीला नत्र देते असेही ते म्हणतात.   
      विक्रीच्या पद्धती
  • करार शेती पद्धतीत भाज्यांच्या प्रकारानुसार किलोला ४० रुपयांपासून ते कमाल २०० रुपये दरम्यान हंगामानुसार दर ठरले आहेत. करारांतर्गत कंपनीची गाडी शेतातून माल घेऊन जाते. ठरल्यापेक्षा अधिक माल लागत असल्यास बाजारातील दरांप्रमाणे पुरवठा.  
  • गावातील कृषी भरारी शेतकरी बचत गटामार्फत आठवडी बाजारात स्टॉल लावूनही विक्री
  • पुणे शहरातील वारजे भागात एका निवासी सोसायटीत सेंद्रिय माल विक्रीचा प्रयोग. सोसायटीतील मुलांना उन्हाळी सुटीत विक्रीत सहभागी केले. यातून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळाले. शिवाय ग्राहकांना रास्त दरात माल उपलब्ध झाला. हा प्रयोग अन्य सोसायट्यांमध्ये राबवण्याचे नियोजन.
  •   बांधावरही खजाना
  • शेवगा- १५० झाडे. बांधीव दर- ८० रुपये प्रति किलो. पाल्याची विक्रीही यंदा आयुर्वेदिक कंपनीला ८० रुपये प्रति किलो दराने केली.  
  • लिची- पाच झाडे. प्रति वर्ष २२ ते ३५ किलो फळे- २५० ते ३०० रु. प्रति किलो दर मिळतो. 
  • बहाडोली जांभूळ- प्रति झाड १५० ते ३०० किलो उत्पादन- १२० रुपये प्रति किलो दर.  
  • नरेंद्र सात आवळा- ६५ झाडे- ६० रुपये प्रति किलो दर. राय आवळ्याची ८ झाडे. खाण्यासाठी मोठी मागणी   
  •  अॅव्हाकॅडोची ९० झाडे. उत्पादन सुरू होईल.
  • आकाराने मोठी, सीडलेस थाय लेमनची (लिंबू) ५२ झाडे. सोळाव्या महिन्यातच प्रति झाड ८ ते १० किलो फळे मिळण्यास सुरवात. किलोला ८० रु. दर. 
  • आंब्याची १० झाडे. त्यातील एक श्रावण कैरीचे. त्याला श्रावणात फळे येतात. सातशे ते एक हजार ग्रॅम वजनाच्या फळांना गेल्या वर्षी शंभर रुपये प्रति किलो दर मिळाला. 
  •  नदीकिनारी शेतीत मेसी बांबूची आठ बेटे. प्रति बेटातून दरवर्षी ५० ते ६० बांबू मिळतात. प्रति बांबू शंभर रु. दर. पिवळ्या शोभेच्या प्रति बांबूस १८० ते २०० रुपये दर. मात्र मागणी थोडी कमी.  
  • बांधावरील शेतीचेच चांगले उत्पन्न हाती येते. महत्त्वाचे म्हणजे बांधावरील झाडांमुळे शेताच्या आतील तापमान स्थिर राहते. पक्ष्यांची संख्या वाढते. त्याचा पीक संरक्षणात फायदा होतो.  
  • संपर्क- श्‍यामसुंदर जायगुडे, ९८९०७९९०७९  (संपर्क वेळ - संध्याकाळी सातनंतर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com