शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले बळ

निशाताईंना पती शशिकांत यांच्यासह मुलेही लाडू पॅकिंगसाठी मदत करतात.
निशाताईंना पती शशिकांत यांच्यासह मुलेही लाडू पॅकिंगसाठी मदत करतात.

पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या भाविकांकडून उपवासाचा पदार्थ म्हणून शेंगालाडू, राजगिरा लाडू तसेच ड्रायफ्रूट लाडूला चांगली मागणी असते, हे लक्षात घेऊन पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सौ. नीशाताई धुमाळ यांनी लघुउद्योग सुरू केला. उत्पादनाचे वेगळेपण जपण्यासाठी "विठ्ठल-रुक्‍मिणी'' हा ब्रॅंड तयार केला. या ब्रॅंडमुळे बाजारपेठेत त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या भाविकांकडून उपवासाचा पदार्थ म्हणून शेंगालाडूची मागणी असते. हे लक्षात घेऊन पंढरपुरातील शिवरत्ननगरमध्ये राहणाऱ्या सौ. नीशाताई शशिकांत धुमाळ यांनी घरगुती स्तरावर शेंगालाडू निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. नीशाताईंचे पती शशिकांत यांचा रिक्षाच्या स्पेअरपार्ट विक्रीचा छोटासा व्यवसाय आहे. नीशाताई या दहावीपर्यंत शिकल्या आहेत. पहिल्यापासून त्यांना स्वतःचा छोटासा प्रक्रिया व्यवसाय असावा, असे वाटत होते, पण नेमके काय करायचे हे सुचत नव्हतं. पंढरपूर ही वारकऱ्यांसाठी दक्षिण काशी. इथे रोज लाखो भाविकांची ये-जा सुरू असते, भाविकांच्या सोयीच्या दृष्टिने एखादा व्यवसाय करावा, असं नीशाताईंना सुचलं. मग त्यातूनच उपवासासाठी मागणी होणारा शेंगालाडू व राजगिरालाडू या पदार्थाकडे त्या वळल्या. साधारण २०१४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी या व्यवसायाची सुरवात केली. पतींनीही त्यांना पाठिंबा दिला. पहिल्यांदा त्यांनी ३० किलो शेंगालाडू तयार केले. पण अवघ्या दोनच दिवसात ते संपले. अर्थातच ही ग्राहकांनी दिलेली पोचपावती होती. त्यानंतर त्यांचा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला. लाडूला असलेली विशिष्ट चव ग्राहकांच्या पसंतीला उतरली होती. मग  बघता बघता लाडूची विक्री वाढत गेली. आज महिन्याकाठी दोनशे किलो शेंगालाडूची विक्री होते. गुणवत्तेमुळे लाडूंना मागणी वाढली असल्याने त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज पतीसह दोन्ही मुली आणि मुलगा असं सगळं कुटुंब लाडू निर्मितीत हातभार लावते.

कडक भाकरी, गावरान मसाल्यांनाही पसंती शेंगालाडू निर्मिती हा नीशाताईंचा मुख्य व्यवसाय असला, तरी अलीकडे त्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेंगा पोळी, कडक भाकरी आणि गावरान मसाले तयार करण्यास सुरवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार पालक भाकरी, थालीपीठ, बेसण कापण्या त्या करून देतात. पदार्थांच्या चवदरापणामुळे त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी आहे. पंढरपुरासह परिसरातूनही छोट्या-मोठ्या व्यावसायिकाकडून त्यांच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः गावरान काळे तिखट, कोल्हापुरी मसाल्यास परिसरातील ग्राहकांकडून सातत्याने मागणी असते. उत्पादनांची वाढली उलाढाल शेंगालाडूंची ४५ ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम या पॅकिंगमध्ये विक्री केली जाते. शेंगालाडू १०० रुपये आणि ड्रायफ्रूट शेंगालाडू १२० रुपये किलो, कोल्हापुरी मसाले ४०० रुपये किलो, गावरान काळे तिखट २०० रुपये किलो, थालीपीठ, शेंगापोळी प्रत्येकी १० रुपये, बेसण कापण्या ४० रुपये पाव किलो प्रमाणे विक्री केली जाते. याचबरोबरीने त्या सोयालाडू शंभर रुपये पाव किलोप्रमाणे विकला जातो. दरमहा सर्वाधिक शेंगालाडू सुमारे दोनशे किलोपर्यंत विकला जातो. महिन्याकाठी सर्वसाधारणपणे ४० ते ४५ हजारांची उलाढाल होते. त्यातून खर्च वजा जाता वीस हजार रुपये इतका नफा नीशाताईंना मिळतो. मेक इन इंडियात कौतुकाची थाप केंद्र व राज्य शासनाने लघुउद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मुंबईत दोन वर्षांपूर्वी आयोजित मेक इन इंडिया या कार्यक्रमात सादरीकरणासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यातील दहा लघुउद्योजकांना पाठविण्यात आले होते. त्यात सौ. नीशाताई धुमाळ यांचा समावेश होता. या कार्यक्रमातील मान्यवरांकडून त्यांना प्रक्रिया उद्योगातील प्रगतीबद्दल कौतुकाची थाप मिळाली. कृषी विज्ञान केंद्र, रुरल डेव्हलपमेंटची मदत सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाच्या सौ. अनिता शेळके, मंगळवेढ्यातील महाराष्ट्र टेक्‍निकल एज्युकेशन ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे दत्तात्रय खडतरे, कविता खडतरे यांनी नीशाताईंना मदत केली. बॅंक कर्जापासून ते व्यवसायातील छोट्या-मोठ्या बाबी त्यांच्याकडून नीशाताईंना शिकायला मिळाल्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून त्यांनी अडीच लाखांचे कर्ज घेतले आणि वेळेत त्याची परतफेड केली. बचत गटांना निशिगंधा सहकारी बॅंकेनेही कर्ज दिले आहे. दहा बचत गटांची उभारणी नीशाताईंनी आपल्या प्रक्रिया उद्योगाची वाढ केली. त्याचबरोबरीने आपल्याबरोबर अन्य महिलांनाही रोजगार मिळावा, यासाठी २०१६ मध्ये यशस्विनी महिला गृहउद्योग ही संस्था सुरू केली. याचबरोबरीने शिवरत्ननगर परिसरात नालंदा महिला सामाजिक व आर्थिक विकास संर्स्थेतर्गत महिला बचत गटाचे जाळे तयार केले. यातून दहा बचत गट तयार झाले. बचत गटासाठी राणी क्षीरसागर, आशा शिर्के, उमा डोंबे, मोहिनी थिटे, प्रज्ञा निकम यांची मदत झाली. आज हे बचत गट शेंग, जवस, कारळा चटणी बनवितात. एक बचत गट दुग्ध व्यवसाय करतो. दूध विक्रीच्या बरोबरीने खवा निर्मितीवर गटाने भर दिला आहे. एक बचत गट ग्राहकांच्या मागणीनुसार शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवून देतो. व्यवसायाच्या दृष्टिने हे गट एकमेकांना पूरक ठरले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com