उत्पन्नाच्या विविध स्राेतांमधून शेतीतील जोखीम केली कमी

डाळिंब बागेचे नेटके व्यवस्थापन असते. बागेत रामभाऊ व सागर शिंदे.
डाळिंब बागेचे नेटके व्यवस्थापन असते. बागेत रामभाऊ व सागर शिंदे.

डाळिंब, द्राक्ष शेतीचे उत्तम व्यवस्थापन, त्यास दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनाची पूरक जोड, स्वतःच्याच शेतातील चारा आणि सोबत द्राक्षांची ‘नर्सरी’ही. असे उत्पन्नाचे विविधांगी स्राेत निर्माण करीत पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील शिंदे बंधूंनी शेती व्यवसायातील जोखीम कमी केली आहे. त्याद्वारे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर केला आहे.

संधी आपल्या अवतीभवतीच असतात. फक्त त्या ओळखून त्यांचं सोनं करता आलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतच्या गावशिवारात (ता. निफाड) रामभाऊ रावसाहेब शिंदे, सागर अरुण शिंदे आणि उद्धव पुंडलिक शिंदे या चुलत बंधूंनी पारंपरिक शेतीची एकसुरी पद्धत टाळून परिसरातील उपलब्ध संधींचा पुरेपूर विनियोग करायचे ठरवले. तिघेही उच्चशिक्षित असून शेती हा व्यवसाय म्हणूनच केला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन आहे.   संकटे, कर्जबाजारी समस्या कमी केली केवळ पीक उत्पादनावरच सर्व ‘फोकस’ न ठेवता पूरक उद्योगांची जोड दिली तर नफ्याचे मार्जीन अधिक वाढेल यावर तिघा बंधूंचं एकमत झालं. मागील दहा वर्षांपासून त्यांनी याच पद्धतीने शेतीची आखणी केली आहे. परिणामी संकटाच्या काळातही नुकसानीची तीव्रता कमी करणे त्यांना शक्य झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्जबाजारीपणाला दूर ठेवता आले.  

जबाबदाऱ्या घेतल्या वाटून तिघा बंधूंपैकी रामभाऊ यांचं शिक्षण बीकॉमपर्यंत, सागर बीएपर्यंत तर उद्धव एमकॉमपर्यंत शिकले आहेत. शेतीतील जबाबदाऱ्या त्यांनी वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार रामभाऊ यांनी पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. सागर यांनी पीक उत्पादन तर उद्धव यांनी द्राक्षाची रोपवाटिका सांभाळायचं ठरवलं. परस्परांशी उत्तम समन्वय ठेवून मागील किमान दशकापासून आपापलं कार्यक्षेत्र ते उत्तमपणे सांभाळीत आहेत. याच काही गोष्टींचा सामाईक फायदाही होतो. उदाहरण द्यायचे तर मिळणाऱ्या शेणखताचा सर्वांनाच लाभ होतो. तिघांचेही आर्थिक व्यवहार स्वतंत्र आहेत. तरीही परस्परांना गरजेनुसार भांडवलाची मदत केली जाते. यामुळेच आर्थिक व्यवहारांसाठी कर्जावर अवलंबून राहण्याची वेळ शक्यतो आली नाही हे विशेष! शेतीचे नियोजन

  • सागर यांच्याकडे शेती किंवा पीक उत्पादनाची जबाबदारी आहे. त्यांची शेती पुढीलप्रमाणे आहे.
  • डाळिंब- (९ वर्षांची बाग)- क्षेत्र- साडेतीन एकर
  • द्राक्ष- (१० वर्षांची बाग) : क्षेत्र अडीच एकर
  • डाळिंब वाण : भगवा
  • द्राक्ष वाण : सुधाकर सीडलेस, शरद सीडलेस
  •   शेतीची वैशिष्ट्ये

  • पिकाच्या प्रत्येक अवस्थेत पाणी व्यवस्थापनावर भर
  • रासायनिक खतांचा वापर अत्यंत कमी  
  • जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न
  • शेणखताच्या वापरावर भर
  • जैविक आणि सेंद्रिय खतांचा गरजेनुसार वापर
  • प्रत्येक काम वेळेत करण्यावर भर
  • रासायनिक किडनाशकांचा अत्यंत कमी वापर
  • डाळिंबाची छाटणी जानेवारीत होते.
  • नैसर्गिक पानगळ करण्यावर भर
  • ऑगस्टअखेरीस डाळिंब उत्पादन सुरू होते.
  • द्राक्ष उत्पादनात एकरी १२ टनांच्या आसपास सातत्य.
  • संशोधन केंद्रातील तज्ज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांच्या नेहमी संपर्कात
  • डाळिंब तज्ज्ञ डॉ. विनय सुपे, प्रयोगशील शेतकरी खंडू शेवाळे हे मार्गदर्शक.
  • दुग्ध व्यवसाय  

  • दुग्ध व्यवसाय हा शिंदे कुटुंबीयांचा मागील ५० वर्षांपासूनचा पारंपरिक व्यवसाय आहे. तिसऱ्या पिढीतील रामभाऊ दहा-बारा वर्षांपासून ही जबाबदारी पेलतात.  
  • म्हशींची संख्या - १० (जाफराबादी)
  • एकूण गायींची संख्या - २- (१ होल्स्टिन फ्रिजियन, १ जर्सी)
  • दररोजचे दूध संकलन- शंभर लिटरपर्यंत
  • यात म्हशीचे दूध - ६० लिटर (मिळणारा सरासरी दर प्रतिकिलो ५० रु.)
  • गाईचे दूध- ४० लिटर (मिळणारा सरासरी दर ४० रुपये)
  • सर्व दूध थेट ग्राहकांना घरपोच दिले जाते.
  • चारापिकांचेही योग्य नियोजन केले आहे.  
  • पोल्ट्री व्यवसाय मागील दोन वर्षांपासून सुरू केला आहे. उत्पादनाचे आतापर्यंत 6 सर्कल पूर्ण केले आहेत. सद्यःस्थितीत 7 वे सुरू आहे.
  • पोल्ट्री व्यवसाय

  • गिरिराज, कावेरी, आर. आर. आदी वाण पाळले जातात. देशी वाणांच्या संगोपनावर भर
  • शेडची क्षमता एक हजार पक्ष्यांची असून, २० बाय ४० फूट त्याचे क्षेत्रफळ आहे.
  • शेड बांधणीला एकूण एक लाख ३५ हजार रुपये खर्च झाला.
  • सटाणा तालुक्‍यातील हॅचरीचकडून पिले मागवली जातात. सुमारे २० रुपये दराने पिलू मिळते.
  • पक्षी ६० ते ७५ दिवसांत तयार होतात.
  • ब्रुडिंग, लसीकरण आदी प्रक्रिया वेळेत केल्या जातात.
  • पिलांना पाण्यातून पोषक घटक दिले जातात.
  • एक किलो ते १२०० ग्रॅम वजनाचा पक्षी तयार करून विक्रीसाठी तयार केला जातो.
  • देवळा, निफाड, नगर भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी होते.
  • रोपवाटिका व्यवसाय शिंदे यांच्या शेतीचा परिसर हा पिंपळगाव बसवंत भागातील द्राक्षांच्या नर्सरीचे आगार म्हणून ओळखला जातो. इथे अनेक व्यावसायिक द्राक्षांची रोपे तयार करतात. उद्धव शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या व्यवसायात केला आहे. खात्रिशीर रोपे मिळण्याचे ठिकाण अशी त्यांनी अोळख तयार केली आहे.   कामाचे व्यवस्थापन

  • दुग्ध व्यवसाय - पहाटे ५ ते दुपारी १२, दुपारी ३ ते ६  
  • यात शेण काढणे, कुट्टी देणे, खाद्य देणे, दुध काढणे, स्वच्छता करणे आदी कामे.
  • सकाळी व सायंकाळी दूध काढणी होते.
  • कुक्कुटपालन -दुपारी १२ ते ३ या वेळेत व्यवस्थापन
  • संपर्क : रामभाऊ शिंदे : ९५०३८११७७०, सागर शिंदे : ९६५७५३०१८४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com