‘कॅलसिंग'तंत्राने द्राक्ष रोपनिर्मितीचा प्रयोग

द्राक्ष रोपवाटिकेमध्ये नितीन घावटे आणि सचिन घावटे.
द्राक्ष रोपवाटिकेमध्ये नितीन घावटे आणि सचिन घावटे.

पिंपळगाव पान (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नितीन घावटे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्याधुनिक द्राक्ष रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेमध्ये त्यांनी द्राक्ष रोपांची निर्मिती करण्यासाठी कॅलसिंग तंत्राचा अवलंब केला आहे. या रोपांना विशिष्ट वातावरणात वाढविले जाते. या तंत्राने पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी कालावधीत दर्जेदार रोपनिर्मिती करणे शक्य आहे, असा त्यांना विश्वास वाटतो. सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैरागपासून आत वीस किलोमीटरवर पिंपळगाव पान या गावशिवारात नितीन घावटे यांची द्राक्षशेतीची प्रयोगशाळा विस्तारली आहे. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. पारंपरिक पिकाच्या एेवजी नितीन आणि त्याचे मोठे बंधू सचिन या दोघांनी मोठ्या कष्टाने द्राक्षशेतीला सुरवात केली. गेल्या बारा वर्षांत द्राक्ष शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर आणि विविध जातींची लागवड करत दर्जेदार उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. शेतीमधील नवीन तंत्राच्या वापरासाठी त्यांना त्यांचे भाऊजी तुकाराम सुरवसे यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. गेल्या बारा वर्षांत द्राक्षातील अभ्यासामुळे प्रत्येक टप्यात बागेचे त्यांनी काटेकोर नियोजन करत उत्पादनात सातत्य राखले आहे. निरीक्षणशक्तीच्या या बळावरच गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी द्राक्ष रोपवाटिकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. सध्या त्यांनी द्राक्ष रोपनिर्मितीसाठी कॅलसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यातील काही आधुनिक रोपवाटिका तसेच हॉलंड, इटाली या देशातील रोपवाटिकांना भेटी दिल्या. तेथे त्यांना रोपनिर्मितीसाठी कॅलसिंग तंत्रज्ञानाची माहिती झाली. त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी केला आहे. सन २००३ पासून नितीन आणि सचिनने घरच्या शेतीत लक्ष घातले. त्या वेळी थोडेसे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र होते. परंतु, द्राक्ष बागेचे योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत त्यांनी वेगळेपण जपले आहे. याबाबत नितीन नितीन घावटे म्हणाले की, आम्ही टप्प्याटप्प्याने द्राक्ष लागवड क्षेत्र वाढवत गेलो. सध्या माझी पंधरा एकरांवर द्राक्ष लागवड आहे. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन सुपर सोनाका, माणिक चमन, थॉमसन क्लोन, नानासाहेब जंबो या जातींची लागवड आम्ही केलेली आहे. द्राक्ष बागेचे हंगामानुसार योग्य नियोजन, योग्य कालावधीत छाटणी, माती पाणी परीक्षणानुसार खतमात्रांचे नियोजन, वेळेवर कीड, रोगांचे नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करून आम्ही एकरी सरासरी १८ टन द्राक्ष उत्पादन घेतो. जातीनुसार आणि बाजारपेठेनुसार आम्हाला सरासरी प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. ट्रॅक्‍टर, ब्लोअर यासारख्या यंत्रांचा जास्तीत जास्त वापर करतो. कमीत कमी मनुष्यबळावर बागेचे व्यवस्थापन करण्यावर आमचा भर आहे. कॅलसिंग तंत्राने द्राक्ष रोपनिर्मिती पारंपरिक पद्धतीने द्राक्ष रोपनिर्मिती करण्याबरोबरीने गेल्यावर्षीपासून नितीन घावटे यांनी द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी कॅलसिंग तंत्राचा वापर एक प्रयोग म्हणून सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी त्यांनी हॉलंड, इटलीचा दौरादेखील केला. येथील तंत्रज्ञान रोपांच्या निर्मितीत वापरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या रोपनिर्मितीबाबत नितीन घावटे म्हणाले की, खुल्या जागेवर तयार केलेल्या रुटस्टॉक रोपातून १८ ते २० इंचाच्या दर्जेदार काड्या काढल्या जातात. त्यानंतर पाचर कलम पद्धतीने त्यावर आपल्याला हव्या असणाऱ्या जातीचे कलम केले जाते. त्यानंतर कलम केलेली काडी नेट पॉटमध्ये लावली जाते. या कलम केलेल्या काड्या पॉलिहाऊसमध्ये योग्य आर्द्रता आणि विशिष्ट वातावरणात ठेवल्या जातात. नेट पॉटमध्ये साधारणपणे २७ दिवसांमध्ये काडीला मुळ्या फुटतात. त्यानंतर मुळ्या फुटलेल्या काड्या पाच किलो माती असलेल्या मोठ्या पिशवीत लावल्या जातात. मातीमुळे मुळांची तसेच कलमाचीदेखील जोमदार वाढ होते. मातीच्या पिशवीत ही रोपे चांगल्या प्रकारे रूजतात. रोपवाढीच्या टप्प्यात योग्य काळजी घेतल्याने रोपे सशक्त होतात. ही रोपे साठ दिवसांत तयार होतात. साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत ही रोपे मुख्य शेतात लागवडीसाठी दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात रोप व्यवस्थापनाचा खर्च वाचणार आहे. सध्या आम्ही शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सुपर सोनाका, माणिक चमन, नानासाहेब जम्बो, थॉमसन क्‍लोन, शरद सीडलेस या जातींची रोपे तयार करत आहोत. नेहमीच्या पद्धतीपेक्षा लवकर ही रोपे तयार होत असल्याने निश्चितपणे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात वाढणार आहे. येत्या काळात पाचर कलम करण्यासाठी परदेशातून यंत्र आम्ही आणत आहोत. त्यामुळे मजुरांची बचत होईल. तीन एकरांवर केली लागवड नितीन घावटे यांनी स्वतःच्या तीन एकर क्षेत्रावर कॅलसिंग तंत्राने निर्मिती केलेल्या रोपांची लागवड केली आहे. याबाबत ते म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच या रोपाची लागवड आमच्या शेतीमध्ये केलेली आहे. सध्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. रोपवाटिकेत रोपांची योग्य काळजी घेतली असल्याने पारंपरिक रोपांच्यापेक्षा  नवीन रोपांचा वाढीचा वेग चांगला आहे. आॅक्टोबर महिन्यात या नवीन रोपांच्या लागवडीपासून पहिले द्राक्ष उत्पादन सुरू होईल. उत्पादन आल्यानंतर या रोपांच्या लागवडीचे फायदे कळून येतील. योग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन शक्य साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये रोपवाटिकेत तयार झालेली रोपे शेतात लावली जातात. त्यानंतर खोड, ओलांडा, मालकाडी तयार होण्यासाठी सप्टेंबर, आॅक्टोबर हा महिना येतो. मालकाडी तयार होऊन काडी परिपक्व होण्यास सप्टेंबर शेवट ते २० आॅक्टोबरचा कालावधी येतो. नवीन लागवड केलेल्या बागेत पहिल्यावर्षी फळछाटणी उशीरा म्हणजेच आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेतली जाते. त्यानंतर साधारणपणे फळ काढणीपर्यंत जातीनुसार १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. - डॉ. आर. जी. सोमकुवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे नितीन घावटे, ९६२३८६६९३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com