एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह

उसात आंतरपीक घेऊनही देशी बियाणे तयार केले जाते. देशी बियाणांची छोटी पाकिटे
उसात आंतरपीक घेऊनही देशी बियाणे तयार केले जाते. देशी बियाणांची छोटी पाकिटे

काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ दिवसांत येणारा तांदूळ यासह विविध भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्य आदी मिळून सुमारे १२५ प्रकारचा देशी पीकवाणांचा संग्रह. आश्चर्यचकीत झालात ना! पोखरापूर (जि. सोलापूर) येथील अनिल गवळी या अवलिया तरुणाने ही देशी बियाणांची बॅंक उभारली आहे. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या देशी बियाण्याचे संवर्धन तो एखाद्या व्रतस्थाप्रमाणे करतो आहे. विक्रीबरोबर प्रसार, प्रचार हा देखील त्यामागील मुख्य उद्देश आहे..   मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी पीकवाणांचा संग्रह त्यांनी आपल्या शेतात केला आहे. देशी वाणांचा संग्रह नऊ वर्षांपासून देशी बियाणांवर अनिल काम करीत आहेत. हे काम अत्यंत जिकिरीचं, कष्टाचं आणि चिकाटीचं होतं. पण, अनिल त्यात यशस्वी झाले आहेत. मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, त्यांचे सहकारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे. असा छंद, असे समाधान देशी बियाणांचा छंद जोपासताना पैसे किती मिळतात यापेक्षा काळाच्या ओघात संपत चाललेलं देशी धन मी लोकांना परत देतो आहे याचं मोठं समाधान असल्याचं अनिल सांगतात. शिवाय त्यातून अर्थप्राप्ती होतेच. हे वाण शेतात घेण्यासाठी सहा एकर क्षेत्र राखीव ठेवलं आहे. देशी वाण संग्रह- वैशिष्ट्ये

  • मिळालेल्या बियाणांचं संवर्धन करण्याबरोबर त्यातून पुन्हा नवे बियाणे तयार केले जाते.
  • आत्तापर्यंत तब्बल १२५ प्रकारच्या विविध पिकांच्या देशी बियाणांचा संग्रह
  • यात भाजीपाल्यांचे १५, कडधान्य, तृणधान्याे प्रत्येकी २०, फळभाज्या व वेलवर्गीय भाज्या ६० व अन्य १० असा समावेश.
  • बियाणे द्या, देशी बियाणे घ्या'

  • राज्यभरात विविध कृषी प्रदर्शने, कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल फिरतात त्या वेळी त्यांची शोधक नजर फक्त देशी बियाणांवर असते. यात सोलापूरची दगडी ज्वारी, मराठवाड्यातील देशी तूर, लाल, पिवळी ज्वारी, जळगावची दादरा असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक जातीची आपली चव, पौष्टिक गुणधर्म व वैशिष्ट्ये आहेत.
  • एखाद्याकडे वेगळे बियाणे मिळाले तर ते घेऊन त्या बदल्यात आपल्याकडचे बियाणे त्याला मोफत दिले जाते. या साध्या सूत्रातूनच बियाणे संग्रह वाढण्यास मदत होत आहे.
  • कृषि प्रदर्शनातून विक्री, प्रसार कृषी विभाग, स्वयंसेवी संस्था आदींच्या वतीने जिल्हा, राज्यस्तीय प्रदर्शने भरवली जातात. यामध्येही अनिल आपला स्टॉल उभा करतात. बियाणांचा प्रसार होण्यासाठी दहा ग्रॅमचे पाऊच बनवून त्याची २० रुपयांत विक्रीही केली जाते. देशी भाज्यांबाबतचे निरीक्षण विविध भाज्यांचे संकरित बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. पण, सूक्ष्म निरीक्षणांद्वारे देशी बियाण्याची अोळख करून घेता येते असे अनिल सांगतात. उदाहरणच सांगायचं तर मेथी, पालक किंवा अन्य भाज्यांच्या पानाच्या कडेला बारीक लाल रेषा किंवा खालील बाजूच्या मुळ्या लाल असतात, असे अनिल सांगतात. देशी बियाणांचे उत्पादन अनिल बीजोत्पादनासंबंधीचे उदाहरण देतात. एक जून ते एक आॅक्‍टोबरच्या दरम्यान पावसाच्या परिस्थितीनुसार देशी टोमॅटो लागवड करतो. तीन-साडेतीन महिन्यापर्यंत टोमॅटो चांगल्या पद्धतीने परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो चांगला पिकतो, पक्व होतो, त्याला चिऱ्या पडतात किंवा देठ सुकतात. तेव्हा तो मध्यभागी चिरायचा. दोन भाग करून रात्रभर पाण्यात भिजवायचा. दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून चांगल्या प्रतीचे बियाणे गोळा करून ते राखेत ठेवून द्यायचे. पुढे गरजेनुसार हे बियाणे वापरता येते. किमान दोन वर्षांपर्यंत ते टिकून राहते. हाच निकष काकडी, वांगी अादींसाठीही लागू होतो. विकत घेण्यााची गरज उरलेली नाही अनिल सांगतात की पूर्वी शंभर एकरांपर्यंत शेती होती. आजोबा ज्वारी, गहू, शेंगा, भाजीपाल्यासह सगळं शेतात पिकवायचे. फक्त कापड आणि मीठ तेवढं विकत आणलं जायचं. घरी गरज भागवून धान्य, भाजीपाला विक्रीसाठी बाजारात नेलं जायचं. आज संकरित बियाणांचा वाढलेला वापर आणि रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या आहेत. धान्यही कमी पिकू लागलं. परिणामी, प्रत्येक वस्तू आज विकत आणावी लागते. मला हे थांबवायचे आहे. त्यासाठी देशी बियाणे संवर्धनाचा माझा प्रयत्न आहे, असेही अनिल गवळी आवर्जून सांगतो. उपलब्ध देशी बियाणे (प्रातिनिधीक)

  • विविध भाजीपाला
  • ब्याडगी, जवारी मिरची
  • काटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे
  • हिरवी, पांढरी काटेरी काकडी
  • काशी भोपळा
  • काळा व लाल पावटा
  • पांढरा, लाल मोठा वाल
  • गोल, काशी, चेरी टोमॅटो
  • काळा वाटाणा, लाख
  • लाल, काळी, पांढरी फररसबी
  • लाल, काळा, पिवळा झेंडू,
  • झुडपी चवळी, लाल वेलीची चवळी
  • एरंड, जवस, कारळे, पिवळी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू,
  • दगडी ज्वारी, गूळभेंडी, कुचकुची हुरडा, पिवळी, लाल ज्वारी,
  • लाल, पांढरा, जांभळी मका
  • हरभरा, उडीद, तीळ यांचे विविध प्रकार
  • लाल, घुंगरू भुईमूग
  • कणसाचे लाल दाणे असलेली बाजरी
  • हादगा, शेवगा
  • संपर्क : अनिल गवळी, ९७६७७६७४९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com