‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित ‘प्रिसीजन फार्मिंग’

‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित ‘प्रिसीजन फार्मिंग’
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित ‘प्रिसीजन फार्मिंग’

अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे शेतीतील समस्या कमी करण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत. मोहाडी (जि. नाशिक) येथील ‘सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी’च्या द्राक्ष बागायतदार सदस्यांनी अशाच प्रणालीचा आधार घेत ‘प्रीसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती)चा आदर्श घडवला आहेत. व्यवस्थापन प्रभावी, अचूक करण्यासह खर्चात बचत करून शेती अधिक सूकर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. नऊ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारत या शेतकरी कंपनीने देशात वेगळा आदर्शही निर्माण केला आहे. बेरभवशाचे हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, मजूरटंचाई, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाचे असमाधानकारक दर अशा विविध समस्यांमधून शेतकरी सध्या जातो आहे. व्यवस्थापन काटेकोर, अचूक करण्यासह खर्च कमी करून शेती अधिक सुकर कशी करता येईल, याचा अभ्यास पुणे स्थित ‘किसान हब’ कंपनीने केला. त्यानुसार ‘प्रीसिजन फार्मिंग’चे (काटेकोर शेती) प्रत्यंतर देणारी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली व ‘ॲप’ विकसित केले. केंब्रीज (इंग्लंड) येथे कंपनीचे मुख्यालय अाहे. नाशिक येथील प्रयोगशील व उद्योजक शेतकरी विलास शिंदे यांच्या ‘सह्याद्री’ शेतकरी उत्पादक कंपनीसोबत सध्या ही कंपनी ‘प्रीसिजन फार्मिंग’चा हा प्रणाली प्रकल्प राबवत आहे. नाशिक जिल्ह्यात ‘सह्याद्री’च्या कार्यक्षेत्रात नऊ स्वयंचलित हवामान केंद्रे (ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स) विविध ठिकाणी उभारण्यात आली आहेत. ‘सह्याद्री’चे १२०० बागायतदार या प्रणालीचा लाभ घेत आहेत. डाळिंब व केळीतही असे प्रकल्प ‘सह्याद्री’सोबत कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या तंत्रज्ञान प्रणालीची वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्याच्या संपूर्ण शेताचे प्लॉटनिहाय ‘डिजिटल मॅपिंग’
  • ॲटोमॅटिक वेदर स्टेशन’ची उभारणी. त्याद्वारे शिवारातील (सुमारे पाच किलोमीटर परीघ) हवामान घटकांच्या नोंदी
  • उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतावर दररोज ‘मॉनिटरिंग’
  • दररोज पुढील सात दिवसांचा हवामानाच्या विविध घटकांचा अंदाज
  • त्या आधारे पीक, माती आदींचा दररोजचा तपशील (डाटा) उपलब्ध. त्या आधारे परिस्थितीचे विश्लेषण करून मशागत, पेरणी, कीड-रोग, सिंचन ते काढणीपर्यंत दररोज शास्त्रीय मार्गदर्शन
  • किडी-रोगांचा आगाऊ अंदाज (धोका)
  • वर्तवलेले हवामान अंदाज व प्रत्यक्षातील आकडेवारी तपशीलही उपलब्ध.
  • मार्गदर्शनासाठी लेख, व्हिडिअो, आॅडिअो यांचा वापर
  • शेती व्यवस्थापनातील साऱ्या नोंदी (‘रेकॉडर्स’)
  • तंत्रज्ञान प्रणाली वापरणाऱ्या समूहातील शेतकऱ्यांची एकत्र बांधणी. त्याद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण, शंका समाधान
  • मोबाईलद्वारे प्रणालीचा वापर
  • निविष्ठांचा काटेकोर वापर, उत्पादन खर्चातही बचत
  • ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांचे अनुभव मोहाडी येथील प्रदीप कमानकर ‘सह्याद्री’च्या माध्यमातून द्राक्षे परदेशांत निर्यात करतात. एकरी आठ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. त्यांचे सात एकर क्षेत्र असून, संपूर्ण क्षेत्राचे तीन ‘प्लॉटस’मध्ये ‘जिअो मॅपिंग’ झाले आहे. ते म्हणाले की दररोज तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा, किडी-रोगांचे संभाव्य धोके याबाबत माहिती मिळते. ‘सह्याद्रीचे कंसल्टंट त्यानुसार सल्ला देतात. चार दिवसांनी पाऊस आहे, असा अंदाज मिळाल्यास फवारणी, खते, पाणी यांचे नियोजन करणे सोपे होते. प्रणालीच्या वापरातून विनाकारण ठरू शकणाऱ्या सात ते आठ फवारण्यांमध्ये बचत झाली आहे. प्रतिफवारणीसाठीचा एकरी सुमारे पंधराशे रुपये खर्च वाचवला आहे. प्रणालीद्वारे प्रत्येक प्लाॅटमधील पाणीधारण क्षमता लक्षात येते. त्यानुसार पाणी केव्हा व किती द्यायचे ते समजते. पाण्याच्या सर्व नोंदी ‘ॲप’द्वारे ठेवता येतात.

    उंबरखेड गावातील अनुभव निफाड तालुक्यातील उंबरखेड गाव निर्यातक्षम द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. एकरी ८ ते १० टन व ‘व्हाइट’ व ‘कलर’ अशा द्राक्षांचे उत्पादन होते. येथील नंदकिशोर अाथरे यांच्या घराच्या टेरेसवर वेदर स्टेशन बसविले आहे. नवनाथ अाथरे, बाळासाहेब अाथरे, संजय ढोकरे, प्रताप ढोकरे आदी सहकाऱ्यांनाही या तंत्राचा लाभ घेणे शक्य झाले आहे.

    फवारण्या झाल्या अचूक हे सर्व बागायतदार ‘सह्याद्री’चे सदस्य आहेत. ते म्हणाले की पूर्वी बागेत पानांवर दव आले, की त्यावरून रोगांचा अंदाज यायचा. आभाळ आले की ट्रॅक्टर सुरू करून आठ ते दहा एकरांवर फवारणी सुरू व्हायची. एका दिवसात २० हजार रुपये खर्च व्हायचे. आता शिवारातच ‘वेदर स्टेशन’ असल्याने हवामानाचे सारे घटक मोबाईलवर अभ्यासता येतात. कोणत्या किडी-रोगांसाठी किती आर्द्रता, तापमान अनुकूल आहे, हे त्याद्वारे कळू लागल्याने धोक्याची पातळी अोळखून ‘स्प्रे’ घेण्याचे नियोजन करता येते.

    पावसाचा नेमका अंदाज पूर्वी नाशिक जिल्हा किंवा तालुक्याचा पाऊस माहित व्हायचा. जिल्ह्याच्या एका भागात पाणी, तर माझ्या भागात पाणीच नाही असे व्हायचे. चुकीच्या पद्धतीने खर्च व्हायचा. आता थेट माझ्या शेतातले, मातीतले हवामान समजत असल्याने अंदाजांमध्ये अचूकता आली आहे. आता आमच्याच शिवारातला पाऊस मिलिमीटरमध्ये मोजणे शक्य झाले आहे.

    सिंचनही काटेकोर प्रत्येक पानातून पाण्याचा होणारा ऱ्हास समजतो. येत्या दोन दिवसांत पाणी द्यायचे असेल व पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज सांगितला असल्यास नियोजनात बदल करून पाण्याचा अनाठायी वापर टाळणे शक्य झाले. कोणत्या क्षणी काय निर्णय घ्यायचा हे समजते. भागातील ५० ते ६० शेतकऱ्यांना या प्रणालीचा फायदा होत अाहे. ‘सह्याद्री’च्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन होते.

    बागेतील समस्येचे निदान भरत अाथरे म्हणाले की या बागेत अन्नद्रव्याची कमतरता, विकृती, रोग-किडी आदी कोणतीही लक्षणे दिसली व त्याबाबत शंका असेल तर छायाचित्र काढायचे. ॲपमधील प्रणीलाद्वारे ते पुढे पाठवायचे. ‘सह्याद्री’चे तज्ज्ञ अल्पावधीत निदान व उपाय सांगतात. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना ही माहिती ‘शेअर’ होते.

    अशी आहे तंत्रप्रणाली

  • प्रत्येक शेतकऱ्याचे ‘वैयक्तिक अकाउंट व पासवर्ड
  • ‘सह्याद्री’चे सदस्य सामूहिक स्तरावर प्रणाली वापरतात. त्यामुळे सर्वजण एकमेकांना जोडले जाऊन माहितीची देवाणघेवाण करू शकतात.
  • हवामानाच्या खालील बाबी समजून येतात.
  • किमान व कमाल तापमान
  • ढगांची स्थिती - उदा. अंशतः किंवा पूर्णतः ढगाळ. त्याप्रमाणे ‘सिंबॉल’
  • पर्जन्यमान
  • वाऱ्याचा वेग
  • वाऱ्याचा दाब
  • रेफरन्स इटी- पाण्याचे बाष्पीभवन
  • ड्यू पॉइंट
  • सापेक्ष आर्द्रता
  • ही माहिती आलेख व तक्ता स्वरूपातही उपलब्ध. त्यावरून शेतातील परिस्थितीचे विश्लेषण शक्य.
  • पुढील सात दिवसांतील हवामान घटकांचा अंदाज पाहता येतो.
  • मोबाईलवर हवामानाच्या नोंदी उपलब्ध होतात.
  • संपूर्ण शेताचा व प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र नकाशा तयार केला जातो.
  • प्रत्येक प्लॉटवर ‘क्लिक’ केल्यास त्यातील माती, शेती व्यवस्थापनाचा अहवाल तयार करता येतो.
  • ‘माय रिपोर्ट’ या भागात जाऊन विविध अत्यावश्यक माहितींची नोंद ठेवता येते.
  • ‘माय डॉक्युमेंटस’ विभागात मार्गदर्शनपर लेख, ‘ग्रुप’मधील घडामोडी, ‘व्हिडिअोज’ पाहता येतात. माहिती ‘ॲड’ करणे, ‘ग्रुप’मध्ये ‘शेअर’ करणे व ‘डाउनलोड’ करणेही शक्य.
  • ॲग्रॉनॉमी, पीकवाढीनुसार मार्गदर्शन, शेतकऱ्यांचे अनुभव असे विविध उपभाग.
  • विभागनिहाय व पीकनिहाय शेतकऱ्यांचे गट. त्यामुळे हव्या त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून ज्ञानाची देवाणघेवाण.
  • ‘ॲक्टिव्ह स्मार्ट’ या विभागात पीक, रसायनांचा प्रकार, सक्रिय घटक, कंपनीचे नाव
  • अशी माहिती उपलब्ध. गरजेनुसार ती शोधता येते.
  • येत्या काळात करावयाची कामे, झालेली तसेच अपूर्ण कामे याबाबत ॲलर्टस मिळतात. त्यामुळे नियोजनाला दिशा मिळून कार्यवाही वेळेत पूर्ण करणे शक्य. पूर्ण झालेल्या कांमांपुढे हिरव्या रंगाचा चौकोन, बरोबरचे चिन्ह तर अपूर्ण कामासमोर लाल रंगाचा चौकोन दिसतो.
  • दोन हजार शेतकऱ्यांना फायदा ‘सह्याद्री’चे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, की शेतीतील एकूण व्यवस्थापन, प्रत्येक निर्णय अधिकाधिक अचूक कसा होईल, त्यातून खर्च, श्रम कमी होऊन शेती अधिक सुकर कशी होईल, यावर भर दिला आहे. तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना ‘डिजिटल नेटवर्क’ उभे राहत आहे. आमच्या भागातील हवामानाचे सारे घटक, मातीतील अोलावा, शेतीतील नोंदी असा आवश्यक तपशील (डाटा) उपलब्ध होत आहे.

    दोनशे ‘वेदर स्टेशन्स’चे उद्दिष्ट करारांतर्गत ‘सह्याद्री’च्या कार्यक्षेत्रात नऊ ‘ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स’ उभारली आहेत. त्याचा निम्मा खर्च संबंधित गावांतील शेतकरी गट व निम्मा खर्च सह्याद्री कंपनीने उचलला आहे. आमच्या बाराशे द्राक्ष उत्पादकांना प्रणालीचे चांगले परिणाम दिसत आहेत. येत्या दोन वर्षांत ‘वेदर स्टेशन्स’ची संख्या २०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कमीत कमी वेळेत अचूक सल्ला देण्याचा प्रयत्न आहे. ‘वेदर स्टेशन’चा ‘डाटा’ वापरून अन्य समस्या सोडवणे, त्यासाठी ‘सेन्सर्स’ विकसित करणे ही पुढील उद्दिष्टे आहेत. हवामानावर आधारित पीकविमा हा महत्त्वाचा विषय आहे. त्या संदर्भाने प्रणालीचा वापर करण्याविषयी काम सुरू आहे. कोणतेही सरकारी अनुदान न घेता शेतकरी उत्पादक कंपनीने नऊ ‘वेदर स्टेशन्स’ उभारली हे देशातील पहिलेच उदाहरण असावे.

    इंग्लंडमधील तंत्र भारतीय शेतकऱ्याला देणार ‘किसान हब’चे ‘सीइअो’ डॉ. सचिन शेंडे म्हणाले की लहानपणापासूनच आमच्यावर शेतीचे संसार झाले. जुन्या काळातील कृषी पदवीधर असलेल्या माझ्या वडिलांचे कृषी सेवा केंद्र होते. मी राहुरी येथे कृषी अभियांत्रिकी शाखेतून बीटेक, खरगपूर ‘आयआयटी’ येथून एमटेक व केंब्रीज येथे ‘डॉक्टरेट’ पदवी घेतली. ‘संगणकीय प्रोग्रॅमिंग’ व शेती यांची सांगड, उपग्रह, ‘क्लाउड’, हवामान केंद्रे आदी विविध तंत्रज्ञानांचा मेळ घालून शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आम्ही विकसित केली. त्याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे विश्लेषण करून अचूक निर्णय घेणे व काटेकोर व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. इंग्लंडमधील कार्यक्षेत्रात आम्ही ९० ‘वेदर स्टेशन्स’ उभारली आहेत. तेथे दररोज प्रत्येक शेताची ‘हाय रिझोल्यूशन’ प्रतिमा स्कॅन होते. तेथील संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न आहे.

     संपर्क ः बाळासाहोब अाथरे, ८२०८४४३९९८              नंदकिशोर अाथरे, ९४२३११९३७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com