डाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक सक्षमता

डाळ तयार करताना सपनाताई भाले, निकिता भाले, गिरीजाबाई भाले
डाळ तयार करताना सपनाताई भाले, निकिता भाले, गिरीजाबाई भाले

पूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना पॉलिश मूग, उडीद, तूर, हरभरा डाळीची निर्मिती करतात. शेतकऱ्यांना डाळ तयार करून देण्यासोबतच स्वतः कडधान्य खरेदी करून त्याची डाळ निर्मिती करतात. योग्य पॅकिंग आणि ‘योगिता` ब्रॅंड नावाने त्या डाळींची विक्री करतात. डाळ मिलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार दिला आहे.

भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक झाले. विश्वनाथ, नवनाथ हे फर्निचर तयार करण्याचे काम करतात.   गरज ओळखून सुरू केली डाळ मिल पूर्णा शहराच्या परिसरातील २० ते २५ गावांमध्ये डाळ मिल नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळ तयार करून घेण्यासाठी दूर अंतरावरील गावात असणाऱ्या डाळ मिलमध्ये जावे लागत असे. भाले कुटुंबात तीन महिला सदस्या आहेत. तसेच, शेजारील दोन महिलादेखील प्रक्रिया उद्योगात मदत करण्यासाठी तयार झाल्या. सपनाताईंनी नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन  मिनी डाळ मिल सुरू करण्याचा निर्णय घेतला. सपनाताईंचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. डाळ मिल सुरू करण्यासाठी भांडवल आवश्यक होते. यासाठी एमसीईडीचे शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सपनाताईंनी प्रकल्प अहवाल २०१६ मध्ये पूर्णा येथील बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखेकडे सादर केला. बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक मुकुंद कांबळे, उपशाखा व्यवस्थापक डाॅ. सचिन कापसे, राजेंद्र  ठोंबरे यांनी सपनाताईंचा निर्धार पाहून मुद्रा योजनेअंतर्गत महिला गृहउद्योगांसाठी मिनी डाळ मिल उभारणीस तीन लाख रुपये कर्ज मंजूर केले. डाळ मिलसाठी भाले कुटुंबीयांच्या घरी जागा होती. त्यामुळे भांडवलाची बचत झाली. अकोला येथून मिनी डाळ मिल खरेदी करण्यात आली. त्यासाठी १ लाख ९४ हजार रुपये खर्च आला. सपनाताईंनी विश्वकर्मा गृहउद्योग या नावाने डाळ मिल उद्योगाला सुरुवात केली.

डाळ मिलचे नियोजन  

  • शेतकऱ्यांनी आणलेल्या तूर, मूग, उडीद, हरभरा आदी कडधान्यांचे प्रथम वजन केले जाते.
  • प्रत्येक शेतकऱ्याचे नाव, कडधान्याचा प्रकार, वजन आदी माहिती नोंदवहीत ठेवली जाते.
  • धान्याच्या पिशवीवर शेतकऱ्याचा क्रमांक, नाव  नोंदविले जाते.
  • तूर, मूग, उडदाची मिलमध्ये डाळ तयार करताना योग्य प्रमाणात तेल, पाणी लावून टरफल काढले जाते.
  • टरफले निघालेली डाळ एक दिवस उन्हामध्ये वाळवली जाते.
  • हरभऱ्यापासून डाळ तयार करण्यासाठी स्वतंत्र गिरणी आहे.
  • बारा तासांत पंधरा क्विंटल डाळ निर्मितीची मिनी डाळ मिलची क्षमता.
  • शेतकऱ्यांची पसंती पूर्णा परिसरातील विविध गावांतील  शेतकऱ्यांना भाले यांच्या डाळ मिलबाबत माहिती झाली. सुरुवातीपासून परिसरातील गावांतील शेतकरी भाले यांच्याकडून दर वर्षी डाळ तयार नेतात. गुणवत्तापूर्ण डाळीमुळे शेतकरी-ग्राहकांकडून परिसरातील गावांमध्ये भाले यांच्या डाळ उद्योगाची प्रसिद्धी झाली.

    महिलांना मिळाला रोजगार विश्वकर्मा गृह उद्योगाच्या डाळ मिलमध्ये सपनाताईंच्या सोबत त्यांच्या सासू गिरिजाबाई, जाऊ निकिता भाले या दोघी जणी डाळ निर्मितीचे काम करतात. या शिवाय रूपाली पांचाळ, सत्यभामाबाई पांचाळ यांनादेखील या प्रक्रिया उद्योगात रोजगार मिळाला आहे.

    बॅंकेच्या कर्जाची परतफेड सपनाताई डाळ मिल उद्योगासाठी मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड  करतात.  आर्थिक व्यवहारासाठी बॅंक आॅफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक संतोष बोधनवाड, उपशाखाअधिकारी रवी नकुले, राजरत्न प्रधान यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सपनाताई सांगतात.

    डाळीनिर्मितीचा हंगाम

  • मूग, उडदाच्या डाळ निर्मितीचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत असतो. तूर, हरभऱ्याची डाळ निर्मिती जानेवारी ते जून या कालावधीत केली जाते.
  • सर्व प्रकारच्या कडधान्यांची डाळ प्रतिकिलो पाच रुपये दराने तयार करून दिली जाते.
  • २०१६-१७ मध्ये तुरीची २५० क्विंटल, हरभऱ्याची ५० क्विंटल, मुगाची १०० क्विंटल, उडदाची २० क्विंटल डाळ तयार करून देण्यात आली. तर, २०१७-१८ मध्ये तुरीची ३५० क्विंटल, मुगाची १८० क्विंटल, उडदाची १०० क्विंटल, हरभऱ्याची २५० क्विंटल डाळ तयार  करण्यात आली.
  • ‘योगिता` ब्रॅंड शेतकरी, तसेच अन्य ग्राहकांना मागणीनुसार डाळ तयार करून देणे एवढ्यापुरते मर्यादित प्रक्रिया उद्योगाचे काम भाले यांनी ठेवलेले नाही. गेल्या तीन वर्षांपासून सपनाताई तूर, मूग, उडीद, हरभरा आदी कडधान्यांची स्वतः खरेदी करून त्यापासून डाळ तयार करतात. योगिता हातसडीची डाळ` या ब्रॅंडने पॅकिंग करून विक्री केली जाते. सध्याच्या काळात तूर डाळ ७० रुपये किलो, मूग डाळ ८० रुपये किलो, हरभरा डाळ ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.  बाजारपेठेतील आवक-जावक यानुसार डाळ विक्रीचे दर बदलतात. दर महिन्याला पाच क्विंटल डाळींची विक्री होते. कृषी विभागातर्फे आयोजित कृषी प्रदर्शने, महिला बचत गटांच्या वस्तूंची प्रदर्शने यामध्ये स्टॅाल लावून डाळींची विक्री केली जाते. रामेश्वर भाले आणि विश्वनाथ भाले हे डाळ विक्रीसाठी मदत करतात. प्रदर्शनातील विक्रीमुळे विविध भागांतून दुकानदार, तसेच ग्राहकांची मागणी येते. त्यानुसार डाळींचा पुरवठा केला जातो.

    संपर्क : सपना भाले,९५५२६३८६२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com