बचत गटातून वाढली रोजगाराची संधी

महिलांनी एकत्र येत गावामध्ये मिरची कांडप, कापड दुकान सुरु केला आहे.
महिलांनी एकत्र येत गावामध्ये मिरची कांडप, कापड दुकान सुरु केला आहे.

शेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी एकत्र येत सहा बचत गटांची सुरवात केली. महिला आर्थिक विकास महामंडळाची साथ मिळाल्यामुळे गटांतील महिलांनी पशुखाद्य विक्री, कापड दुकान, किराणा दुकान, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय सुरू करत गावामध्ये रोजगारनिर्मिती केली. याचबरोबरीने गावातील विकासकामासाठी बचत गटांतील महिलांनी चांगलाच पुढाकार घेतला आहे. सुमारे साडेसहा हजार लोकसंख्या असलेल्या शेडगाव (जि. नगर) येथे बारा वर्षांपूर्वी तेरा महिलांना एकत्र करून सुनीता बाळासाहेब गोरे यांनी ‘सरस्वती' हा  पहिला महिला बचत गट तयार केला. या गटात नंतर दहा महिला राहिल्या. प्रत्येक महिलेने शंभर रुपयांची मासिक बचत करून दर सहा महिन्याला अंतर्गत व्यवहार केले. दोन वर्षांनंतर गटाला बॅंकेने तीस हजार रुपयांचे कर्ज दिले. या रकमेत गटाने ३९ हजारांची भर घालून गटातील महिलांच्या कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालये बांधली. २००९ साली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्रांतिज्योती संचालित साधन केंद्राशी गटाचा संपर्क झाला. त्यानंतर गावात टप्प्याटप्प्याने महिला बचत गटांची उभारणी होत गेली. बचत तसेच बॅंकांनी दिलेल्या कर्जाच्या रकमेतून या महिलांनी व्यवसाय सुरू करत आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत गावातच तयार केला. आतापर्यंत गावातील सहा गटांना सुमारे २८ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. गटातील महिलांनी २००८ साली  संघर्ष महिला ग्राम संस्था ही ग्रामसमिती स्थापन केली.

गाव प्रश्‍नासाठी लढा बचत गटामुळे महिलांचे संघटन वाढले. रोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याची धडपड सुरू असताना सुनीता गोरे यांनी महिला गटाच्या सहकार्याने गावातील अन्य समाजिक कामांसाठी पुढाकार घेतला. शेडगावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बधेमळा येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यासाठी २३ महिलांनी एकत्र येत गावांतील लोकांना सोबत घेऊन श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि सातत्याने पाठपुरावा करत रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. गावाला `आपलं पाणी` योजनेतून साडेसात हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधी मिळाला होता. मात्र त्यासाठी दहा टक्के रक्कम लोकसहभागातून भरायची होता. दोन वेळा हा निधी परत गेला. तिसऱ्या वेळीही निधी परत जाण्याच्या मार्गावर होता, तेव्हा महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर ग्रामपंचायतीने दहा टक्के रक्कम भरली अन्‌ गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली.

दुग्ध व्यवसायाला झाली सुरवात शेडगावात महिलांनी बचत गटाच्या आर्थिक मदतीतून पशुपालनास सुरवात केली. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरस्वती महिला बचत गटाने तीस महिलांना गाय पालनाचे प्रशिक्षण दिले. राज्यातील अनेक भागांत जाऊन महिलांनी पशुव्यवसायाची माहिती घेऊन पशुपालन व्यवसायास सुरवात केले. बचत गटाच्या सहकार्याने पन्नास महिलांना घरबांधणी, पंधरा मुला-मुलींचे लग्नकार्य, पंचवीस कुटुंबांना शेती विकासासाठी मदत झाली. काही महिलांनी गटाच्या आर्थिक मदतीतून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. ‘घर दोघांचे' या अभियानांतर्गत गटातील ३७ महिलांच्या नावे घरे झाली आहेत. महामंडळाने दिले खुरपणी यंत्र बचत गटातील बहुतांश महिला शेतकरी आहेत. त्यामुळे या महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत वीस खुरपणी यंत्रे देण्यात आली. त्यासाठी फक्त दहा टक्के रक्कम महिलांनी दिली, असे महामंडळाचे समन्वयक संजय गायकवाड यांनी सांगितले. पुन्हा उभारले दुकान हंसवाहिनी गटातील वैशाली वामन भदे यांनी २०११ साली बचत गटाच्या मदतीने ‘स्नेहा रेडीमेड' हे कपड्याचे दुकान सुरू केले. गावातच पाच गुंठे जागा घेतली. बांधकाम करून व्यवसाय वाढविला. भरभराटीला येत असलेल्या दुकानाला २०१३ मध्ये आग लागून नुकसान झाले. मात्र गटातील महिलांनी त्यांना मदत करत पुन्हा दुकान सुरू करण्यास साथ दिली. आता गावांतील सर्व महिलांना एकत्र येऊन पूरक उद्योग उभारायचा आहे. गटातून प्रगती शेडगावमध्ये सध्या सरस्वती, आत्मविश्‍वास, सम्यक दृष्टी, हंसवाहिनी, आंबिका, जनजागृती हे महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून एक पशुखाद्य विक्री दुकान, २५ महिलांनी साठ गाई खरेदी करत पशूपालन व्यवसायास सुरवात केली. याचबरोबरीने गटातील महिलांची दोन कापड दुकाने आहेत. ३५ महिला शिवणकाम करतात. एक महिला बांगडी व्यवसाय आणि एक जण किराणा दुकान चालविते. शेती, ग्रामविकासात सहभाग

  • शेती सुधारणेसाठी प्रयत्न.
  • गावांतील अनेक प्रश्‍नासाठी लढा.
  • गटाच्या एकीतून गावातील पाण्याची टाकी, रस्त्याच्या प्रश्‍न मार्गी.
  • मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कार्यासाठी
  • आर्थिक मदत.
  • एकत्र येत पूरक उद्योगाची उभारणीचे नियोजन.
  • येत्या काळात जमीन सुधारणा, फळबाग, प्रक्रिया उद्योगासंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन.
  • प्रतिक्रिया : बचत गटाने दिला आर्थिक आधार ‘मी जागा घेतली, बांधकाम केले. कपड्याचे दुकान सुरू केले. मुलीला चांगले शिक्षण देता आले. बचत गटातून आर्थिक आधार मिळाल्यामुळे हे सर्व शक्‍य झाले. आमच्या गावात गटातून महिला सक्षम होत अाहेत.` वैशाली भदे ग्रामसभेत सहभाग वाढला शेडगावमधील महिला बचत गटांनी मोठा सामाजिक बदल केला आहे. गावसमितीच्या माध्यमातून गटात सहभागी झालेल्या महिला समाजिक उपक्रमात सहभागी होऊन वेगवेगळे उपक्रम राबवतात. ग्रामसभेत महिलांची हजेरी वाढली आहे. महिलांना बोलण्यातही हिंमत आली असून, गावांतील सामाजिक प्रश्‍नावर त्या आवाज उठवतात. गावांत दारूबंदी व्हावी, यासाठी गावांत ग्रामपंचायतीसमोरच तीन दिवस महिलांनी उपोषण केले. महिलांची गटामुळे प्रश्न मांडण्याची हिंमत वाढली, असे क्रांतिज्योती साधन केंद्राचा व्यवस्थापक क्रांती सुपेकर, सहयोगिनी तारामती भुजबळ यांनी सांगितले. तारामती भुजबळ, ९२७०४७७२२४ पूरक व्यवसायाला गती मिळाली... ‘बचत गटामुळे मला कापड दुकान आणि शिवणकाम व्यवसायात प्रगती करता आली. घराचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत झाली. गटातील काही महिलांना पशुपालन, शेळीपालन आणि शेती विकासासाठी गटाची चांगली मदत होत आहे. सुनीता गोरे, ९१४५५४३३४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com