भूमिगत निचरा प्रणालीद्वारे सुधारल्या क्षारपड जमिनी

पाणी व खते यांच्या अतिवापरामुळे जमिनींमध्ये क्षार वाढल्यामुळे त्या नापीक होण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अधिक आहे. मात्र, तालुक्यातील भिगवण येथील विश्वनाथ भरणे व स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील बिराज माने यांनी जमिनीखाली सच्छिद्र पाईप प्रणालीचा वापर करीत आपल्या क्षारांचा निचरा केला. जमिनींची सुधारणा केली आहे. आज या जमिनींमधून किफायतशीर उत्पादन व उत्पन्न घेणे त्यांना शक्य झाले आहे.
भरणे यांची पुर्वीची क्षारपड जमीन व नंतर भुमिगत निचरा प्रणालीसाठी खोदण्यात आलेली पाईपलाइन.
भरणे यांची पुर्वीची क्षारपड जमीन व नंतर भुमिगत निचरा प्रणालीसाठी खोदण्यात आलेली पाईपलाइन.

पाणी व खते यांच्या अतिवापरामुळे जमिनींमध्ये क्षार वाढल्यामुळे त्या नापीक होण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अधिक आहे. मात्र, तालुक्यातील भिगवण येथील विश्वनाथ भरणे व स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील बिराज माने यांनी जमिनीखाली सच्छिद्र पाईप प्रणालीचा वापर करीत आपल्या क्षारांचा निचरा केला. जमिनींची सुधारणा केली आहे. आज या जमिनींमधून किफायतशीर उत्पादन व उत्पन्न घेणे त्यांना शक्य झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील उजनी धरणाच्या काठी असलेल्या इंदापूर व दौंड तालुक्यांत जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण अधिक आहे. अर्थात अनेक ठिकाणी रासायनिक खते व पाणी यांच्या अनियंत्रित वापराने या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे या जमिनी दलदलीच्या, नापीक झाल्या आहेत. मात्र, समस्येचा बाऊ न करता अनेक शेतकरी विविध तंत्राचे उपाय करून त्यावर उत्तर शोधताना दिसत आहेत.

क्षारपड समस्येवर उपाय दौंड तालुक्यातील भिगवण परिसरातील शिवारांसाठी उजनी जलाशय जवळच अाहे. या भागात पाणी व रासायनिक खते यांचा अनियंत्रित वापर झाला. येथील विश्वनाथ भरणे यांची भिगवण-राशीन रस्त्यालगत जमीन आहे. अनेक शेतकऱ्यांबरोबर त्यांचीही जमीन क्षारपड झाली होती. भरणे कृषी विभागामधील सेवानिवृत्त पर्यवेक्षक आहेत. नोकरी सेवेत कार्यरत असताना ही समस्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या वेळी महाराष्ट्र बॅंकेच्या ग्रामीण विकास केंद्रातर्फे एका योजनेतर्फे शेतकऱ्यांना क्षारपड जमीन सुधारणेसंबंधी निधीचे सहकार्य केले जात होते. ही सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भरणे यांनी सेवानिवृत्तीनंतर केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत त्या अनुषंगाने चर्चा केली. त्या वेळी भूमिगत सच्छिद्र पाईप प्रणाली तंत्राचा वापर करण्याच्या बाबीला चालना मिळाली.  

माने यांनी दिली प्रयोगाला चालना  स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील प्रयोगशील शेतकरी बिराज माने यांचीही जवळपास तीच समस्या होती. जमिनीच्या तीनही बाजूस डोंगर असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. सातत्याने पाणी शेतात साचून राहिल्यामुळे जमीन क्षारपड झाली होती. माने यांनी जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यांनाही भूमिगत निचरा प्रणाली तंत्राबाबत माहिती मिळाली.

भूमिगत निचरा प्रणालीचा प्रयोग शेतातील क्षार व पाणी यांचा निचरा करणे हे या प्रयोगाचे मुख्य उद्दीष्ट होते. जमिनीच्या उतारानुसार सुमारे तीन फूट खोल चर खोदला जातो. त्यामध्ये एकरी साधारण दोनशे ते अडीचशे फूट लांबीची सच्छिद्र पाईप बसविली जाते. या पाईपवर एक ते दीड फूट उंचीचे विटांचे तुकडे बसविले जातात. विटांसोबत वाळुंचा थरही वापरला जातो. त्यामुळे पाईपमध्ये कचरा अडकत नाही. पाईप घट्ट बसते व ही प्रणाली अनेक वर्षे सुरळीत चालते. भरणे व माने यांच्या शेतात ही प्रणाली बसवून आता किमान दहा वर्षे उलटून गेली आहेत. तिचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. पाईपमधील पाणी दुसऱ्या पाईपमध्ये एकत्र करून उताराने एका खड्यात सोडले जाते. या माध्यमातून अतिरिक्त पाणी व क्षार बाहेर पडून जमिनीची होणारी हानी टाळण्यात येते. त्यातून उत्पादकता वाढण्यात मदत होते.

आर्थिक नियोजन ही प्रणाली भरणे यांनी आपल्या तीन एकरांत राबविली. त्यासाठी सुमारे २४ हजार रुपये खर्च २००३-०४ च्या दरम्यान करावा लागला. त्या वेळी प्रति मीटर पाईपची किंमत ७१ रुपये होती. आता ती १३० रुपयांवर गेल्याचे त्यांनी सांगितले. यंत्रणेसाठी चर खोदाई, सच्छिद्र पाईप, पीव्हीसी पाईप, विटांचे तुकडे, वाळुचा चाळ आदीं साहित्याची आवश्यकता असते. या सर्वांसाठी खर्च येतो. माने यांनी सुमारे अडीच ते पावणेतीन एकरांसाठी ८० हजार रुपयांपर्यंत खर्च केल्याचे सांगितले.

उत्पादनाची शाश्वतता पूर्वी जमीन दलदलीची, पडीक असायची. आता भरणे यांना उसाचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन तर माने यांना ५० ते ६० टन उत्पादन घेणे शक्य होत आहे. त्यासाठी हिरवळीची खते, गांडुळ खत प्रकल्प असे पर्यायही अवलंबिले आहेत. भरणे म्हणाले की, माती परीक्षणात पूर्वी मातीचा पीएच साडेआठ होता. आता तो साडेसातपर्यंत आला आहे. दोघांनी केलेल्या प्रयत्नांतून परिसरातील काही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनीही क्षारपड जमिनीची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुमारे ७२ शेतकऱ्यांना झाला फायदा भूमिगत निचरा प्रणाली प्रकल्पाबाबत बोलताना भिगवण येथील महाबॅंक ग्रामीण विकास केंद्र  प्रभारी अधिकारी अमोल कड म्हणाले की इंदापूर व दौंड तालुक्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात क्षारपड होऊन नापीक होण्याची वेळ आली होती. आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी सन २००६ पासून योजना राबवत होतो. मागील वर्षी ती थांबवण्यात आली आहे. यात इंदापूर, दौंड, शिरूर, बारामती भागातील मिळून सुमारे ७२ शेतकऱ्यांकडे या योजनेचे प्रयोग घेण्यात आले. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यात प्रति एकर २० हजार रुपये व पुढे १५ हजार रुपये असे अर्थसाह्य आम्ही देऊ केले. आमच्या केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रति नमुना २५ रुपये दराने माती परीक्षणही करून दिले जाते. यात एनपीके, पीएच, इसी, सेंद्रिय कर्ब आदी तपासणी केली जाते. पाण्याचा नमुनाही प्रति १०० रुपये दराने तपासून दिला जातो. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना निश्चितच नवी दिशा मिळाली आहे.  

संपर्क : विश्वनाथ भरणे, ९४२३०९२६६६ , बिराज माने,९८६०१४१२५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com