शंभरहून अधिक देशी गायींचे संगोपन

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा किलोमीटरवरील तरसाळी येथील शशिकांत व अनिरुद्ध या पाटील बंधूंनी व्यावसायिक पिकांच्या शेतीला देशी गोसंगोपनाची मोठी जोड दिली आहे. आज शंभरहून अधिक गीर गायींचे संगोपन ते करतात. त्याद्वारे देशी दूध, तूप, व गोमूत्र अर्क यांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही तयार करण्यात त्यांना यश आले आहे.
शशिकांत व अनिरुद्ध पाटील
शशिकांत व अनिरुद्ध पाटील

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा किलोमीटरवरील तरसाळी येथील शशिकांत व अनिरुद्ध या पाटील बंधूंनी व्यावसायिक पिकांच्या शेतीला देशी गोसंगोपनाची मोठी जोड दिली आहे. आज शंभरहून अधिक गीर गायींचे संगोपन ते करतात. त्याद्वारे देशी दूध, तूप, व गोमूत्र अर्क यांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही तयार करण्यात त्यांना यश आले आहे.   नाशिक जिल्ह्यातील सटाणा हा डाळिंब व द्राक्षासाठी प्रसिद्ध तालुका आहे. तालुक्यातील तरसाळी येथील सुधाकर धर्मा पाटील यांची सुमारे सत्तर एकर संयुक्त जमीन आहे. शशिकांत आणि अनिरुद्ध हे पाटील बंधू आज या शेतीची जबाबदारी सांभाळतात. शशिकांत यांचे शिक्षण बीएस्सी अॅग्रीपर्यंत झाले असून, अनिरुद्ध एमई (सिव्हिल) झाले आहेत.

व्यावसायिक, प्रयोगशील वृत्ती शशिकांत यांनी शिक्षणानंतर गुजरातमधील साखर कारखान्यात काही वर्षे काम केले. कृषी पदवीधारक असल्याने शेतीत काहीतरी उल्लेखनीय करण्याचा त्यांचा इरादा होता. आपल्या गावानजीकच्या विरगाव येथे दहा वर्षे त्यांनी कृषी सेवा केंद्र चालविले. त्यानंतर २००४ मध्ये चार एकरांत तुती लागवडीचा रेशीम उद्योग सुरू केला. त्या वेळी मोठ्या प्रमाणात असा उद्योग सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच रेशीम उत्पादक असावेत. पुढे विक्री व्यवस्था अवघड बनली आणि रेशीम उद्योगाला घरघर लागली. मग तो बंद करावा लागला.

शेती व दुग्धव्यवसायावर लक्ष गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाटील बंधू सेेंद्रिय पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यातून त्यांनी शेतीचा खर्च कमी केला आहे. अनिरुद्ध २००८ मध्ये पुणे येथील कंपनीत नोकरीत होते. सन २०१० मध्ये पुण्यातच बांधकाम व्यवसायात ते उतरले. आता मात्र दोघाही बंधूंनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.  

गीर गायींचे पालन 

  • काळाची मागणी लक्षात घेऊन देशी गोसंगोपनाला सुरवात केली. सन २०१६ च्या दरम्यान दोन गीर गायी प्रायोगिक तत्त्वावर घेतल्या. मात्र, काही दिवसांत एका गायीचा मृत्यू झाला. खचून न जाता व्यवस्थापनात सुधारणा केली. शेवगा, झिंजवा आदी चारा पिकांची लागवड केली.
  • त्याचवर्षी पुन्हा गुजरात, भावनगर, जुनागढ, आदी भागांतून गीर गायी खरेदी करण्यास सुरवात केली. सुरवातीला गायींसाठी मुक्त गोठा बांधला. टप्प्याटप्प्यात गायींची संख्या वाढवली. जानेवारी २०१७ मध्ये १७० बाय ३५ फूट आकाराचा मोठा बांधला. गायींना मोकळे फिरण्यासाठी १३० फुटांची जागा आहे. त्यांच्या देखभालीसाठी सुमारे आठ मजूर तैनात आहेत.
  • गायींना दोन वेळा चारा दिला जातो, त्यासाठी स्वतंत्र गव्हाणी बांधल्या आहेत. साधारणपणे प्रतिगायीला हिरवा चारा १६ ते १७ किलो व कोरडा चारा ५ ते ६ किलो दिला जातो.
  • प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती

  • सध्या सटाणा येथे देशी दुधाची विक्री ६० रुपये प्रतिलिटर दराने केली जाते.
  • सुमारे २५ लिटर दूध नाशिक येथे पाठवले जाते. तेथे फ्रॅंचायसी दिली असून, त्याद्वारे ८२ रुपये प्रतिलिटर दराने ते पुढे विकले जाते.
  • पारंपरिक निर्मिती प्रक्रिया पद्धतीचा वापर करून शुद्ध तुपाची निर्मिती केली जाते. त्यास ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याचे  शशिकांत सांगतात. किलोला २२०० ते २५०० रुपये त्याचा दर आहे.
  • महिन्याला सुमारे ३० ते ३५ किलो तुपाची सध्या विक्री होते.
  • पुणे भागात त्याच्या मार्केटिंगची व विक्रीची जबाबदारी अनिरुद्ध सांभाळतात.
  • विविध प्रकारचे गोमूत्र अर्क तयार केले आहेत.
  • यापूर्वी सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरणही करून घेतले होते.
  • नाशिक पुणे, मुंबई आदी शहरांतील ग्राहकांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न आहे.
  • व्यावसायिक पीकपद्धती

  • सुमारे आठ एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. यंदा पहिलेच उत्पादन हाती आले आहे.
  • चार एकर क्षेत्रात गिनी गवत, तर तीन एकरांत झिंजवा चारा पीक आहे. हे गवत गुजरातकडील असल्याचे शशिकांत सांगतात.  
  • दहा एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने कांदा उत्पादन घेतले जाऊ लागले आहे, त्याचे एकरी १० टनांच्या पुढे उत्पादन घेतले जात आहे.
  • चेन्ना सेलम हळदीची चार एकर क्षेत्रात लागवड आहे.
  • पाच एकरांत शेवगाही घेतला होता. मात्र, सध्या दर पडले आहेत. तरीही जनावरांसाठी चारा म्हणून त्याचा पाला उपयोगात येत आहे.  
  • काही क्षेत्र अन्य शेतकऱ्यांस कसण्यासाठी दिले आहे.
  • जनावरांची संख्या

  • म्हशी - मेहसाणा, मुऱ्हा, जाफराबादी, सुरती आदी मिळून सुमारे १३
  • कडकनाथ कोंबडी - ५०, एच एफ गायी - २, एक जर्सी गाय
  • गीर गायी - मोठ्या - ८०, कालवडी - २५, लहान वासरे - ४० आणि चार बैल
  • संपर्क :  शशिकांत पाटील, ९४२२७५५१२८ ,  अनिरुद्ध पाटील, ९९२१२४२९९५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com