बियाणे, लागवड तंत्रात केला बदल

बियाणे, लागवड तंत्रात केला बदल
बियाणे, लागवड तंत्रात केला बदल

सातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील शंकर जगताप यांनी बियाणे, लागवड तंत्रात बदल करत सोयाबीन पिकाच्या यशस्वी प्रयोगाद्वारे उत्पादनात वाढ केली आहे. उत्पादनातील वाढ योग्य नियोजनातून टिकवण्यास यश मिळवले आहे. बीजप्रक्रिया, यंत्राद्वारे पेरणी, बियाण्यात बदल, योग्यवेळी आंतरमशागत या बाबींचा खूप चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात. खतव्यवस्थापन केवळ जमिनीत खते देऊनच नव्हे तर पिकाच्या पुनरोत्पादनाच्या अवस्थेत फवारणीच्या माध्यमातून काही टाॅनिकची मात्रा दिल्यास त्याचा उत्पादनवाढीवर खूप फरक पडतो असेही ते सांगतात. हवामान खात्याकडून पाऊस वेळेत होईल असे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. यामुळे खरीप नियोजन विस्कळित होते. हे संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन करतो. दरवर्षी अडीच ते तीन एकरावर सोयाबीन पेरतो. उन्हाळ्यात नांगरट करुन एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखत टाकले जाते. पावसाचा अंदाज घेऊन १० ते २५ जून या कालावधीत पेरणी केली जाते. मागील तीन हंगामापासून डी. एस. २२८ या सोयाबीन वाणाची लागवड करतो. पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया केली जाते.  

पेरणी यंत्राद्वारे लागवड सोयाबीनची ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते. आठ फणी पेरणी यंत्रात सात फण्यात सोयाबीन तर एका फण्यात मुगाची पेरणी केली जाते. यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला तर मुगावर होत असल्याने सोयाबीनचे नुकसान होत नाही. त्याबरोबरच मुगाचे उत्पादन मिळत असल्याचे सुनील सांगतात.

बियाण्यात बदल मागील तीन वर्षापासून सोयाबीनच्या वाणात बदल केला आहे. तज्ज्ञ तसेच या बियाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून डीएस २२८ या वाणाची निवड केली. हा वाण उगवण चांगली होते, शिवाय उत्पादनात वाढही मिळते.  

पहिली भांगलण सोयाबीन लागवडीनंतर  तणनाशक फवारणी करत नाही. त्याऐवजी उगवणीनंतर  पहिली भांगलणी केली जाते. साधारणपणे फूलकळी सुरू झाल्यापासून सरासरी तीन कीटकनाशक व टॉनिकच्या फवारण्या करतो. या फवारण्यांमुळे कीडनियंत्रण होते.

उत्पादन सोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक असल्याने यामध्ये उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. बियाणे, लागवड तंत्र तसेच इतर नियोजनाच्या जोरावर एकरी सरासरी १३ ते १५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळते. त्याबरोबर काही प्रमाणात तुरीचे उत्पादन मिळत असते.

नियोजनातील प्रमुख बाबी

  • बीजप्रक्रिया करूनच लागवड केली जाते.
  • पेरणीच्या वेळी शिफारश केलेल्या खताच्या मात्रा दिल्या जातात.
  • पिकातील बदलांची निरीक्षणे केली जातात.
  • कीड व उत्पादनवाढीसाठी वेळेत फवारण्या केल्या जातात.
  • या हंगामात सरीवर लागवड मागील तीन ते चार वर्षाच्या अनुभवानुसार सोयाबीन भरणी तसेच उगवणीच्या काळात पाऊस होत नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पेरणी केलेल्या सोयाबीनला पाणी देणे जिकिरीचे ठरत असल्याने यंदा सरीवर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी साडेतीन फूट सरी सोडली असून, सरीच्या दोन्ही बाजूस लागवड करणार आहे. यामुळे पावसाने ओढ दिल्यास सरीने पाणी देता येणार असल्याने अपेक्षित उत्पादन मिळेल. संपर्क : सुनील जगताप, ९७६२४३८५४३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com