भाजीपाल्यातून बदलले ‘हणमंत जवळगा`चे अर्थकारण

भाजीपाला लागवडीमुळे वर्षभर रोजगाराच्या संधी तयार झाल्या आहेत.
भाजीपाला लागवडीमुळे वर्षभर रोजगाराच्या संधी तयार झाल्या आहेत.

लातूर जिल्ह्यातील हणमंत जवळगा (ता. चाकूर) या गावाने भाजीपाला शेतीत स्वतःची ओळख तयार केली. या गावातील बहुतांश शेतकरी गेल्या वीस वर्षांपासून पारंपरिक पिकांसोबतच विविध भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादन सातत्याने घेतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार येथील शेतकरी भाजीपाला पिकांचे वर्षभर नियोजन करतात. शेतकरी गटातून  नवी दिशा देण्याचा प्रयत्न गावाने केला आहे. हणमंत जवळगा गावातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक. पाण्याची कमतरता आणि कमी क्षेत्रामध्ये पारंपरिक पिकांच्या लागवडीतून शेतीवर झालेला खर्चही निघत नव्हता. त्यामुळे गावातील शेतकरी आर्थिकदृष्या परवडेल अशा पिकांच्या शोधात होते. या शोधातूनच बाजारपेठेची मागणी लक्षात घेत बालाजी उदगीरे, कै. वैजनाथ कुसनुरे आणि परसराम बडे यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी गावात पहिल्यांदा टोमॅटो, दोडका, वरणा, वांगे या भाजीपाला पिकांच्या लागवडीस सुरवात केली. उपलब्ध पाणी आणि कमी क्षेत्र असूनही वर्षभर भाजीपाला पिकांच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने या प्रयोगशील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीमध्ये सातत्य ठेवले. भाजीपाला पिकांतून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन गावातील शेतकरी हळूहळू भाजीपाला पिकाकडे वळू लागले. वर्षभर कमी कालावधीतील विविध भाजीपाल्याची पिके घेत असल्याने बाजारातील चढ-उतार सोसूनही येथील शेतकऱ्यांना भाजीपाला शेतीचे अर्थकारण फायद्याचे ठरत आहे. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन गावातील शेतकऱ्यांना हंगामाचे गणित चांगले कळाले आहे. त्यानुसार भाजीपाला लागवड केली जाते. एप्रिलमध्ये बाजारपेठेत भाजीपाला पोचला तर चांगले दर मिळतात. त्यामुळे डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड केली जाते. गावातील शेतकरी स्वतः भाजीपाला विक्रीचे नियोजन करीत असल्याने नफ्यातही वाढ होताना दिसते. हणमंत जवळगा गावातील शेतकरी दर्जेदार भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. ज्या बाजारपेठेत चांगला दर मिळतो तेथे स्वतः शेतकरी जाऊन भाजीपाल्याची विक्री करतात. या गावातील भाजीपाला प्रामुख्याने नागपूर, वर्धा, अदिलाबाद, निजामबाद, मुंबई, बंगळूरू येथील बाजारपेठेत जातो. काही शेतकरी चापोली, चाकूर, लातूर, अहमदपूर, उदगीर व इतर ठिकाणच्या आठवडी बाजारात जाऊन स्वतः विक्री करतात. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो. सुधारले गावाचे अर्थकारण  भाजीपाला शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २० ते ५० टक्के वाढ झाली. कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. भाजीपाला उत्पन्नातून शेतकऱ्यांनी विहिरी खोदून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, आच्छादनाचा अवलंब केला आहे. गावातील काही तरुणांनी भाजीपाला वाहतुकीसाठी दहा टेंपोची खरेदी केली. त्यामुळे मुलांना गावामध्येच रोजगाराची चांगली संधी तयार झाली. मुला, मुलींचे शिक्षण, लग्न कार्य हे भाजीपाला पिकातील मिळकतीमुळे शक्य झाल्याचे शेतकरी सांगतात.   दुष्काळातून सावरले २०१५ सालातील दुष्काळात गावातील मारुती फड यांनी एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली होती. विहिरीचे पाणी आटल्यानंतर त्यांनी टॅकरने पाणी देऊन टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन घेतले. दुष्काळी परिस्थितीतही त्यांना चांगले उत्पादन आणि दरही मिळाला. गावातील काही शेतकऱ्यांनी दुष्काळातही काटेकोर पाणी नियोजन करत भाजीपाल्याच्या मदतीने आपले अर्थकारण जपले. आठवडी बाजार ठरतोय फायद्याचा बाळासाहेब कुसनुरे हे आठ एकर क्षेत्रापैकी तीन एकर क्षेत्रावर वर्षभर बाजारातील मागणीनुसार भाजीपाल्याची लागवड करतात. परिसरातील प्रत्येक आठवडी बाजारात ते स्वतः भाजीपाला विक्री करतात. एका आठवडी बाजारातून त्यांना साधारण दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. आठवड्यातून पाच आठवडी बाजारात भाजीपाला विक्री केली जाते. त्यातून सरासरी दहा हजार रुपयांचे त्यांना उत्पन्न मिळते.

पारावर रंगतात शेतीच्या गप्पा दिवसभर शेतात काबाडकष्ट करून गावातील शेतकरी संध्याकाळी निवांत वेळी पारावर एकत्र येऊन व्यर्थ चर्चा न करता शेती विकासाच्या गप्पा करताना करतात. भाजीपाला पिकातील स्वतःचे अनुभव इतरांना सांगतात. नवीन प्रयोगांची चर्चा केली जाते. या चर्चेतून नवी दिशा शेतकऱ्यांना मिळते. पीक लागवडीच्या बरोबरीने परिसरातील भाजीपाला बाजारपेठेतील उलाढाल, आवक जावक याचीदेखील चर्चा झाल्याने बाजारपेठेत भाजीपाला विक्रीला पाठविण्याचे नियोजन केले जाते.

असे आहे हणमंत जवळगा

  • लोकसंख्या  ः १,८७५
  • भौगोलिक क्षेत्र ः ६५६ हेक्टर.
  • पेरणीयोग्य क्षेत्र ः ५७४ हेक्टर.
  • ३५० शेतकऱ्यांपैकी २४८ शेतकरी अल्पभूधारक.
  • भाजीपाला ः  टोमॅटो, कोबी, वरणा, कांदा, वांगे तसेच हंगामी इतर सर्व भाजीपाला.
  • भाजीपाल्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाने काटेकोर पाणी व्यवस्थापन.
  • गावात चार शेतकरी गट, शेतकरी गटाच्या दोन कांदा चाळी.
  • स्वतः रोपनिर्मितीवर भर, पॅकिंग हाऊस, रेफर व्हॅनची गटातर्फे मागणी
  • वर्षभर भाजीपाल्याची लागवड गावातील प्रयोगशील शेतकरी परसराम बडे यांची दहा एकर शेती आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन बडे हे वर्षभर हंगामानुसार सरासरी तीन एकर क्षेत्रावर टोमॅटो, कोबी, वरणा, वांगे, मिरची, कांदा या पिकांची लागवड करतात. गेल्या वीस वर्षांपासून योग्य व्यवस्थापन ठेवत दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाजीपाला पिकातून  वर्षभर पैसा हाती येत असल्याने त्यांनी आपल्या दोनही मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. ठराविक काळात भाजीपाला पिकातून मिळणाऱ्या पैशामुळे त्यांचे अर्थकारण चांगले सुधारले. - परसराम बडे, ८९७५६११७४५ वाहतुकीसाठी घेतला टेंपो मधुकर गित्ते हे दहा एकरांपैकी चार एकरांवर वर्षभर कोबी, दोडका, वरणा, कांदा लागवड करतात. भाजीपाला वाहतुकीसाठी त्यांनी टेंपो खरेदी केला अाहे. मोठ्या बाजारपेठेत दर जास्त असेल तेथे महिन्यातून चार वेळेस ते भाजीपाला विक्रीस नेतात. एका वेळेस साधारण २० क्विंटल भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. सर्व खर्च वगळता त्यांना एका खेपेला पंधरा हजारांचे उत्पन्न मिळते.   - मधुकर गित्ते, ७५८८८७६५६५ शेतकरी गटातून प्रगती गावातील शेतकऱ्यांनी गट तयार करत भाजीपाला उत्पादनात स्वतःची ओळख बनवली आहे. बाजारभावाचा अभ्यास करीत येथील शेतकरी भाजीपाला लागवड करतात. यातून त्यांना चांगला फायदा होत आहे. - ज्ञानेश्वर शिंदे (कृषी सहायक), ९९२३४३२१११ सुधारित शेतीकडे वाटचाल गेल्या वीस वर्षांपासून येथील शेतकरी वर्षभर भाजीपाला लागवड करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली . परिणामी गावाचे अर्थकारण सुधारले असून नवीन पिढी आता तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला लागवडीकडे वळली आहे. - नागनाथ पाटील

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com