गाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोत

पाचट आच्छादन आणि सेंद्रीय घटकांच्या वापरामुळे गांडुळांची वाढलेली संख्या.
पाचट आच्छादन आणि सेंद्रीय घटकांच्या वापरामुळे गांडुळांची वाढलेली संख्या.

शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात घेऊन रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील डॉ. महावीर राजकुमार शहा यांनी चोपण होत असलेली जमीन मुरूम आणि गाळमातीचा वापर करून सुपीक बनवली. दर्जेदार बेणे निवड, पट्टा पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाचट आच्छादनातून डॉ. शहा यांनी उसाचे उत्पादन ४० टनांवरून ९५ टनांपर्यंत नेले आहे.   गेल्या काही वर्षांत सोलापूर जिल्ह्यात उसाचे लागवड क्षेत्र वाढत असले तरी त्यामानाने उत्पादनात फारशी वाढ दिसत नाही. पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक हे ऊस उत्पादकांचे गाव. गावाची सरासरी ऊस उत्पादकता ही एकरी ४५ टनांवर आली होती. काळ्या भारी जमिनीत रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे सुपिकता कमी होऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर दिसू लागला आहे. त्यामुळे शेतीतील नफा कमी होऊ लागला आहे. याच गावातील प्रयोगशील शेतकरी डॉ. महावीर राजकुमार शहा यांनी कमी होत चाललेली जमिनीची सुपिकता आणि ऊस उत्पादन लक्षात घेऊन जमीन सुधारणेसाठी प्रयत्न सुरू केले. जमीन सुपिकतेच्या दिशेने जमीन सुधारणेबाबत डॉ. शहा म्हणाले, की बीएएमएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २००० पासून स्वतःचा दवाखाना सांभाळत वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. घटते ऊस उत्पादन लक्षात घेऊन पहिल्यांदा मी परिसरातील प्रयोगशील ऊस उत्पादकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या ऊस शेतीची पाहणी करून ऊस लागवड आणि व्यवस्थापनातील नवीन तंत्र समजाऊन घेतले. त्यानुसार जमीन सुपिकता आणि ऊस उत्पादनवाढीच्या दृष्टीने नियोजन केले. माझी वडिलोपार्जित साडेसहा एकर शेती आहे. पूर्वीपासून आम्ही ऊस, केळीची लागवड करीत आहोत; परंतु गेल्या तीन वर्षांपासून पाण्याची कमतरता लक्षात घेऊन केळी लागवड बंद करून सहा एकरावर सुधारित पद्धतीने ऊस लागवडीचे नियोजन केले. आमची भारी काळी आणि काही प्रमाणात मुरमाड जमीन आहे. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड, पाट पाण्याचा वापर आणि अनियंत्रित खत मात्रेमुळे जमिनीचा पोत कमी होऊ लागला, जमीन चोपण होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणजे उसाचे उत्पादन घसरले. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले. त्यामुळे मी प्रथम जमिनीच्या सुपिकतेवर लक्ष केंद्रित केले. माती आणि पाणी परीक्षण करून प्रयोगशील शेतकऱ्याच्या सल्ल्याने जमीन सुपिकतेच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करताना मला असे लक्षात आले, की पाट पद्धतीने जास्तीचे पाणी दिले जात असल्याने माझ्या जमिनीची सुपिकता कमी झालेली आहे. जमिनीतून पाण्याचा पुरेसा निचरा होत नव्हता. जमीन आणि पाण्याचा सामू वाढला असल्याने त्याचा थेट पीक उत्पादनावर परिणाम दिसत होता. पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड असल्याने अपेक्षित वाढ होत नव्हती. पाचट चाळल्यामुळे जमिनीत पुरेसे सेंद्रिय घटक मिसळले जात नव्हते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणजे माझे एकरी ऊस उत्पादन ३५ टनांच्यापर्यंत घसरले होते. ऊस उत्पादनाचा चढता आलेख डॉ. महावीर शहा यांनी ऊस उत्पादनवाढीबाबत परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांना पीक व्यवस्थापनातील चुका समजल्या. याबाबत ते म्हणाले, की मी पहिल्यांदा माती आणि पाणी परीक्षण केले. चोपण जमिनीत सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्याच्या सल्ल्याने मी सन २००० पासून साडेसहा एकर जमिनीत टप्प्याटप्प्याने शिफारशीत प्रमाणात मुरूम आणि तलावातील गाळ मिसळण्यास सुरवात केली. सध्या दोन एकरांवर पट्टा पद्धतीने आणि चार एकर क्षेत्रामध्ये चार फुटांची सरी काढून उसाची सलग लागवड आहे. सुरवातीला ट्रॅक्टरने मशागत केल्यानंतर पुढील मशागती बैलचलीत अवजाराने करतो. लागवडीसाठी मी को-८६०३२ जातीचे दर्जेदार बेणे निवडतो. गेल्या पाच वर्षांत मी सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. त्यामुळे उसाला वाढीच्या टप्प्यानुसार विद्राव्य खतांचा मात्रा दिली जाते. दरवर्षी मी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळून देतो. याचबरोबरीने जिवाणू संवर्धकांचा वापर करतो. यामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढली. जमिनीचा भुसभुशीतपणा वाढला आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी पाचट आच्छादनास सुरवात केली. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला. गांडुळांची संख्या वाढली. जमीन भुसभुशीत होऊ लागली. जमिनीचा निचरा सुधारला. त्याचा चांगला परिणाम मला ऊस उत्पादनावर दिसत आहे. मला २००३ मध्ये एकरी ३५ टन उत्पादन मिळत होते ते पुढे पाच वर्षांत ७५ टनांपर्यंत पोहोचले. २०१० मध्ये मला एकरी ८५ टन उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी मी एकरी सरासरी ९५ टनांपर्यंत पोहोचलो आहे. खोडव्याचे उत्पादन मला एकरी ७० टनांपर्यंत येते. आता एकरी शंभर टनाचे टार्गेट ठेऊन उसाचे व्यवस्थापन ठेवले आहे.   संपर्क - डाॅ. महावीर शहा, ९४२१०७६६४५ जमीन सुपिकता महत्त्वाची... डॉ. शहा यांनी भारी काळ्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मुरूम आणि मुरमाड जमीन सुधारण्यासाठी गाळमाती मिसळली आहे. यामुळे जमीन सुधारण्याच्या बरोबरीने ऊस उत्पादनात वाढ मिळू लागली आहे. चोपण जमिनीतील क्षारांचा पुरेसा निचरा होत नाही. त्याचा पीक उत्पादन आणि जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होतो. अशा जमिनीत शिफारशीत प्रमाणानुसार मुरूम मिसळल्याने जमिनीची सछिद्रता वाढली. या जमिनीतून आता पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत आहे. जमिनीची सुपिकता वाढल्याने उसाला अन्नद्रव्यांची उपलब्धता झाली. काही प्रमाणात असलेल्या मुरमाड जमिनीत काळी माती मिसळली. यामुळे मातीच्या कणांचे प्रमाण वाढले. या जमिनीत पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण वाढले. याचाही चांगला परिणाम मुरमाड जमिनीची सुपिकता वाढण्यासोबत ऊस उत्पादन वाढीसाठी झाले. शेतकऱ्यांनी जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणानुसार सेंद्रिय खते, रासायनिक खतांचा वापर करावा. हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर करावा. याचबरोबरीने जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट फार महत्त्वाची आहे. – डॉ. बी.एस. कदम, ९९६०८४०४१६ (मृदाशास्त्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com