दुष्काळातही जपली प्रयोगशीलता

नागरे कुटुंबाची शेतीतील धडपड उल्लेखनीय आहे. शेती परवडत नाही, असा सूर अनेकांकडून ऐकण्यास मिळतो. मात्र अशांनी ही शेती निश्चित पाहावी. म्हणजे त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच तयार होईल. रामचंद्र फरसे, मंडळ कृषी अधिकारी
कापूस पिकाचा चांगला आधार झाला.
कापूस पिकाचा चांगला आधार झाला.

दुष्काळात काही वर्षे वाया गेली. मात्र जिद्द व प्रयोगशीलतेच्या जोरावर माहेर भयगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील नागरे कुटुंबाने एकत्रितपणे राबत डाळिंब, थोड्या क्षेत्रातील भाजीपाला व कापूस अशा पीकपद्धतीतून कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळात अनेक वेळा शेतीतील प्रयोगांवर मर्यादा येतात. मात्र आहे त्या परिस्थितीतही काही कुटुंबे शक्य त्या प्रयोगांची आस धरून शेती सुकर करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब नागरे या ३४ वर्षीय युवा शेतकऱ्याचे कुटुंबही याच पठडीतील आहे. येथील बाबासाहेब यांची केवळ पावणेपाच एकर शेती आहे. दुष्काळात गेलेली वर्षे पारंपरिक शेतीत कापूस, तूर, गहू अशीच पिके घेत असल्याने उत्पन्न फारसे काही मिळत नव्हते. खरेतर मोसंबीसाठी प्रसिद्ध असा हा पट्टा आहे. थोडीफार तडजोड करून मोसंबी लावली. ती उत्पादन देऊ लागली. मात्र पाण्याअभावी तोडावी लागली. पर्यायाने तुलनेने कमी पाणी लागणारे डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला; पण मग कलमांसाठी पैसे नव्हते. मग रोजंदारी करून उत्पन्न कमावले. त्यातून कलमे घेता आली. पुढे सतत तीन वर्षे दुष्काळाला सामोरे जावे लागले. डाळिंब पिकावरही त्याचा परिणाम झाला. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झाले. मग बाबासाहेबांनी एका कंपनीत नोकरी करण्यास सुरवात केली. आजही नोकरी सांभाळतच ते शेतीकडे लक्ष देतात. शेतीचे नियोजन शेतीतील नियोजन चांगले असेल, तर ती निश्चित फायद्याची होऊ शकते याचा अनुभव आला. आपल्या एकूण पावणेपाच एकर क्षेत्रात सुमारे सव्वादोन एकरांवर डाळिंबाच्या ‘भगवा’ वाणाची लागवड केली. आज त्यात सुमारे ९०० झाडांचे संगोपन सुरू आहे. तेवढ्या झाडांमधून सुमारे १५ टन उत्पादन घेतले जाते. दुष्काळात हाच काय तो मुख्य आधार राहिला आहे. त्याचबरोबर २० गुंठ्यात पेरू आहे. त्याचे उत्पादन सुरू होण्यास अजून अवधी आहे. डाळिंबाने बसवली आर्थिक घडी डाळिंबाने २०१० व ११ मध्ये चांगले उत्पादन मिळाले. सन २०११ मध्ये सुमारे दीड टन डाळिंब एका व्यापाऱ्यामार्फत निर्यातही केले. मात्र तो दर स्थानिक बाजारापेक्षा कमी मिळाला. पुढे सततच्या दुष्काळात उत्पादन कमी झाले. पण जिद्द सोडली नाह. सन २०१४ पासून पुन्हा डाळिंबाचे चांगले उत्पादन मिळू लागले. यंदाच्या जून-जुलैमध्ये सुमारे तीन टन माल विकला. आता १५ टन डाळिंब विक्रीस तयार आहे. या पिकातून वर्षाला ७० हजार रुपयांचा नफा शिल्लक राहतो. भाजीपाला देतोय ताजे उत्पन्न डाळिंबाव्यतिरिक्त साधारण १० ते २० गुंठ्यात भाजीपाला घेतला जातो. वीस गुंठे क्षेत्रावर कापूस आहे. वांगी, टोमॅटो, कोबी व फ्लॉवर ही भाजीपाल्यातील मुख्य पिके आहेत. बाबासाहेबांची आई आठवडे बाजारात माल घेऊन जाते व थेट विक्री करते. त्यातून ताजे उत्पन्न हाती येते. वरचा सर्व खर्च भागवला जातो. कापूस पिकापासून सुमारे सात क्विंटल उत्पादन मिळते. या सर्वांमधून वर्षभराचे आर्थिक गणित जुळवले जाते. पाण्याची व्यवस्था पाण्यासाठी एक विहीर व दोन कूपनलिका आहेत; पण खरी मदार विहिरीवरच आहे. दोन्ही कूपनलिकांचे पाणी विहिरीत घेऊन तेथूनच संपूर्ण शेताला सिंचन केले जाते. सन २००७ मध्ये आणि २०११ ते १३ या काळात पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची खरी किंमत समजली. त्यानंतर संपूर्ण शेतीला ठिबक बसवून घेतले. आता मोकळे पाणी दिले जात नाही. खर्च कमी केला, सेंद्रिय खताचा वापर वाढवला शेतातील काडीकचरा न जाळता त्याचा उपयोग डाळिंबाला सेंद्रीय आच्छादन म्हणून व उर्वरित कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो. घरी सुमारे चार देशी गायी आहेत. त्यांच्या शेणा-मूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. त्याचा दर १५ ते २० दिवसांनी वापर केला जातो. यातही निंबोळी पेंंडीचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला. शेतीतील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. सेंद्रीय घटकांच्या वापराने आता जमीनही चांगली नरम झाली असून सुधारत आहे. कृषी विभागाची मदत अशोक वाघचौरे यांनी डाळिंब, पेरू लागवडीसाठी मार्गदर्शन; तर मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र फरसे यांनी सतत प्रोत्साहित केले. काही काळ कृषीमित्र म्हणून बाबासाहेबांची निवड झाली होती. घरचेच सर्वजण राबतात नागरे कुटुंबातील सर्वजण शेतात राबतात. त्यामुळे काहीच प्रसंगी बाहेरील मजुरांची गरज भासते. पूर्वी स्वतःची शेती करून सुरक्षित उदरनिर्वाहासाठी इतरांच्या शेतात जावे लागे. आता स्वतःच्या शेतातच मजुरांना रोजगार दिला जातो.

-  बाबासाहेब नागरे ः ९४२०७६३९९२ --------------------------------------------- - प्रदीप अजमेरा (लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com