विधान परिषदेच्या २४ जागांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : येत्या पाच महिन्यांत विधान परिषदेच्या २४ जागा रिक्त होत आहेत. विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारी मिळावी किंवा राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागावी म्हणून इच्छुक कामाला लागले आहेत.

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या ९ सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिलला संपत आहे. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी तीन तर शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाच्या भेटीगाठी घेऊन विधान परिषदेसाठी आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे.

राज्यातील सत्तांतरामुळे विधान परिषद निवडणुकीची गणिते बदलली आहेत. आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार असल्याने या निवडणुकीत भाजपला मित्र पक्ष आणि अपक्षांच्या सहाय्याने किल्ला लढवावा लागेल. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने निवडणूक झाल्यास मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांची मुदत संपत आहे. विधान परिषदेवर कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रातील व्यक्ती राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद आहे. मात्र, १९९९ पासून राजकीय व्यक्तींची सोय लावण्याचा पायंडा पडला आहे. त्यामुळे या वेळीसुद्धा आघाडी सरकारकडून राजकीय नेमणुका होण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारासंघासाठी जून-जुलै महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.   विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य

  •  विधानसभा सदस्यांद्वारे निवडून गेलेले सदस्य ः  काँग्रेस : चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड. राष्ट्रवादी : हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर. भाजप : पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ, अरुण अडसड. शिवसेना : डॉ. नीलम गोऱ्हे.
  • राज्यपाल नामनियुक्त सदस्य ः काँग्रेस : हुस्नबानू खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर.   राष्ट्रवादी काँग्रेस : प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे.  आरपीआय : जोगेंद्र कवाडे. (राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांनी राज्यपाल नामनियुक्त सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.)
  • पदवीधर मतदारसंघ  : सतीश चव्हाण (औरंगाबाद), अनिल सोले (नागपूर). चंद्रकांत पाटील विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधरची जागा रिक्त आहे.
  • शिक्षक मतदारसंघ  : श्रीकांत देशपांडे (अमरावती), दत्तात्रय सावंत (पुणे).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com