सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक १ जानेवारीला, तर पंचायत समित्यांच्या सभापतींची निवडणूक ३१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ताकद पणाला लावली आहे. 

विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. त्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ तत्कालीन सरकारने दिली होती. ही मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया लागू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तोपर्यंत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करत ही मुदत जास्तीत जास्त सहा महिन्यांची केली होती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना अधिक मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता होती. मात्र वाढीव दोन महिन्यांच्या आतच निवडणूक लावण्याचे आदेश शासनाचे असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ही निवडणूक प्रक्रिया नुकतीच जाहीर केली. 

त्यानुसार १ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सकाळी दहा ते १२ या वेळेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करावे लागतील. दुपारी दोन ते २.१० या वेळेत विशेष सभेच्या अनुषंगाने आवश्‍यक बाबी तपासल्या जातील. दुपारी २.२१ ते २.३० यावेळेत अर्ज माघारी घेण्यास मुदत असणार आहे. दुपारी २.३१ नंतर पुढे आवश्‍यकता असल्यास मतदान घेतले जाईल, तसेच निकाल जाहीर केला जाईल. 

पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी बुधवारी (ता.३१) निवडणूक होईल. सकाळी ११ ते ११.३० यावेळेत अर्ज दाखल करणे, ११.३१ ते ११.४५ यावेळेत अर्जांची छाननी करणे, ११.४६ ते १२ पर्यंत अर्ज माघारी घेण्यास मुदत, दुपारी १२ नंतर आवश्‍यकता असल्यास मतदान व त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. या प्रक्रियेला अवघे दहा दिवस बाकी राहिल्याने इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे राजकीय ताकद पणाला लावली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com