पुणे जिल्ह्यातील संभाव्य टंचाई निवारणासाठी २५ कोटींचा कृती आराखडा

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्यातील गावे, वाड्यावस्त्यांवरील संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जून २०२० पर्यंत २५ कोटी १२ लाख ८८ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. मागील वर्षी शंभर कोटींचा टंचाई आराखडा असताना, यंदाच्या टंचाई आराखड्यातील तरतुदीत घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षीच्या मॉन्सून हंगामात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे भूजल पातळी टिकून असल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत अद्याप वाहते आहे. यातच जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक आहे. परिणामी यंदा दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसणार नाहीत. मात्र दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागातील गाव, वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

पावसाळ्यापर्यंत तीन ते चार महिने पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने २५ कोटी १२ लाख ८८ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. या टंचाई कृती आराखड्याला राज्य शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील ४४९ गावांमधील एक हजार ७२० वाड्यावस्त्यांमधील संभाव्य टंचाई निवारणार्थ विविध योजनांद्वारे एक हजार ६३२ कामे करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यंदाच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये नवीन विंधन विहीर आणि कुपनलिका घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी १६२ गावांतील ८८६ वाड्यावस्त्यांचा समावेश असून, त्याकरिता ४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. नळ दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, विहीर अधिग्रहित करणे, टँकर, बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे, अशा अनेक कामांचा समावेश आहे. आराखड्यानुसार नियोजित टंचाईग्रस्त ठिकाणी या योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन धरणांतील पाण्याचे व्यवस्थित रितीने नियोजन केले असता पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. परंतु, ज्या ठिकाणी अद्याप नळ योजना पोचली नाही, अशा ठिकाणी नळ योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार ७६ गावांतील ३८९ वाड्यावस्त्यांवर ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ८ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे.

टंचाई कृती आराखड्यात केल्या जाणाऱ्या उपाययोजना
उपाययोजना प्रस्तावित कामे  खर्च (रुपयांत)
विंधिन विहीर घेणे  ९६६ ४ कोटी ९५ लाख 
नळ दुरुस्ती ११५   १२ कोटी ५६ लाख
विंधन विहीर दुरुस्ती २८६ ८२ लाख ३० हजार
तात्पुरत्या नळ योजना   २२ २ कोटी ६१ लाख ५० हजार
टँकरने पाणीपुरवठा ८२ २ कोटी ८ लाख ५५ हजार
विहिरी अधिग्रहण  ८८  ५८ लाख ३ हजार
विहिरी खोल करणे  ७३ १ कोटी ५१ लाख ५० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com