मुली, स्त्रियांमध्ये अजूनही असुरक्षिततेची भावना : डॉ. भालचंद्र नेमाडे

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे आयोजित सोहळ्यात राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज यांचा पुरस्कार देऊन सन्मान कारण्यात आला.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे आयोजित सोहळ्यात राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज यांचा पुरस्कार देऊन सन्मान कारण्यात आला.

जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही असुरक्षिततेची भावना आहे. महिलांची प्रगती, सुरक्षा, याबाबत आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे. पण, तसे दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंब, क्षेत्र यात महिला पुढे येत आहेत. त्यांना प्रेरणा द्यायला हवी, त्यांच्या सुरक्षेवर भर द्यायला हवा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी येथे व्यक्त केले.

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे कला-साहित्य क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जैन हिल्स येथील गांधीतीर्थावरील कस्तुरबा सभागृहात मंगळवारी (ता. २५) सायंकाळी हा सोहळा पार पडला. कविवर्य ना. धों. महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. नेमाडे म्हणाले, की मुली-स्त्रिया आज सर्वाधिक असुरक्षित आहेत. आपल्याकडे समाजशास्त्रज्ञ आहेत, कायदेतज्ज्ञ आहेत; पण कोणालाही याप्रश्नी काहीही उपाय सापडत नाही. महिलांवरील अत्याचारांबाबत सातत्याने वर्तमानपत्रांमधून येत असते, याचे सर्वांनी चिंतन करायला हवे. दुसरीकडे मुस्लिमसुद्धा असुरक्षित आहेत. उत्तरेतील मुघल सैन्याविरुद्ध मराठी बाणा एकत्र करणारे, शहाजी वगैरे सगळ्यांना एकत्रित करणारे मलिक अंबर होते. शिवरायांच्या घोडदळात मुस्लिम घोडेस्वार होते, त्यांचे काही अंगरक्षक मुसलमान होते. 

तत्पूर्वी जैन परिवारातील सर्व स्नुषा ज्योती, शोभना, भावना, अंबिका जैन यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

प्रत्येक जण जीवन जगताना काहीतरी लिहीतच असतो. अर्थात, हे लिखाण जेव्हा कागदावर अथवा अलीकडच्या काळात कॉम्प्युटरवर उतरते तेव्हा ते साहित्य होते, असे मेघना पेठे म्हणाल्या. सध्याच्या जगात संवाद हरवलाय, माणूस दूर जातोय एकमेकांपासून. हा संवाद शोधण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळेल, असे अजय कांडर म्हणाले. सध्या हा समाज कमालीचा अस्वस्थ झालाय. अशा स्थितीत आपल्यासारख्या लेखकांकडून लेखन झाले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे रफीक सूरज यांनी सांगितले. 

पुरस्कार म्हणजे कलावंताला मिळणारं खतपाणी : राम सुतार जीवनात कोणती शिल्पे साकारली, कोणते कार्य केले हे आजपर्यंत माहीत नव्हतं. या पुरस्कार सोहळ्यातील चित्रफितीच्या रूपाने ते समोर आलं. हा अथवा यासारखा कुठलाही पुरस्कार, सन्मान हा केवळ गौरव नसतो... तर ते पुढील कार्यासाठी त्या कलावंताला मिळालेलं खत-पाणी असतं, अशी भावना जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी व्यक्त केली. अशा वाटचालीत मिळणारे हे पुरस्कार आपल्याला पुढील कार्यासाठी स्फूर्ती देणारे ठरतात, असेही ते म्हणाले.   यांना मिळाले असे पुरस्कार राम सुतार यांचा ‘कांताई साहित्य-कला जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, २ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. मेघना पेठे यांना कवयित्री बहिणाबाई, अजय कांडर यांना बालकवी ठोमरे, तर रफीक सूरज यांना ना. धों. महानोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com