साखर कारखान्यांवरील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या रद्द

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः फडणवीस सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी साखर कारखान्यांवर नेमलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. भाजपने पक्षकार्यकर्त्यांच्या सोईसाठी या नियुक्त्या केल्या होत्या. राज्यात नवे सरकार आल्यानंतर अशा संचालकांना हटवण्यात येत आहे. राज्य शासनाने १९ सहकारी साखर कारखान्यांवर भाजप नियुक्त प्रशासक आणि शासन नियुक्त संचालक हटवले आहेत. 

राज्यातील सहकार क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. राज्यात २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपने टप्प्याटप्प्याने सहकारावर अंकुश ठेवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. सहकारी कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. निवडणुकीच्या माध्यमातून सहकारी संस्था जिंकणे शक्य नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थांवर शासन नियुक्त पदाधिकारी नेमले. भाजप कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी मागच्या दरवाजाने साखर कारखाने, जिल्हा बँका आदी संस्थांवर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त्या केल्या गेल्या. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे अशा संचालकांना हटवण्यात येत आहे. नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या १९ सहकारी साखर कारखान्यांवर भाजपने नियुक्त केलेले प्रशासक आणि शासन नियुक्त संचालक हटवले आहेत. साखर आयुक्तांना सरकारने संबंधित साखर कारखान्यांवरील सर्व प्रशासकीय संचालक बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच येत्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आणि साखर कारखान्यांच्या सोसायट्यांवरील सदस्यदेखील हटवण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. 

गेल्याकाळात फडणवीस सरकारने साखर कारखान्यांना दिले जाणारे अर्थसाह्य कमी केले. त्यामुळे अनेक साखर कारखाने डबघाईला आले. हे कारखाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे असल्याने त्यांची आर्थिक कोंडी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. आर्थिक आणि राजकीय नुकसान होऊ लागले. परिणामी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, साखर कारखाने वाचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. मात्र, आता राज्यात सत्तासमीकरणे बदलल्याने भाजपच्या इच्छा आकांक्षांना लगाम बसला आहे. ठाकरे सरकारने सुरुवातीला बाजार समित्या आणि आता साखर कारखान्यांवरील भाजपच्या तथाकथित तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करून भाजप कार्यकर्त्यांची परत पाठवणी केल्याचे बोलले जात आहे. 

नियुक्त्या रद्द करण्यात आलेले कारखाने

  • रेणा सहकारी साखर कारखाना, लातूर.
  • माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती
  • नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, इंदापूर
  • आदिनाथ सहकारी साखर कारखाना, सोलापूर
  • मकाई सहकारी साखर कारखाना, सोलापूर
  • छत्रपती सहकारी साखर कारखाना, इंदापूर
  • पूर्णा सहकारी साखर कारखाना, हिंगोली
  • रावसाहेब पवार सहकारी साखर कारखाना, शिरुर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद
  • विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर
  • दूधगंगा सहकारी साखर कारखाना, भुदरगड
  • आजरा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर
  • संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी
  • सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती
  • संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
  • विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा
  • भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस-दौंड 
  • अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा
  • डॉ. पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना, कडेगाव-सांगली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com