कर्जफेडीसाठी विचारपूर्वक योजना आखाव्यात : कॅगचा राज्य शासनाला सल्ला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या राज्य सरकारला कर्जाची परतफेड करण्यासाठी विचारपूर्वक योजना आखण्याचा सल्ला ‘कॅग’ने दिला आहे. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार नवे कर्ज घेत असल्याची बाब ‘कॅग’ने अधोरेखित केली आहे. 

विधानसभेत शुक्रवारी (ता. २०) ‘कॅग’चा अहवाल सादर करण्यात आला. यात कर्ज व्यवस्थापनाचा आढावा घेताना ‘कॅग’ने सरकारला नजीकच्या काळात परतफेड करायच्या कर्जाबाबत योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. येत्या चार वर्षांत राज्याला जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांची परतफेड करायची आहे. पुढील सात वर्षांत १ कोटी ८४ लाख ३५६ म्हणजेच ५६.३७ टक्के कर्ज परत करावे लागणार आहे. परिणामी सरकार कर्जाच्या सापळ्यात अडकू शकते. ते टाळण्यासाठी विचारपूर्वक योजना आखाव्यात, असे कॅगने म्हटले आहे. 

कर्ज फेडण्यासाठी सरकार नवे कर्ज घेत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे. २०१३ ते २०१८ या दरम्यान कर्ज परतफेडीचा खर्च ३४ हजार ८९७ कोटी रुपये होता. हा खर्च ३९ हजार ६०० कोटींच्या कर्जातून भागवण्यात आला. कर्जाचा मोठा हिस्सा कर्ज चुकविण्यासाठी खर्च होतो हे स्पष्ट आहे. अशामुळे प्रगतीला चालना देण्यासाठी, विकासकामांवरती खर्च करण्यासाठी कर्जाचा अतिशय कमी भाग उपलब्ध होतो, असे ‘कॅग’ने नमूद केले आहे. 

८३ हजार कोटी खर्चूनही सिंचन प्रकल्प अपूर्ण जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या ४१२ सिंचन प्रकल्पांवर ८३ हजार ४९५ कोटी रुपयांचा खर्च होऊनही सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिल्याबद्दल ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. कामे पूर्ण करण्यात विलंब झाल्यामुळे कामांची किंमत वाढण्याचा धोका असतो. शिवाय अशा विलंबामुळे प्रकल्पाचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत, असे झणझणीत अंजन ‘कॅग’ने सरकारच्या डोळ्यात घातले आहे.  

विधानसभेत शुक्रवारी कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. यात जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या पाच पाटबंधारे विकास महामंडळांच्या ४१२ प्रकल्पांची माहिती ‘कॅग’ने दिली. अहवालात १९८ प्रकल्प १५ वर्षांपेक्षा अधिक काळ तर ६७ प्रकल्पांचे काम ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारने चालू प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी शिफारस ‘कॅग’ने केली आहे.  

कर्जपरतफेडीचे वेळापत्रक
वर्ष  रक्कम
२०१८-१९  २३ हजार ८८ कोटी रुपये
२०१९-२१  ४० हजार ७३९ कोटी रुपये
२०२१-२३   ६० हजार ९२१ कोटी रुपये

तोट्यातील वैधानिक महामंडळे बंद करण्याची ‘कॅग’ची शिफारस

राजकीय सोय म्हणून पाहिली जाणारी तोट्यातील वैधानिक महामंडळे, ग्रामीण बँका, संयुक्त कंपन्या, सहकारी आणि विभागीय वाणिज्यिक उपक्रम बंद करण्यासाठी पावले उचलावीत, अशी शिफारस भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी केली आहे.

विधानसभेत शुक्रवारी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कॅग’चा राज्य वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल सादर केला. ‘कॅग’ने या अहवालात तोट्यातील सरकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. ३१ मार्च २०१८ ला संपलेल्या आर्थिक वर्षात ३२ सार्वजनिक उपक्रम तोट्यात होते आणि त्यांचा निव्वळ तोटा हा ४९ हजार १९२ कोटी होता, असे ‘कॅग’ने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर तोट्यातील उपक्रमांचे सरकारने पुनर्विलोकन करावे, असे उपक्रम बंद करण्यासाठी अथवा त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलावीत. तसेच, तोट्यातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावे मिळण्याची संधी दुर्लभ असून सरकारने भविष्यात या कंपन्यांना समभागाऐवजी अनुदानाच्या रूपाने प्रदाने करावीत, असा सल्ला ‘कॅग’ने दिला आहे.

२०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत झालेला ४५५० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय केल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. ही बाब राज्य घटनेच्या अनुच्छेद २०४ चे उल्लंघन करणारी आहे. कारण विधानमंडळाच्या मान्यतेशिवाय एक रुपयाही खर्च केला जाऊ शकत नाही. या तत्त्वाचा भंग झाल्याने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे ‘कॅग’ने म्हटले आहे. ३१ मार्च २०१८ ला ६५ हजार ९२१ कोटी रकमेची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर न करणे, विशिष्ट कारणांशिवाय मंजूर केलेल्या अनुदानाच्या उपयोगावार विभागाचे योग्य संनियंत्रण नसल्याचे दाखवते. प्रमाणपत्राची प्रलंबितता, निधीचा दुरुपयोग अथवा अफरातफरीचा धोका दर्शवते, असे निरीक्षण ‘कॅग’ने नोंदवले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com