बा, विठ्ठला.. देशाला कोरोनामुक्त आणि माझ्या बळीराजाला सुखी कर !

पंढरपूर, जि. सोलापूर :महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (ता. १) घातले.
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

पंढरपूर, जि. सोलापूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (ता. १) घातले.  महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा सर्वोच्च बिंदू असलेल्या आषाढी  सोहळ्यातील एकादशीची महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी नगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी  सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन  श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे,  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पंढरपुरातील यंदाचा आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, यासाठी मंगळवारी (ता.३०) दुपारी २ वाजल्यापासून ते गुरुवारपर्यंत (ता.२ जुलै) संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी राज्यभरातील मानाच्या प्रमुख नऊ पालख्यांनाच नियम, अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पालखीबरोबर २० वारकऱ्यांनाच परवानगी आहे. दोन दिवसांच्या या कालावधीत पंढरपुरातील लोकांना केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल. 

यंदा दर्शन रांगच नसल्याने मंदिरातील सहा विणेकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ८४ वर्षीय विठ्ठल बडे यांची निवड झाली. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले विठ्ठल बडे हे मंदिराच्या सभामंडपात विणेकरी आहेत. गेल्या तीन महिन्यांत लॉकडाउनमध्येही त्यांनी अखंड सेवा बजावली आहे.    पंढरी झाली सुनीसुनी दरवर्षी आषाढी वारीच्या आधी पंधरवड्यापासूनच पंढरपुरात भक्तिरसाला उधाण आलेले असते. वारकऱ्यांच्या सततच्या गर्दीने अवघी पंढरी भक्तिरसाने भारून गेलेली असते; पण यंदा ‘कोरोना’च्या संकटामुळे अवघी पंढरी सुनीसुनी झाली आहे. चंद्रभागा नदीचा घाट आणि मंदिर परिसरात फक्त शांतता आहे. राज्यभरातून येणारे वारकरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनापासून दूर राहिलेच; पण या वारीसोहळ्यातील छोट्या-छोट्या विक्रेत्यांचे आर्थिक गणितही यंदा बिघडले आहे. पंढरीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अनुभव येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com