विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग देशासाठी करावा ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आपण कृषी क्षेत्राबाबत जे ज्ञान घेतले त्याचा योग्य वापर करा. विद्यापीठाकडे आज मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र आहे. या क्षेत्रावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. कर्तृत्वाने शेती क्षेत्रातील एक निष्णात तज्ज्ञ म्हणून तुम्ही गौरविले जाऊ शकता. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल.
दिक्षान्त समारंभात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
दिक्षान्त समारंभात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अकोला  ः विद्यार्थ्यांनो, तुम्ही जे ज्ञान अवगत केले त्याचा समाज, देशासाठी उपयोग करा. आयुष्यात कधीही निराश होऊ नका. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता, असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केले. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बुधवारी (ता. ५) ३४ व्या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे, कुलगुरू डॉ. विलास भाले, नवी दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष प्रा. आदित्यकुमार मिश्रा, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, विद्यापीठ परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. शरद निंबाळकर आदी उपस्थित होते.

या वेळी प्रा. आदित्यकुमार मिश्रा म्हणाले, की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. भारताच्या एकूण कृषी क्षेत्रफळाच्या ८४ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. विदर्भाचेही ८६ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सिंचनाच्या अपुऱ्या व्यवस्था विदर्भाच्या विकासातील मोठी अडचण आहे. त्यामुळे शाश्‍वत सिंचन व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. उद्यानविद्या पिकांसोबतच गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, तसेच कोंबडी पालनातून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण केले जाऊ शकते. देशाच्या एकूण कृषिमाल निर्यातीत राज्याचा ५० टक्के वाटा आहे. आंबा, द्राक्षे, संत्रा, कांदा, तसेच विविध भाजी पिकांच्या निर्यातीत राज्य अग्रेसर आहे. सन २०१७-१८ मध्ये देशाची सेंद्रिय कृषिमाल निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे राज्याने, विदर्भाने सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमात निर्यातक्षम पिकांचा समावेश करावा. 

प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. भाले म्हणाले, की विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत ४८ हजार १९० विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली.  आज  विविध देशांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत. विद्यापीठाच्या कापूस पिकाची सुवर्ण शुभ्रा, सोयाबीनची सुवर्ण सोया, मोहरीची टीएएम १०८-१, हरभऱ्याची कनक अशा वाणांची शिफारस करण्यात आली आहे. प्रकाश सापळ्याचे २०५० संच सामंजस्य करारातील उद्योजकांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोचली आहेत.  वैदेही ९५ या रंगीत कापूस वाणाचा प्रयोग यशस्वी झाला. विद्यापीठाच्या ज्वारी, संत्रावर्गीय फळे, कृषी अवजारे व यंत्रे तसेच कापणीपश्‍चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान या चार केंद्रांना उत्कृष्ट केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com