दांडी समुद्रकिनारी मंगळवारी मत्स्य दुष्काळ परिषद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग  ः एलईडी मासेमारी आणि पर्ससीन नेटधारक मासेमारी आणि वातावरणातील बदलामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना आपल्या समस्या मांडण्यासाठी दांडी समुद्रकिनारी (ता.मालवण) येथे मंगळवारी (ता.११) १० वाजता मत्स्यदुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘मी मत्स्यदुष्काळग्रस्त’ या मोहिमेस सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मत्स्यदुष्काळ परिषदेच्या नियोजनाबाबत नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आबा वाघ, भाऊ मोरजे, संतोष शेलटकर, नितीन परुळेकर, महेंद्र पराडकर आदी या वेळी उपस्थित होते. एलईडी मासेमारी, पर्ससीन नेट मासेमारी आणि समुद्रातील सतत बदलणारे वातावरण यामुळे पारंपरिक मच्छीमार गेल्या महिन्यापासून हवालदिल झाले आहेत. पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळची झळ बसत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार गेले काही दिवस मत्स्यदुष्काळ परिषद घेण्याचे नियोजन करीत होते. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही परिषद मंगळवारी (ता.११) घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

परिषदेत पारंपरिक मासेमारी प्रकारातील रापण, वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोट इंजिनाच्या सह्याने गिलनेट प्रकारातील मांड मासेमारी करणारे मत्स्यव्यावसायिक, न्हैय मासेमारी करणारे बल्यावधारक, मासेविक्रेत्या महिला, मासेमारीस जाणाऱ्या महिला, मासळी वाहतूक करणारे हातगाडी, रिक्षा, टेम्पो व्यावसायिक, बर्फ कारखानदार, मच्छीमार सहकारी संस्था, मासेमारी साहित्य विक्रेते, इंजीन दुरुस्ती करणारे व्यावसायिक, मासळी एजंट, हॉटेल व्यावसायिक आदी मासेमारी अवलंबून असणारे घटक सहभागी होणार आहेत. या परिषदेत मासेमारीवर अवलंबित घटकांच्या दोन प्रतिनिधींना लिखित स्वरूपातील अहवाल मांडता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com