राज्य शासकीय कार्यालयांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १२) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुटी राहील. यासोबतच दररोज ४५ मिनिटांचे जादा काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून होईल.

सध्या बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० अशी आहे. ती आता सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहील. बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांसाठीदेखील ही वेळ ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सध्या कामाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. मात्र, आता पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबईबाहेरील सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १ ते २ या वेळेतील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळदेखील अंतर्भूत आहे.

  हा निर्णय यांना लागू नाही ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना तसेच शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलिस दल, अग्निशमन दल, सफाई कामगारांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही.

ज्या कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही त्यांची नावे पुढीलप्रमाणे ः अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलिस, कारागृहे, पाणीपुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार. शैक्षणिक संस्था : शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने. जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, नगर, आष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा. नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामांवरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी. सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर. महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटक, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे. सामान्य प्रशासन विभाग : शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग. कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : शासकीय मुद्रणालये. कौशल्य व उद्योजकता विकास : सर्व आयटीआय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com