नगरमध्ये उद्योग सुरू; पण मजुरांची वानवा

एमआयडीसीत मजुरांची निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने नोडल एजन्सी नियुक्त करावी. त्याद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना एमआयडीसीमध्ये कामाला येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारीही कमी होईल. सध्या रेल्वेने वाहतूक केली जाते. मात्र, मोठ्या प्रमाणात मागणी करणाऱ्यालाच त्याचा फायदा होतो. शुल्कही जास्त आकारले जाते. लहान उद्योजकांना कच्चा माल आणण्यासाठी रेल्वेची प्रक्रिया सुटसुटीत केली पाहिजे. - अशोक सोनवणे, संस्थापक, असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्‍चरिंग इंडस्ट्रीज (आमी)
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः लॉकडाउन शिथिल करताना केंद्र व राज्य सरकारने उद्योग सुरू करण्यावर भर दिला. मात्र, लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेले ३० हजार परप्रांतीय मजूर गावी गेले. त्यामुळे एमआयडीसीतील ८५० पैकी ४३९ उद्योग सुरू झाले असले, तरी त्यांना मजुरांची कमतरता जाणवत आहे. दुसरीकडे, ‘कोरोना’च्या भीतीमुळे ट्रान्सपोर्टने कच्चा माल आणण्याची वाहनचालकांची मानसिकता नाही. अशा अनेक अडचणींचा सामना उद्योजकांना करावा लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.

नगर जिल्ह्यात एल अँड टी, सिमलेस, कमिन्स, क्‍लासिक व्हिल, सिद्धी फोर्जिंग, हायटेक इंजिनिअरिंग, नीट व्हाइन्ट इंडस्ट्रीज, जितामित्रा इंडस्ट्रीज आदींसह ८५० पैकी ४३९ उद्योग सुरू आहेत. दुसरीकडे व्हिडिओकॉन, अंबिका वेस्ट मॅनेजमेंट, अहमदनगर अलाईज आदी कंपन्या मात्र अद्याप बंद आहेत. लॉकडाउनच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० हजार मजूर आपल्या गावी गेले. एमआयडीसीत उद्योगांसाठी मजूरच मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बहुतांश उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल मुंबईतून येतो. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही चालक वाहन नेण्यास तयार नाही. कच्चा माल आणण्यात अनेक अडचणी आहेत. एमआयडीसीतील जवळपास १५ हजार कामगारांपैकी सहा हजार कामगार उपस्थित आहेत. एमआयडीसीत आता बहुतांश उद्योग सुरळीत सुरू झाले आहेत. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, जेवणाच्या वेळा निश्‍चित करून प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. होमिओपॅथिक औषधे, निर्जंतुकीकरण कक्ष, असे वेगळे प्रयोगही कंपन्यांनी राबविले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com