लुकलुकणाऱ्या दिव्यांचे अस्तित्व संपतेय

जंगलातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. यामुळे काजव्यांची वसतिस्थाने धोक्‍यात आली आहेत. त्यांच्या खाद्यान्नाचीही कमतरता आहे. याशिवाय शहरांमधील प्रखर दिव्यांच्या झगमगाटात यांचे अस्तित्व ते काही प्रमाणात असले तरी जाणवत नाही. त्यांना पाहण्यासाठी दुर्गम जंगलातच जावे लागते. पर्यावरणाची होत असलेली हानी, मानवाचे दुर्लक्ष आदी कारणे या आकर्षक जिवाच्या मुळावर उठली आहेत. - डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ, अकोला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भाग, शेतशिवार, जंगल, खेड्यानजीकचा परिसर, एवढेच नव्हे तर शहराला लागून असलेल्या सीमा क्षेत्रात सायंकाळपासून चमचमते ‘दिवे’ दिसायचे. निसर्गाने दिलेल्या असंख्य सुंदर भेटींपैकी एक असलेले हे चमचमते दिवे म्हणजे काजवे. असंख्य तारे आकाशात तर त्यासारखेच लुकलुकणारे, प्रकाश देणारे अनेक काजवे जमिनीवरही हमखास दिसायचे. कवी, गीतकार यांच्यासह लहानांपासून ते मोठ्यांना किर्रकिर्र आवाज करणाऱ्या काजव्यांचे मोठे आकर्षण. परंतु, आता यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शहरी भागात तर यांचे अस्तित्वच संपल्यात जमा आहे.   

वळवाचा पाऊस पडल्यापासून संततधार पावसाला सुरुवात होईपर्यंत काजवे चमकताना दिसतात. हा कालावधी साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा असतो. हा काळ प्रौढ नर मादी काजव्यांच्या मिलनासाठी (मेटिंग) योग्य असतो.

काजवा कशामुळे चमकतो काजव्याच्या शरीरात ल्युसिफेरीज नावाचे एन्झाइम असते. त्यामध्ये असलेल्या ल्युसिफरीन नावाच्या घटकासह कॅल्शिअम, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या रसायनांचा ऑक्‍सिजनशी संपर्क येतो आणि काजव्याचा विशिष्ट भाग प्रकाशमान होतो.

काजवा का चमकतो आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काजवे चमकतात. नर काजवे विशिष्ट पद्धतीने प्रकाशमान होऊन मादीला संदेश देतात. मादीला हा नर काजवा योग्य वाटल्यास तीसुद्धा विशिष्ट पद्धतीने प्रकाशमान होत सकारात्मक संदेश देते

काजवे सर्वसाधारणपणे ओलावा असलेल्या ठिकाणी आढळतात. पाणथळ वस्ती, गवत, भरपूर प्रमाणात झाडेझुडपे असतील अशा जागी पानांखाली ते अंडी घालतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे हा प्रभावी उपाय आहे. यासाठी आपला परिसर, सभोवतालचे वातावरण नैसर्गिक अवस्थेत ठेवावे लागेल.

काही काजव्यांच्या प्रजातींमधील मादी प्रकाशमान होत नर काजव्याला आवाहन करतात. मिलनाच्या ओढीने नर काजवे त्यांच्याकडे आकर्षिले जातात. हा क्षणिक मोह नर काजव्यांसाठी नुकसानकारक ठरतो. कारण या विशिष्ट प्रजातींमधील माद्या नर काजवे जवळ आल्यानंतर त्यांना खातात. अनेक जातीतील नर काजवे मिलनानंतर तर मादी काजवे अंडी दिल्यानंतर मरतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

संख्या कमी होण्याची कारणे

  • काजव्यांच्या वसतिस्थानात वाढता मानवी हस्तक्षेप
  • कीटकनाशक आणि रसायनांचा अतिवापर
  • पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अळीअवस्थेत खाद्यान्न मिळणे कठीण
  • प्रकाशाच्या प्रदूषणामुळे नर-मादी काजव्यांमध्ये संदेशवहनात अडथळे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com