Agriculture Development : गुणवत्ता, सहकारामुळे जर्मनीचा ब्रँड

जर्मनीमधील बँकांमध्ये मोबाईल अॅप, सीबीएस सिस्टीम, इंटरनेट बँकिंग, डिजिटल बँकिंगचा चांगला वापर केला जातो. शेतकऱ्यांना या बँकांकडून अत्यंत कमी दराने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज मिळते. या देशातील शेतकऱ्यांच्या संस्थांनी शेतमालाची मागणी आणि पुरवठा यांचा उत्तमप्रकारे मेळ घातल्याने शेतमाल विक्री अभावी पडून राहत नाही.
BLUE BERRY PLANTATION
BLUE BERRY PLANTATION

जर्मनीमधील बँकांमध्ये मोबाईल अॅप, सीबीएस सिस्टीम, इंटरनेट बँकिंग, डिजिटल बँकिंगचा चांगला वापर केला जातो. शेतकऱ्यांना या बँकांकडून अत्यंत कमी दराने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज मिळते. या देशातील शेतकऱ्यांच्या संस्थांनी शेतमालाची मागणी आणि पुरवठा यांचा उत्तमप्रकारे मेळ घातल्याने शेतमाल विक्री अभावी पडून राहत नाही.  

जर्मनीमधील सहकारी बँकिंग क्षेत्रात सीबीएस कार्यप्रणाली उत्तम प्रकारे विकसीत झाली आहे. ग्राहकांना सर्व सेवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने पुरविल्या जातात. या ठिकाणी सर्वत्र पेपरलेस बँकिंग पाहावयास मिळते. शासकीय आणि सर्व बँकिंग पत्रव्यवहार ई-मेल द्वारे केला जातो. त्यामुळे  बँकांच्या शाखांमध्ये अत्यंत कमी ग्राहक पाहावयास मिळतात. सहकारी बँकिंग प्रामुख्याने ग्रामीण भागात कामकाज करीत असल्याने बँकांचा शेतकऱ्यांशी सतत संपर्क येतो. शेतकऱ्यांना या बँकांकडून अत्यंत कमी दराने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज मिळते. प्रामुख्याने द्राक्षबाग, सफरचंद, ब्ल्यूबेरी त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.  सहकारी बँका या शेतकऱ्यांच्या बँका असल्यामुळे शेतमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या  खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने जमा होते. ई-मेलद्वारे शेतकऱ्यांना बाजारपेठेचे दर कळविले जातात. शेतकऱ्यांना दराची अद्ययावत माहिती वेळच्या वेळी उपलब्ध होते. या बँका ग्राहकांना तत्पर सेवा देतात. जर्मनीमध्ये सहकारी, खासगी आणि सार्वजनिक बँकांमध्ये डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तेथील सहकारी बँकांना खासगी व प्रादेशिक बँकांशी तीव्र स्पर्धा करावी लागते. परंतू  येथे सहकारी बँका दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहेत. सार्वजनिक व खाजगी बँकांवर आपल्या सारख्या आरबीआय प्रमाणे त्या बँकांवर तेथील सेंट्रल बँकेचे नियंत्रण असते. सहकारी बँकांवर आपल्याकडील नाबार्डप्रमाणे तेथील डीझेड बॅंकेचे नियंत्रण असते. वेगवेगळ्या बँकांमध्ये मोबाईल अॅप, सीबीएस सिस्टीम, इंटरनेट बँकिंग, डिजिटल बँकिंगचा चांगला वापर केला जातो.   आपल्याकडील बहुतांशी शेतकरी कर्जातून डेअरी व्यवसाय उभा करतात. शेती व शेतीपूरक व्यवसायाला राज्यातील सहकारी बँका कर्ज देतात. जिल्हा सहकारी बँका लहान शेतकऱ्यांना एका गाईपासून ५० गाईच्या गोठा उभारणीसाठी कर्ज देतात. शेतकरी त्यांच्या नियोजनानुसार दूध उत्पादन घेतात. परंतु प्रगत देशाच्या तुलनेत आपल्या देशातील सरासरी दूध उत्पादन कमी म्हणजेच दोन ते अडीच हजार लिटर प्रती वेत आहे. हेच प्रमाण जर्मनीमध्ये १० हजार लिटर, इस्त्राईलमध्ये १२  ते १३  हजार लिटर एवढे आहे. जर्मनीमध्ये गाईचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केले जाते. संतुलित आहार दिला जातो. पुरेशी पशुवैद्यकीय सेवा आणि तातडीच्या सुविधा उपलब्ध आहेत. प्री-कुलींग चेन देखील चांगल्या प्रकारे विकसित झाली आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राहते.   

फळांची निर्यात       फळ निर्यातीमधून जर्मनीस मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळते. जर्मनीतील संशोधकांनी स्थानिक वातावरणाला योग्य असणाऱ्या द्राक्ष, ब्लुबेरी, प्लम्स्, अॅपल, स्टोन फ्रूटस या पिकांच्या जाती विकसित केल्या आहेत. कृषी संशोधन केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. येथील तज्ज्ञ सातत्याने पीक उत्पादन वाढ, प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात. येथील शेतकरी सातत्याने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबकरून दर्जेदार उत्पादन घेतात.  शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार सहकारी संस्थेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे सहकारी संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरासरी पाच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमाल विक्रीसाठी सहकारी संस्था तयार केली आहे. संस्था सभासदांना खते, कीडनाशके, बी-बियाणांचा वेळेत पुरवठा करते. शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल प्री-कुलींग व्हॅनद्वारे सहकारी संस्थेमध्ये आणला जातो. त्या ठिकाणी शेतमालाची प्रतवारी आणि आकर्षक पॅकिंग करून बाजारपेठेमध्ये पाठविला जातो.  जर्मनीमधील शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांनी शेतमालाची मागणी आणि पुरवठा यांचा उत्तमप्रकारे मेळ घातल्याने शेतमाल विक्री अभावी पडून राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची विक्री आणि प्रक्रिया या बाबींची सर्व काळजी या संस्था घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादनाकडे लक्ष राहते, शेतकरी विक्रीची अजिबात चिंता करत नाहीत. अतिपाऊस, गारा यापासून फळबागांचे संरक्षण होण्यासाठी  बहुतांश शेतकरी फळबागा तसेच इतर पिकांसाठी नेटींगचा वापर करतात. यामुळे फळांना स्कॉर्चिंग होत नाही. चटे पडत नाहीत, कीड,रोगांचा प्रादूर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होतो. जर्मनीतील शेतकरी जास्त खर्चाचे नेटींग वापरतात. आपल्याकडेही गारपीट, अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी फळे, भाजीपाला पिकांसाठी नेटींगची गरज आहे. बॅंकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

पिकांचा ब्रँड महत्त्वाचा

  • जर्मनीमध्ये सहकारी तत्वावर शेतकऱ्यांची सोसायटी चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.म्हणून  शेतकऱ्यांना चांगले दर देणे शक्य झाले आहे. भाजीपाला, फळांसाठी प्री-कुलींग चेनची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रक्रिया अभावी फळे व भाजीपाल्याची नासाडी होत नाही. गुणवत्तेमुळे जर्मनीमधील फळे, भाजीपाल्यास जगभरात मागणी आहे.
  • महाराष्ट्रामध्ये द्राक्ष,केळी, संत्रा, चिकू, स्ट्रॉबेरी या पिकांचे चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतले जाते.यामध्ये सर्वोत्तम ब्रँड तयार झाले आहेत. नाशिकची द्राक्षे, सांगोल्याचे डाळिंब, नागपूरची संत्री, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, देवगडचा हापूस आंबा बाजारपेठेत चांगला दर मिळवत आहे.आपल्याकडे  महाबळेश्वर किंवा  थंड हवेच्या ठिकाणी ब्लूबेरीची लागवड करता येणे शक्य आहे. आपल्याकडे प्री-कुल चेन विकसीत केल्यास शेतकरी देखील जगाची बाजारपेठ काबीज करण्यास कमी पडणार नाही. भविष्यामध्ये फळे, भाजीपाला किंवा एकूणच शेती किफायतशीर व्हावयाची असेल तर शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. 
  • - डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०

    (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com