तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात जर्मनीची आघाडी

Horticulture in Germany
Horticulture in Germany

जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि उच्चशिक्षित मनुष्यबळ हे मुख्य भांडवल. या देशाने बँकिंग, सहकार, शेती व दुग्ध व्यवसायामध्ये चांगले काम केले आहे. निर्यात व्यापार हा जर्मनीच्या आर्थिक उत्कर्षाचा पाया आहे. कार्यक्षमता आणि निर्मिती कौशल्य ही जर्मनीची ओळख आहे. 

जर्मनी या देशाने प्रतिकूल परिस्थितीतून केलेली आर्थिक प्रगती नवल वाटणारी आहे. जर्मनी हा युरोपमधील वेगळा चेहरा असलेला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्मिती कौशल्य सिद्ध करणारा देश म्हणून ओळखला जातो. भारत आणि जर्मनीमध्ये एक समांतर रेषा म्हणजे दोन्ही देशांचा भूगोल त्याचप्रमाणे शेकडो वर्षांचा इतिहास आहे. साहित्य, संस्कृती, कृषी आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रात भारताशी तुलना करण्याइतके साम्य जर्मनी देशात आहे. जर्मनीने विपत्तीमधून स्वतःची सोडवणूक करून स्वायत्त अशी ओळख निर्माण केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने आणि संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या बरोबरीने मी काही महिन्यांपूर्वी जर्मनी देशाचा दौरा केला. या दौऱ्यात सहकारी व्यवस्था, बॅंकेची कार्यप्रणाली, शेती, फळे, फुले, भाजीपाला तसेच पणन व्यवस्था, डेअरी उद्योगाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.   ऱ्हाईन नदी म्हणजे जर्मनीतील गंगा. या नदीच्या दोन्ही काठाला असलेल्या द्राक्ष बागांतून त्यांनी निर्मिती कौशल्याचा धडा घेतला. उपलब्ध निसर्ग संपत्तीमधून आपले जागतिक महत्त्व प्रस्थापित केले. दुसऱ्या महायुद्धातील अपयशानंतर विजेत्या राष्ट्रांनी जर्मनीचे तुकडे करून आपसात वाटून घेतले. पूर्व जर्मनी व इतर काही भाग रशियाने घेतला. उरलेल्या तीन विभागावर अमेरिका, इंग्लंड व फ्रान्सने एक विचाराने कारभार केला. या तीन विभागांना पश्चिम जर्मनी असे नाव मिळाले. पश्चिम जर्मनीला वैभवाच्या शिखरावर नेण्याचे काम डॉ. लुडविंग एरहार्ड यांनी केले. जबर आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जर्मनीचे आर्थिक आरोग्य सांभाळले. कृषी विकास व उद्योग दोन्ही क्षेत्रात जागतिक स्तरावरून मानांकन संपादन केले. जर्मनीला सतत लाभलेले सर्वोच्च नेतृत्व तसेच सामान्य शेतकरी, कामगारांच्या जिद्दीमधून कृषी औद्योगिक क्रांती झाली. जर्मनीची राजधानी बर्लिन आणि आर्थिक राजधानी फ्रँकफुर्ट आहे. युरोपमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. शिक्षित मनुष्यबळ हे त्यांचे भांडवल. या देशाने बँकिंग, सहकार, शेती व दुग्ध व्यवसाय चांगले काम केले आहे. 

सहकार, कृषी उद्योगाला दिशा  जगातील सहकार व कृषी उद्योगाला नवीन दिशा देणारी संस्था जर्मनीमधील मॉन्टबर येथे आहे. जागतिकस्तरावरील सहकार चळवळीची बौध्दिक राजधानी आहे. व्यवस्थापन क्षेत्रात सहकार हा विषय आर्थिकदृष्ट्या मजबूत करून त्यामधून परिवर्तनाचा धडा गिरवण्याचे काम येथे केले जाते. सहकार व कृषी ही विकासाच्या तराजूची दोन पारडी असून याठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रती वर्षी पंचवीस हजारांहून अधिक अभ्यासक येतात. या ठिकाणी उत्पादकता वाढीचे बाळकडू मिळते. शेती क्षेत्राचा विचार करता दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, अन्नधान्य व मांस याचे सर्वोच्च उत्पादन करण्याचा गुरुमंत्र येथे दिला जातो. कृषी व उद्योग या दोन्ही क्षेत्रांत समान भूमिका आहे. जगातील एक हजाराहून अधिक सहकार तज्ज्ञांशी संपर्क ठेवून अद्ययावत मार्गदर्शन केले जाते.      तौलनिकदृष्ट्या जर्मनीपेक्षा आपल्याकडे शेती करणाऱ्यांची टक्केवारी खूप मोठी आहे. तेथील तंत्रज्ञान व संशोधन जर आपल्याकडे आले तर जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता मिळवू शकतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तौलनिकदृष्ट्या कृषी क्षेत्र, उपलब्ध पाणी व मुबलक सूर्यप्रकाश आहे. जर्मनीमधील नागरिकांच्यामध्ये उद्यमशीलता प्रचंड आहे. तेथे ऐंशी वर्षांचा माणूस कृषी किंवा उद्योगात रमलेला पहावयास मिळतो. निर्यात व्यापार हा जर्मनीच्या आर्थिक उत्कर्षाचा पाया आहे. कार्यक्षमता व निर्मिती कौशल्य ही जर्मनीतील सर्वांची ओळख आहे. आपल्यालाही कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे. इस्त्राईल, ब्राझील, अमेरिका आणि जर्मनी अशा अनेक ठिकाणी शेती व शेतीपूरक व्यवसायामधून चांगली क्रांती झाली आहे. त्यांच्यामध्ये अडचणीवर मात करण्याची क्षमता आहे. भारतात सतत शासकीय मदतीची अपेक्षा केली जाते. हे चित्र बदलून भारतामध्येदेखील सहकाराच्या माध्यमातून कृषी परिवर्तनाचे स्वप्न आपल्याला साकार करावे लागेल.

तंत्रज्ञान, व्यापारावर भर

 एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जर्मनीमध्ये शेती केली जाते. येथील उत्पादित शेतमालाला खात्रीशीर बाजारपेठ आहे. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण ७० टक्के आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनीतील कृषी उत्पादने विशेषतः दुग्ध उत्पादनांना चांगली मागणी आहे. येथील शेतकऱ्यांचे  कृषी व्यवस्थापन खूपच चांगले असल्याने त्याचा चांगला फायदा होतो. दर कमी झाले तर शासकीय हमी आणि विम्याची तरतूद आहे. शास्त्रशुद्ध उत्पादन, हुकमी बाजारपेठ, गुणवत्तेच्या निकषावर पुरवठा यामुळे स्पर्धा आणि हमखास फायदा असे समीकरण आहे. जर्मनीमधील दुग्धजन्य पदार्थ सहकाराच्या माध्यमातून वितरित केले जातात. जर्मनीत दीड टक्का शेती केली जाते. ६० टक्के जमीन लागवडीखाली आहे. यांत्रिकीकरण, शेतमालाचे मजबूत वितरण, गरजेनुसार सतत संशोधनासाठी प्रयोगशाळा आहे. याठिकाणी सुसज्ज यंत्रणा, दुग्ध व्यवसायाप्रमाणे फळपिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ऱ्हाईनच्या दोन्ही काठावर मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड आहे. द्राक्ष लागवडीतून वाईनची चांगली बाजारपेठ उभी राहिली आहे.  

बँकिंग व्यवसाय

जर्मनीतील सहकार चळवळीला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. जर्मनीतील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे बँकिंग व्यवसाय. फ्रँकफर्टमध्ये बहुतेक बँकांची प्रमुख कार्यालये असून त्यातून आर्थिक जाळे विणलेले आहे. त्रिस्तरीय बँक व्यवस्था हे जर्मनीतील आर्थिक मजबुतीकरणाचा पाया आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशहिताला प्राधान्य दिले जाते. सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक गरजा भागवणारे मजबूत व्यासपीठ म्हणजे सहकार, शेतीपेक्षा व्यावसायिक नोकर संख्या जास्त असल्याने ठेवी व गुंतवणुकीचे प्रमाण चांगले आहे. फळ निर्यातीतून जर्मनीला चांगले परकीय चलन मिळते.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०  (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com