जमिनीच्या प्रकारानुसार वनशेतीचे नियोजन

वनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त ठरते. यामधून चारा, जळाऊ लाकूड, शेती-अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघू-वनउपज मिळते.
melia block plantation
melia block plantation

वनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त ठरते. यामधून चारा, जळाऊ लाकूड, शेती-अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघू-वनउपज मिळते.

वातावरण, हवामान आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचे काम ही जंगले करतात. परंतु ही वन संपत्ती नष्ट होत चालली आहे. जंगलतोडी बरोबरच होणारे अमर्याद प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण या कारणांमुळे हवामान बदलाचा दर वेगाने वाढत आहे. यामुळे तापमानातील कमी-जास्त बदल, समुद्र पातळी वाढ, अति व अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती, दुष्काळ, बर्फ वितळणे व ओझोन थर विरळ होणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत जात आहे.  या सर्व समस्यांना उत्तर म्हणून जगातील १४० पेक्षा जास्त देशांनी वनशेतीचा एक प्रभावी साधन म्हणून स्वीकार केला आहे. कारण ही पद्धती हवामान बदलांना अनुकूलन  करण्याबरोबरच तसेच त्याचे परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी  आहे.  वनशेतीचे फायदे     सध्याच्या काळामध्ये वनशेती हा शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळवून देण्याच्या खात्रीबरोबरच वातावरण बदलांच्या आपत्तींचा सामना करण्याची क्षमता आहे. वनशेतीपासून चारा, फळे, भाजीपाला, जळाऊ लाकूड, जमिनीचा पोत सुधारणे, निकृष्ट व पडीक जमिनींचे व्यवस्थापन, वाऱ्यापासून होणारे संरक्षण असे फायदे मिळतात. या व्यतिरिक्त, कागद व प्लायवूड उद्योगांसाठी वनशेतीमधून कच्चा माल उपलब्ध होतो.     सध्याच्या परिस्थितीत वनशेतीला चालना मिळावी यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय कृषिवानिकी नीती लागू केली आणि याच्या अंतर्गत बहूउपयोगी वृक्षांना शेतीमध्ये लावण्यासाठी प्रसार आणि प्रचार केला जात आहे. याच्याच अंतर्गत राष्ट्रीय वनशेती आणि बांबू मिशनची २०१७ मध्ये सुरुवात झाली. वनशेती म्हणजे काय? वनशेती ही अशी भू-व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये हंगामी व बारमाही पिकांबरोबर फायदेशीर वृक्षांना शेतीमध्ये वैविध्यपूर्ण मिश्रित करून उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला जातो. वनशेतीच्या विविध पद्धती या जमिनीच्या प्रतीनुसार, पर्जन्यमानानुसार व स्थानिक गरजेनुसार ठरविल्या जातात. पडीक, बरड आणि नापीक असलेल्या जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त असून, त्यामधून चारा, जळाऊ लाकूड, शेती-अवजारांसाठी लाकूड, निवारा, फळे आणि लघू-वनउपज मार्फत शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतो.  वनशेती ही पद्धतशीरपणे म्हणजेच चौरस किंवा आयताकृती रोपण पद्धतीमध्ये (दोन्ही ओळींमधील अंतर हे १२ ते ३० फूट आणि एका रोपांपासून दुसऱ्या रोपांचे अंतर हे ६ ते २४ फूट), शेताच्या बांधावरती (एक ओळ, जोड ओळ किंवा नागमोडी पद्धतीमध्ये सरासरी ५ ते १० फूट अंतर) आणि विखुरलेल्या पद्धतीमध्ये (५० ते २०० वृक्ष/हेक्टर) आढळतात.  वनशेतीमध्ये वृक्षांची निवड 

  •   सरळ व जलद वाढ; वृक्षाचे छत सछिद्र व दंडगोलाकर; प्रतिकूल जमीन व हवामान परिस्थितीतसुद्धा वाढीची क्षमता असावी. कमीत कमी कीटक, रोग, पक्षी व प्राण्यांचा प्रादुर्भाव; बहूउपयोगी; नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता; कमी पाण्याची गरज असावी. इतर पिकांशी सूर्यप्रकाश, पाणी व पोषक द्रव्यांसाठी स्पर्धा न करणारा; खोल सोटमूळ प्रणाली, मातीची सुपीकता वाढविण्यास मदत आणि कमीत कमी व्यवस्थापन असावे. 
  •   प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी वृक्षांची छाटणी किंवा विरळणी करून हवा आणि प्रकाश खेळता राहील, पिकांच्या उत्पादनात जास्त घट येणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • वनशेतीच्या पद्धती   

    कृषी वनशेती  

  •   या पद्धतीमध्ये हंगामी पिके ही पद्धतशीरपणे व तांत्रिकदृष्ट्या योग्य अंतरावरती लावलेल्या वृक्षांच्या ओळीमध्ये पेरली जातात. यामध्ये सोयाबीन, कडधान्ये, गहू, तेलबिया पिके ही साग, कडुलिंब, महोगणी, निलगिरी, बांबू या पिकांबरोबर घेतली जाऊ शकतात.
  •   ज्या वेळी झाडांच्या सावलीचे प्रमाण वाढेल, त्या वेळी सावली सहन करणारी पिके जसे की हळद, आले व औषधी वनस्पतींची लागवड करावी. 
  • कृषी उद्यान  

  •  राज्यामध्ये या पद्धतीचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. या पद्धतीत फळझाडांमध्ये हंगामी किंवा बारमाही पिके काही वर्षांपर्यंत घेता येतात. 
  •  पाणी आणि जमिनीच्या उपलब्धतेनुसार फळपिके आणि आंतरपिकांची निवड केली जाते. 
  •  हलक्या व मुरमाड जमिनीमध्ये चिंच, बोर, आवळा, शेवगा, सीताफळ, बेल आणि करवंद या फळझाडांची लागवड करता येते. 
  •  बागायती क्षेत्रात आंबा, चिकू, पेरू, डाळिंब यांसारख्या पिकांची लागवड करून त्यामध्ये भाजीपाला किंवा फुलपिकांची लागवड केली जाते. 
  •  कृषी वनोद्यान  

  •  उंच व सरळ वाढ होणाऱ्या वनवृक्षांची (साग, निलगिरी, सुरू, सिल्व्हर ओक) लागवड फळबागेच्या चहूबाजूंनी बांधावर केली जाते. यामुळे जोरदार किंवा वादळी वाऱ्यापासून तसेच उष्ण वाऱ्यापासूनही फळबागेचे संरक्षण केले जाते. 
  •  बागायती पट्ट्यामध्ये, फळपिकांबरोबर एकदल किंवा द्विदल वर्गीय पिके मोकळ्या जागेत पहिल्या ३ ते ४ वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकतात. उदा. द्राक्ष बागेत मोकळ्या जागेमध्ये झेंडू किंवा मका लागवड करावी. चहू बाजूंनी निलगिरी, साग किंवा सिल्व्हर ओक लागवड करावी. 
  • वनीय कुरण

  •   या पद्धतीमध्ये चारावर्गीय पिके जसे की गिनी गवत, ऱ्होडस गवत, पॅरा ग्रास, नेपियर, दीनानाथ, अंजन, डोंगरी, पवना, स्टायलो, रानमूग व मेथी घास बरोबर सुबाभूळ, अंजन, निंबारा, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारुख, तुती व बाभूळ यांसारखी झाडे पद्धतशीर किंवा विखुरलेल्या पद्धतीने लागवड करतात.
  •   ही प्रणाली हलक्या, उथळ किंवा मुरमाड पडीक जमिनीवरती केली जाते. ज्यामुळे चाऱ्या बरोबरच जमिनीची सुपीकताही वाढते.
  • कृषिवनीय कुरण  

  •   यामध्ये पारंपरिक कडधान्यबरोबर काही सुधारित चारा पिकांची (नेपियर हायब्रीड, मेथीघास किंवा मका) चारा देणाऱ्या वृक्षांबरोबर (सुबाभूळ हेज पद्धती) किंवा इमारती लाकूड देणाऱ्या वृक्षांबरोबर (साग, महोगणी इत्यादी) त्री-स्तरीय प्रणालीमध्ये लागवड करतात.   
  • सघन लागवड 

  •   यामध्ये व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या झाडांची लागवड कमी अंतरावर म्हणजेच जास्त घनतेमध्ये (५०० वृक्ष प्रति हेक्टर व त्यापेक्षा जास्त) केली जाते.
  •   याचा मुख्य उद्देश हा कागद निर्मिती, जैव इंधन, इमारतीसाठी पोल आणि वीजनिर्मिती कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी आहे. 
  •   ज्या जमिनीत विविध कारणांस्तव (पाणथळ, आम्ल व क्षारयुक्त इ.) पिके किंवा फळपिके घेण्यासाठी नापीक असतात. अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने वृक्ष लागवड केली जाऊ शकते. यासाठी सुरू, निलगिरी, साग, महोगणी, बांबू व सुबाभूळची लागवड ३ × ३ फूट, ५ × ५ फूट, १० × १० फूट, १२ × ५ फूट व १२ × ८ फूट एवढ्या अंतरावर केली जाते. 
  • - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७  (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com