मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान

बायोफ्लाक कल्चरनिर्मिती टाकी
बायोफ्लाक कल्चरनिर्मिती टाकी

जैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो किंवा अजिबात पाणी बदलले जात नाही. येत्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. पाण्याची कमतरता आणि जमिनीची अत्यल्प   उपलब्धता असल्याने मत्स्य संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण पद्धती अवलंबल्या जातात. संवर्धन कालावधीमध्ये पाण्याच्या गुणवत्तेविषयी (अमोनिया, नाइट्राईट) समस्या उद्भवतात. मत्स्यशेतीमध्ये मासे उत्पादन खर्चाच्या ५० टक्केपेक्षा जास्त हिस्सा मत्स्यखाद्याचा असतो. त्यामुळे हा खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर मत्स्यशेतीमध्ये जैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञान पर्याय आहे. या तंत्रज्ञानामध्ये जास्तीत जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक करून कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो.  जैवपूंज  तंत्रज्ञान  

  • जैवपूंज (बायोफ्लाक) म्हणजे एकपेशीय वनस्पती, जिवाणू, आदिजीव आणि टाकीतील इतर सेंद्रिय घटक जसे उरलेले खाद्य, माशांची विष्ठा यांचा पूंजका. हा पुंजका जिवाणूंनी सोडलेल्या चिकट पदार्थांच्या सहाय्याने एकत्रित बांधला जातो. 
  • मत्स्यसंवर्धन तलावात शिल्लक राहिलेले खाद्य, माशांची विष्ठा आणि अमोनिया इ. साचतात. अमोनियाचे रूपांतर नाईट्रोमोनास व नायट्रोकोकस जिवाणूंच्या साह्याने नाईट्राईटमध्ये होते. नाईट्राईटचे रूपांतर नाईट्रोबॅक्टर व नायट्रोस्पीरा जिवाणूंच्या साह्याने नाईट्रेटमध्ये होते आणि त्यानंतर नायट्रोजनमध्ये होते.
  • पाण्यातील नायट्रोजनच्या प्रमाणानुसार कार्बनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. जर कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर १० किंवा त्यापेक्षा अधिक (१०-२०:१) असे ठेवले तर टाकाऊ घटकांचा वापर परपोषित जिवाणू स्वतःच्या पोषणासाठी करतात आणि पाण्यात जैवपूंज (बायोफ्लाक) तयार होतो. जैवपूंजमध्ये जिवाणू, प्राणीप्लवंग, सूत्रकृमी (निमेटोडस) असतात. 
  • संवर्धित प्राणी जैवपूंज-प्लवंग खाद्य म्हणून वापर करतात. हवेचा पुरवठा करून जैवपूंज पाण्यात तरंगत ठेवायचा. अशा प्रकारे या पद्धतीमध्ये टाकाऊ घटकापासून तलावात खाद्य तयार होते. ते संवर्धनादरम्यान वापरण्यात येणारे मासे किंवा कोळंबीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. या तंत्रज्ञानामध्ये अमोनियाचे प्रमाण कमी करता येत असल्याने पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा कमी वापर व पुनर्वापर यामुळे या तंत्रज्ञानाला झिरो वॉटर तंत्रज्ञान असे म्हटले जाते.
  • बायोफ्लाक पद्धतीमध्ये मत्स्यसंवर्धन करताना प्रथम पॉलिथिन लाईन तलाव पाण्याने भरून घ्यावेत. हवेचा पुरवठा करावा. त्यात इतर संवर्धनयुक्त तलावातील चिखल ५० किलो ग्रॅम प्रति हेक्‍टर या प्रमाणात टाकावा. जलद गतीने जैवपूंज तयार होण्यासाठी नायट्रोजन ५ ते २५ किलो ग्रॅम प्रति हेक्‍टर या प्रमाणात आणि कार्बन स्त्रोत साखर किंवा मोलॅसिस टाकावे. यानंतर संवर्धनासाठी मासे/कोळंबी सोडून त्यांना खाद्य द्यावे. हे मासे/कोळंबी जैवपूंजचा खाद्य म्हणून वापर करू शकतात. तसेच हे मासे/कोळंबी व त्यांची पिल्ले पाण्यात असणारे सस्पेंडेड सॉलिडचे प्रमाण जास्त असले तरी जगू शकतात. यामध्ये कोळंबी, तिलापिया व कार्प जातीच्या माशांचे संवर्धन केले जाते. तिलापियाचे १५-२० किलो ग्रॅम प्रति घनमीटर, कोळंबीचे १५ ते २० टन प्रति हेक्‍टर व रोहू बोटूकली १५० नग प्रति घनमीटर एवढे उत्पादन मिळू शकते.
  • या पद्धतीमध्ये पाण्यातील जैवपूंजांचे प्रमाण तपासणे गरजेचे असते. यासाठी इमहाफ कोन वापरावेत. इमहाफ कोनमध्ये तलावातील १ लिटर पाणी भरून पाण्यातील जैवपूंज तळाला साचल्यावर सुमारे २० मिनिटांनी जैवपूंजाचे प्रमाण (मि.लि./ लि.) तपासावे. मासे/कोळंबी संवर्धनासाठी जैवपूंजाचे प्रमाण  १० ते १५ मि.लि./ लि. तर तिलापियाच्या संवर्धनासाठी २५-५० ते ५० मि.लि./ लि.  असावे.
  • खाद्यातील घटकांचे प्रमाण

  • जैवपूंज पद्धतीने मत्स्यसंवर्धन करताना खाद्याबरोबर कार्बन स्त्रोत वापरले जातात. सहज व स्वस्त दरात उपलब्ध होणारे कार्बन स्त्रोत जसे मोलॅसिस, भाताचा कोंडा, गव्हाचा कोंडा, गूळ, साखर इत्यादी वापरावेत. सुरुवातीलाच कार्बन स्त्रोतातील कार्बनचे प्रमाण तपासून घ्यावे, जेणेकरून तलावात मिसळायचे दैनंदिन कार्बनचे प्रमाण ठरवता येईल. कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर १० किंवा त्यापेक्षा अधिक (१०-२०:१) असावे. खाद्यातून पाण्यात जाणाऱ्या नायट्रोजनची मात्रा खाद्याच्या प्रथिनांच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणजेच खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण माहिती असावे. नायट्रोजनच्या मात्रेनुसार आपण कार्बन स्त्रोताची दैनंदिन मात्र ठरवू शकतो.
  • जैवपूंजचा आकार संवर्धन काळात वाढतो, जसा आकार वाढतो तसा तो तळाशी जमा होतो. त्यामुळे यापासून हानीकारक वायूची निर्मिती होऊन ते संवर्धन केल्या जाणाऱ्या मासे/कोळंबीला घातक असतात. त्यामुळे तळाशी गोळा झालेला गाळ (स्लज) काढून टाकावा. 
  • -  डॉ. केतन चौधरी,९४२२४४११७८ (मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com