जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोत

Biofloc culture tank
Biofloc culture tank

पाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू यांच्या प्रमाणानुसार निर्माण होणाऱ्या जैवपुंजाचे पोषण मूल्य बदलत असते. नायट्रोजनच्या मात्रेनुसार आपण कार्बन स्रोतांची दैनंदिन मात्रा ठरवू शकतो.  

जैवपुंज (बायोफ्लॉक) तयार करण्यासाठी विविध कार्बन स्रोतांचा वापर केला जातो. चांगल्या प्रकारच्या जैवपुंज निर्मितीसाठी विविध प्रकारचे कार्बन स्रोत वापरले जातात. सध्या मनुष्य आणि प्राण्यांच्या अन्ननिर्मिती कारखान्यातून निर्माण होणारे विविध वनस्पतीजन्य घटक पदार्थांचा जैवपुंज निर्मितीसाठी कार्बन स्रोत म्हणून वापर मोठ्या प्रमाणात होतो. एखाद्या घटकपदार्थाची आपण कार्बन स्रोत म्हणून निवड करताना याची स्थानिक उपलब्धता, किंमत, विघटनशीलता, जिवाणू निर्माण करण्याची क्षमता या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.     सध्या बाजारात अनेक प्रकारचे कार्बन स्रोत उपलब्ध असले तरी स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या कार्बन स्रोताचा जास्तीत जास्त वापर जैवतंत्रज्ञानासाठी होणे आवश्यक आहे. याचा असा फायदा होतो की ते सहज उपलब्ध असतात, तसेच स्वस्त असतात. मुख्य म्हणजे काही घटकपदार्थ मनुष्याच्या दैनंदिन जीवनात कमी प्रमाणात वापरले जात असले तरी जैवपुंज निर्मितीसाठी त्यांचा खऱ्या अर्थाने चांगला वापर होऊ शकतो.

जैवपुंज निर्मितीत कार्बन स्रोतांचा वापर 

  • सुरुवातीला जेव्हा जैवपुंज निर्माण करायचा असतो तेव्हा सुयोग्य प्रकारचे कार्बन स्रोत वापरले जातात. कोणत्याही प्रकारचा कार्बन स्रोत निवडताना प्रथम त्यामधील कार्बनचे प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे. तसेच संवर्धन करीत असलेल्या माशांचे अथवा कोळंबीला देण्यात येणाऱ्या खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण माहिती असणे जास्त गरजेचे आहे. कारण पाण्यात निर्माण होणाऱ्या नायट्रोजनचे प्रमाण हे पूर्णपणे खाद्यातील प्रथिनांवर अवलंबून असते. 
  • कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर १० किंवा त्यापेक्षा अधिक (१०-२०:१) असावे. नायट्रोजनच्या मात्रेनुसार आपण कार्बन स्रोताची दैनंदिन मात्र ठरवू शकतो.
  • एकदा आवश्यक तेवढा जैवपुंज टाकीत तयार झाला की तो संवर्धित मासे/कोळंबी खाद्य म्हणून वापरतात. त्यामुळे निर्माण झालेल्या जैवपूंजात घट होत असते. ती घट भरून काढण्यासाठी व संवर्धित मासे/कोळंबी यांच्या आवश्यकतेनुसार खाद्य उपलब्ध होण्यासाठी संवर्धना दरम्यान सतत कार्बन स्रोतांचा वापर करुन जैवपुंज निर्माण केला जातो.
  • कार्बन स्रोत हे जैवपुंज बनवण्याच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी संवर्धन पूर्ण होईपर्यंत जैवपुंज सुस्थितीत ठेवण्यासाठी वापरली जातात‌.
  • मत्स्य संवर्धनासाठी वापरले जाणारे कार्बन स्रोत

  • जैवपुंज पद्धतीने मत्स्यसंवर्धन करताना खाद्याबरोबर विविध कार्बन स्रोत वापरले जातात. सहज व स्वस्त दरात उपलब्ध होणारे कार्बन स्रोत जसे मोलॅसिस, भाताचा कोंडा, गव्हाचा कोंडा, गूळ, साखर, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, मक्याचे पीठ, तसेच बाजारात सहजपणे उपलब्ध असणारे स्टार्च, डेक्स्ट्रोज इत्यादी वापरले जातात.
  • कार्बन स्रोत संवर्धन टाकीत स्वतंत्रपणे किंवा एक-दोन स्रोत एकत्रित योग्य प्रमाणात टाकले तर आपणास चांगल्या प्रकारचे जैवपुंज तयार करता येऊ शकते.
  • प्रत्येक कार्बन स्रोतात असलेली विविध पोषण मूल्ये तसेच वापरल्या जाणाऱ्या कार्बन स्रोताची जीवाणू निर्माण करण्याची क्षमता देखील महत्त्वाची आहे. 
  • पाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू यांच्या प्रमाणानुसार निर्माण होणाऱ्या जैवपुंजाचे पोषण मूल्य बदलत असते. जर उत्तम प्रतिचे जैवपुंज निर्माण करायचे असेल तर कार्बन स्रोताचे पोषण मूल्य तसेच पाण्याचे गुणधर्म माहित करून घेणेसुद्धा गरजेचे आहे. 
  •  - डॉ. केतन चौधरी, ९४२२४४११७८ (मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com