तंत्र कारले लागवडीचे...

साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या कारल्याला त्याच्या उंदरासारख्या आकारामुळे चुहा कारले या नावानेही ओळखले जाते. अशा कारल्याची लागवड मंडप पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.
bitter gourd cultivation
bitter gourd cultivation

साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या कारल्याला त्याच्या उंदरासारख्या आकारामुळे चुहा कारले या नावानेही ओळखले जाते. अशा कारल्याची लागवड मंडप पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

बाजारात जवळपास ५ ते ४५ सेंमी लांब व ४५ ग्रॅम पासून ८५० ग्रॅमपर्यंत वजनाची कारली उपलब्ध आहेत. कारली पिकाचे असे जवळपास १६ हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील आकाराने लहान, किंचित उंदरासारख्या दिसणाऱ्या कारल्याला चुहा कारले म्हणून ओळखले जाते. अर्थात, फळांचा रंग, आकार आणि आवरणाच्या खरबडीतपणा यानुसार प्रत्येक विभागातील ग्राहकांच्या पसंती वेगळी असू शकते. अत्यंत कडू असले तरी त्यातील कर्बोदके, प्रथिने, खनिजे, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून कारल्याची भाजी खाल्ली जाते. भारत, चीन, दक्षिण आशिया खंडातील देशामध्ये प्रामुख्याने कारल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या राज्यामध्ये काही प्रमाणात लागवड आहे.

  जमीन

  • चांगला निचरा होणाऱ्या, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी. 
  • जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ पर्यंत असावा.
  • चोपण जमिनीमध्ये लागवड करू नये.
  •  जमीन चांगल्या प्रकारे उभी आडवी नांगरून घ्यावी. 
  • हेक्टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत टाकून कुळवणी करून घ्यावी.
  •   हवामान

  • उष्ण व दमट हंगामातील पीक असून थंडीचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
  • चांगल्या उगवणक्षमतेसाठी किमान १० अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे. 
  •  फुले आणि वाढीसाठी २५-३० अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते. कमी तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागात सुद्धा लागवड केली जाऊ शकते.
  • ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मादी फुले, फळधारणा, आणि झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  •   हंगाम

  • उन्हाळी हंगाम : जानेवारी ते मार्च.
  • जास्त थंडी असल्यास फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी. 
  • खरीप हंगाम : जून-जुलै 
  •   लागवडीसाठी अंतर 

  • दोन ओळींतील अंतर  ३.५ ते ५ फूट आणि दोन वेलींतील अंतर २-३ फूट ठेवावे. 
  •   लागवड

  • साधारणपणे बियाणे टोकण पद्धतीने लावले जाते. 
  • थंड हवामानात उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याने हरितगृहामध्ये रोपवाटिका केल्यास अधिक फायदेशीर ठरते. अशा रोपांची पुनर्लागवड करावी. 
  • उबदार जमिनीत बियाणे टोकण पद्धतीने लावल्यास ६-७ दिवसांत उगवून येतात.
  •   सुधारित जाती

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला व हिरकणी.
  • डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ : कोकण तारा.
  • केरळ कृषी विद्यापीठ : प्रीती, प्रिया.
  • या शिवाय कोइमतूर लाँग,अर्का हरित, पुसा दो मोसमी, पुसा विशेष, सिलेक्शन ४,५,६ या जाती आहेत.
  •   बियाणे प्रमाण   हेक्टरी १.५ ते २ किलो.   पाणी व्यवस्थापन

  • वेलवर्गीय पीक असून, कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन होत नाही.
  • फळधारणा अवस्थेत २-५ दिवसाला गरजेनुसार पाणी दिल्याने उत्पादनामध्ये वाढ होते.
  •   खत व्यवस्थापन  

  • चांगले कुजलेले शेणखत २० टन प्रति हेक्टर.
  • लागवड करतेवेळी १००:५०:५० किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर. 
  •  नत्राचा डोस २-३ वेळेस विभागून द्यावा. 
  •  विद्राव्य खतांचा वापर उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतो.
  •   आंतरमशागत

  •  १५-२० दिवसांच्या अंतराने खुरपणी करून वेली सभोवतीची तणे काढून घ्यावी. 
  • जमीन भुसभुशीत ठेवावी. 
  • कारली हे वेलवर्गीय पीक असून, वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो. फळधारणा चांगली होते. त्यामुळे दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर ठरते.
  •   कीड, रोगनियंत्रण

  • रोग ः प्रामुख्याने भुरी व केवडा हे रोग आढळून येतात.
  • कीड : तांबडे भुंगेरे, फळमाशी व रसशोषक किडी मध्ये मावा, पांढरी माशी तसेच पाने -फळ पोखरणारी अळी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • रसशोषक किडीच्या बंदोबस्त करण्यासाठी पिवळे निळे चिकट सापळे लावावे. 
  •   काढणी

  • साधारणपणे ते १५-२० दिवसांत फूल लागल्यानंतर फळ काढणीसाठी येतात. (लागवड पासून ६०-७५ दिवसांत किंवा फुले लागल्यानंतर फळे वेगाने विकसित होतात. बाजारपेठेनुसार आवश्यक निकषाप्रमाणे फळे मिळण्यासाठी बारकाईने लक्ष देऊन वारंवार काढणी करावी लागते. 
  • फळ चमकदार हिरवे, जाड आणि लज्जतदार असावी. बिया मऊ आणि पांढऱ्या असाव्यात. 
  •  २-३ दिवसांच्या अंतराने कात्री किंवा धारदार चाकूच्या साह्याने कारली फळांची कापणी करावी. हेक्टरी १५ ते २५ टनापर्यंत उत्पादन मिळते. संकरित जातीची लागवड आणि उत्कृष्ट व्यवस्थापनातून उत्पादनामध्ये वाढ शक्य होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 
  • छोटी कारली

  • दक्षिण आशियाई देशातील काही जातींच्या संकरातून ही जात विकसित झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकरी या जातीची लागवड करत आहे.
  • साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान, उंदरासारख्या आकाराने चुहा कारली असे नाव पडले आहे. 
  • शेतकऱ्यांसाठी कापणी आणि वाहतूक करण्यास सोपी जात.
  • आकर्षक रंग व लहान आकारामुळे शहरी भागात लोकप्रियता वाढत आहे. 
  • ग्राहकांच्या दृष्टीने घरगुती साठवण, फ्रीजमध्ये ठेवण्यास योग्य जात.
  • वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवण्यासाठी योग्य.
  •  - गणेश सहाणे, ९६८९०४७१०० (गणेश सहाणे हे खासगी कंपनीमध्ये वेलवर्गीय पीक पैदासकार आहेत, रूपाली देशमुख कृषी महाविद्यालय, आळणी,  जि. उस्मानाबाद येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com