Black Pepper Production : दर्जेदार काळी मिरीचे उत्पादन तंत्र

मिरी लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक तसेच परसबागेत करता येते. कोकणातील हवामानात पन्न्यूर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात.
Black Pepper Production
Black Pepper Productionagrowon

मिरी लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक  तसेच परसबागेत करता येते. कोकणातील हवामानात पन्न्यूर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात. 

काळी मिरी वेलाच्या उत्तम वाढीसाठी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि १६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. कोकणातील हवामान काळी मिरीच्या लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मिरी लागवडीसाठी निवडावी. अति विम्ल किंवा आम्लयुक्त जमीन निवडू नयेत. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी वारंवार साचते अशा जमिनी निवडू नयेत. कोकणातील हवामानात पन्न्यूर-१ ही संकरित जात चांगले उत्पादन देते. या जातीचे लोंगर लांब आणि मिरी दाणे भरगच्च असतात.  लागवड तंत्र

  • लागवड स्वतंत्रपणे, नारळ व सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून, तसेच परसबागेत करता येते. 
  • स्वतंत्र मिरीच्या लागवडीसाठी ३ मी बाय ३ मी अंतरावर बिनकाटेरी पांगारा, सिल्वर ओक, भेंड किंवा मँजियम इत्यादी झाडांची मिरी लागवडीपूर्वी किमान ६ ते १० महिने आधी लागवड करावी. 
  • नारळ व सुपारी बागेत मिरी लागवडीसाठी नारळामध्ये ७.५ मी. बाय ७.५ मी. आणि सुपारीमध्ये २.७ मी बाय २.७ मी अंतर असावे. 
  •  परसबागेतील फणस, कोकम, आईन, आंबा, किंजळ, तसेच इतर झाडांवर देखील मिरी लागवड करता येते, या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश (किमान ५० टक्के) असणे आवश्यक आहे. 
  •  लागवड पावसाळा संपता संपता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करावी. 
  • लागवडीसाठी आधाराच्या झाडापासून किमान ४५ सें.मी. ते १ मी. अंतर सोडून ६० बाय ६०  बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खणावेत. 
  • खड्ड्यांमध्ये मुळ्या फुटलेली मिरीची दोन छाट कलमे प्रत्येक झाडाजवळ (खुंटाजवळ) लावावेत. 
  • पावसाचे पाणी साचू नये म्हणून वेलाजवळ मातीची भर द्यावी. वेलाला आधारासाठी काठी लावावी. 
  • व्यवस्थापन  

  • पावसाळा संपल्यावर मिरी वेलास पाणीपुरवठ्याची सोय करावी. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा अवलंब करावा.
  • पूर्ण वाढलेल्या एका मिरीच्या झाडाला तिसऱ्या वर्षापासून २० किलो शेणखत/कंपोस्ट, ३०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देणे आवश्यक आहे. खताची मात्रा वर्षातून दोनदा ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यात विभागून द्यावी. 
  •  मिरी सभोवती सातत्याने आच्छादन ठेवावे. आधाराच्या झाडांची गळून पडलेली पाने, गवत यांचा वापर करावा. 
  •  मिरीच्या वेलांना झाडावर (खुंटावर) चढेपर्यंत सैल बांधावे. 
  •  जलद व हळुवार मर आणि इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होताच संपूर्ण वेलावर आणि त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने दोन वेळा १ टक्का बोर्डो मिश्रण फवारावे. तसेच १० टक्के बोर्डो पेस्ट १ मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावी. रोगट पाने व मेलेल्या वेली मुळासह काढून जाळून टाकाव्यात.
  • काढणी आणि उत्पादन

  • लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पादन सुरू होते. मे-जून महिन्यांमध्ये तुरे येतात, तर जानेवारी ते मार्च या कालावधीत घोस काढण्यासाठी तयार होतात. 
  • घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलावरील सर्व घोस काढावेत. काढलेल्या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करावेत आणि हे दाणे उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून उन्हात वाळवावेत. या पद्धतीत मिरी दाणे   वाळवण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनीट बुडवून काढावेत. यामुळे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांतच वाळतात, दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. दाण्यांची प्रत सुधारते. 
  •  शंभर किलो हिरव्या मिरीपासून सुमारे ३३ किलो काळी मिरी मिळते. 
  • मिरीपासूनच पांढरी मिरी देखील तयार करतात. यासाठी पूर्ण पक्व झालेले (लाल/नारंगी रंगाचे) दाणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे उकळवतात किंवा वाफवतात. नंतर ते पल्पिंग यंत्रामध्ये घालून त्यांची वरची साल काढली जाते. साल काढल्यानंतर दाणे वाळवतात. पांढऱ्या मिरीचा उतारा सुमारे २५ टक्के इतका येतो. 
  • झुडूपवर्गीय काळी मिरी (बुशपेपर) 

  •  बुशपेपर कमी जागेत लावण्यासाठी उत्तम असते. झुडूप कुंडीमध्ये चांगले वाढते. तसेच या रोपांना जागाही कमी लागते. 
  •  बुशपेपर म्हणजे झुडूप मिरी. काळी मिरीच्या फुले आणि फळे धरणाऱ्या फांद्यापासून बुशपेपर मिरीचे रोप तयार करतात. 
  •  काळी मिरी वेल उंच आधाराच्या झाडावर वाढते. बुशपेपर म्हणजेच झुडूप मिरी अत्यंत कमी वाढते. त्यामुळे त्याची लागवड कुंडीत किंवा शेतात आधाराशिवाय करता येते. 
  • बुशपेपरची लागवड छाट कलमे तयार करून करतात. कुंडीमध्ये माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत १:१:१ प्रमाणात ठेवून 
  • कुंडी मिश्रणाने भरावी. कुंडीमध्ये कमीत कमी १० किलो मिश्रण भरावे. त्यामुळे झुडपाची वाढ जोमदार होते व उत्पादन जास्त मिळते. झुडपांची लागवड करून कुंडी अर्धसावलीत ठेवावी. 
  • बुशपेपर शेतामध्ये लावायचे असल्यास लागवड १ बाय १ मीटर किंवा १.५ बाय १.५ मीटर अंतरावर करावी. 
  • पावसाळा संपल्यावर बुशपेपर मिरी रोपांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठ्याची सोय करावी. ठिबक किंवा मायक्रोस्प्रिंक्लर या सुधारित पद्धतीचा वापर पाणीपुरवठ्यासाठी करावा.
  • बुशपेपरला वर्षभर घड येत असल्यामुळे योग्य प्रमाणात खते देणे आवश्यक आहे. कुंडीमधील बुशपेपर रोपांना दर दोन महिन्यांनी ५०० ग्रॅम कंपोस्ट खत, ५ ग्रॅम युरिया आणि ३ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश इतकी खताची मात्रा द्यावी. त्यामुळे बुशपेपरचे पूर्ण भरलेले घड लागतात. 
  • कुंडीमधील झुडपापासून १०० ते १५० ग्रॅम वाळलेली काळी मिरी प्रतिवर्षी मिळते.
  • - डॉ. राजन खांडेकर,  ८२७५४५४९७९,  - किरण शिगवण,  ९०४९८५३८१५  - सुमेद थोरात,  ७५८८६९६५६९ (उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com