प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्ष

जनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५ टक्के कमी होते. दूध उत्पादन १० ते १२ टक्के घटते. तसेच ५ ते ११ टक्के जनावरांत या रोगामुळे वंध्यत्व येते.क्षय रोगाचा प्रसार जनावरांच्या माध्यमातून मानवात होतो. त्यामुळे या रोगाच्या प्रसाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
weak animal
weak animal

जनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५ टक्के कमी होते. दूध उत्पादन १० ते १२ टक्के घटते. तसेच ५ ते ११ टक्के जनावरांत या रोगामुळे वंध्यत्व येते.क्षय रोगाचा प्रसार जनावरांच्या माध्यमातून मानवात होतो. त्यामुळे या रोगाच्या प्रसाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. 

दरवर्षी २४ मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन   साजरा केला जातो. रॉबर्ट कॉच यांनी २४ मार्च, १८८२ साली क्षयरोगासाठी कारणीभूत असणाऱ्या रोग जंतूंचा शोध लागल्याचे जाहीर केले आणि या रोगाबाबत उपचाराचा मार्ग मोकळा झाला. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारत’ करण्याचे निश्चित केले आहे.त्यासाठी सर्व प्रकारच्या खासगी, सार्वजनिक संस्थांचे साहाय्य घेण्याचे निश्चित केले आहे. तीव्र लक्षणे नसणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. तसा हा छुपा रोग आहे. निदान उशिरा होते आणि होणारे मोठे नुकसान सहज लक्षात येत नाही. क्षयबाधित व्यक्ती निदान न झाल्यामुळे, निदान न करून घेतल्यामुळे या रोगाचा फैलाव करत असतात. रोग निदानानंतरसुद्धा पुरेसे उपचार न झाल्याने,न करून घेतल्याने अनेक क्षयरोगी समाजात रोग फैलावत असतात.

  • रॉबर्ट कॉच यांनी  १८८२ मध्ये या जिवाणूचा शोध लावल्यानंतर १८९१ मध्ये या जिवाणूपासून ‘ट्यूबरक्युलिन’ अॅटिजन तयार केले आणि त्याद्वारे रोगाचे निदान व नियंत्रण सुरू झाले. अमेरिका, युरोपीय देश, रशिया येथील पशुसंवर्धन विभागाने सन १८९१ मध्ये अॅटिजन उपलब्ध झाल्यानंतर क्षयरोग निदान चाचण्या घेतल्या. ज्या गाईमध्ये सकारात्मक परिणाम दिसले त्या गाई नष्ट करून टाकल्या आणि क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यात सुरुवात केली. 
  • पाळीव प्राण्यांसह बऱ्याच प्रकारचे जंगली प्राणी हत्ती,वाघ, सिंह, हरिण, माकड,उंदीर, खार, ससे, गिनिपीग यामध्ये क्षय रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • क्षयरोग जिवाणू हा अत्यंत सूक्ष्म, हालचाल न करणारा आहे. याला जाड चरबीयुक्त  कवच असते. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील संरक्षण यंत्रणा हे जिवाणू मारू शकत नाहीत. हे जिवाणू प्राणवायूच्या सान्निध्यात वाढतात. त्यांचा वाढीचा वेग इतर जिवाणूंच्या तुलनेत खूप कमी असतो. 
  • जनावरात क्षयरोग उत्पन्न करणारे ‘मायकोबॅक्टेरियम बोवीस’ हे ४० अंश सेल्सिअस तापमानात जिवंत राहतात. शेणामध्ये पुष्कळ कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतात. तसेच सूर्यप्रकाश पोहचू न शकणाऱ्या थंड काळोख्या ठिकाणी कमीत कमी १९ ते ७४ दिवस व जास्तीत जास्त ६ ते ८ महिने जिवंत राहू शकतात. मात्र सूर्यप्रकाशात चार तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत. 
  • हा जिवाणू  नैसर्गिकदृष्ट्या शरीरातील पेशीमध्ये वाढतो, पुनरुत्पादित होतो. या जिवाणूपासून जनावरांना होणाऱ्या क्षय रोगाचे निदान आणि उपचार होऊ शकतात. हा क्षयरोग एका बाधित जनावरापासून इतर संपर्कातील जनावरे आणि मानवाला तसेच बाधित मानवापासून इतर मानवात संक्रमित होतो. रोगाचे निदान त्वरित होत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतो, उपचार करता येतो.
  • जनावरातील रोगाचा प्रसार 

  • क्षयबाधित व्यक्ती, जनावरांचा श्वास, थुंकी, शेण आणि दुधात हे जिवाणू असतात. त्यामुळे क्षयरोगी मानव किंवा जनावरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या व्यक्ती किंवा जनावरे क्षय बाधित होऊ शकतात.
  • मोठ्या, गावापासून दूर असणाऱ्या डेअरी प्रक्षेत्रावर क्षयरोगाचा प्रसार हळूहळू होतो. पण मोठ्या शहराच्या आसपास लहान जागेत मोठ्या प्रमाणात जास्त जनावरे ठेवली असतील तर या जिवाणूंचा प्रसार लवकर होतो. 
  • लक्षणे 

  • जिवाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरवातीच्या काळात जनावरांमध्ये कुठलेही लक्षणे दिसत नाही. क्षयाचा प्रादुर्भाव शरीराच्या कुठल्याही अवयवाचा होऊ शकतो. त्यानुसार लक्षणे दिसतात किंवा दिसत नाहीत. परंतु जनावराची उत्पादकता मात्र कमी होते.
  • त्वचा निस्तेज होते, चमक नाहीशी होऊन हळूहळू मलूल होते. हालचाल करण्याचा कंटाळा करते.  डोळे मात्र सतेज, पाणीदार राहतात. 
  • शरीराचे तापमान बदलत राहते. ताप असून सुद्धा जनावर खाणे बंद करत नाही, उलट भूक वाढून जादा खाते. त्यामुळे आपल्या जनावराला काही आजार झाला आहे असे वाटत नाही. 
  •  जनावर खंगत जाते, वजन कमी होते, दूध उत्पादन कमी होते. फुफ्फुसाचा संसर्ग असेल तर कमी तीव्रतेचा खोकला येतो, घशावर दाबून हात फिरवल्यानंतर खोकल्याची उबळ येते. 
  • जनावरांना धाप लागते. श्वासोच्छ्‌वास भात्याप्रमाणे सुरू होतो. नाकावाटे पिवळसर स्राव वाहतो तो वाळून त्याची पापुद्रे नाकाभोवती जमा होतात. 
  • गर्भाशयाला जिवाणूंची बाधा झाली असेल तर कोणतेही लक्षण न दाखवता जनावर गाभण राहत नाही. वारंवार उलटते, जर चुकून गाभण राहिले तर गर्भपात होतो. काही वेळा माजावर येण्याचे बंद होते. माज नसतानाही योनीतून पिवळसर स्राव वाहताना दिसतो. 
  • जनावरांच्या लसिका ग्रंथी सुजतात, फुटतात त्यातून रवाळ पू वाहतो. 
  • कासेमध्ये प्रादुर्भाव झाल्यास कास दगडी होते, दूध बंद होऊन कासेमध्ये गळू होतात व फुटतात. दूध कायमचे बंद होऊ शकते. 
  • जनावरांवर ताण आल्यास, वातावरणात बदल झाल्यानंतर मात्र या क्षयरोगाची लक्षणे तीव्र होत जातात. धूळ, अतिथंडी यामुळे फुफ्फुसाचा क्षयरोग संसर्ग असेल तर क्षयरोग जिवाणूंची वाढ होऊन फफ्फुसावर परिणाम होतो. श्वासोच्छ्‌वास करणे अवघड होते. लसिकाग्रंथींना सूज येऊन त्यांचा आकार वाढतो. त्याचा दाब निर्माण होऊन श्वास घेणे आणि सोडणे त्रासदायक होते. काही वेळेला श्वासनलिकेवर दाब येऊन पोट देखील फुगते.
  • कासेच्या बाबतीत क्षय बाधा झालेली असेल तर जनावर व्यायल्यानंतर ते दूध वासराने पिल्यास त्यांना क्षयाची बाधा होते. तसेच ते दूध न तापवता पिल्यास मानवात ही बाधा होऊ शकते.
  • माणसामध्ये प्रसार 

  • क्षय रोगाचा प्रसार जनावरांच्या माध्यमातून मानवात होतो. जनावराच्या माध्यमातून मायकोबॅक्टेरियम बोवीस या जंतूमुळे मानवास होणारा क्षयरोग धोकादायक आहे. 
  • रोगाच्या नियंत्रणासाठी दूध तापवून, उकळून, पाश्‍चराईज्ड करून वापरावे. तोंडावर कायम मास्क वापरावा. 
  • पशुपालक,पशुवैद्यक, कत्तलखान्यातील कर्मचारी, प्राणी संग्रहालयातील कर्मचारी यांनी मास्क शिवाय जनावरांची हाताळणी करू नये. 
  • पशुवैद्यकाने मृत जनावराचे शवविच्छेदन करताना लसिकाग्रथींवर विशेष लक्ष द्यावे.
  • निदान आणि उपचार 

  • जनावरांची क्षयरोग चाचणी केल्यास निदान होऊ शकते. ही चाचणी अत्यंत स्वस्त व अचूक आहे. 
  • अॅटिजन जनावरांच्या कातडीखाली टोचून त्या जागेवर झालेले परिणाम अभ्यासून जनावराला क्षयरोग बाधा झाली आहे किंवा कसे याचे निदान करता येते. टोचलेली जागा सुजली, ठणकायला लागली, त्वचा जाड व गरम झाली तर क्षयरोग झाल्याचे नक्की निदान करता येते.
  • त्वचेची जाडी चार मिलि मीटरने वाढली असेल तर सदर जनावर हे क्षयरोगी असते. सदर जाडी व्हर्नियर कॅलिपर ने मोजली जाते. चाचणीपूर्वी जंतनाशके पाजावी अन्यथा हा चाचणीचे निष्कर्ष चुकू शकतात. आजारी, नुकतेच व्यालेल्या उपचार सुरू असणाऱ्या जनावरांची सहा आठवड्यांपर्यंत चाचणी करू नये. सहा महिन्याच्या आतील वासरांची देखील चाचणी करू नये.
  • - डॉ.व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५,  (लेखक सेवानिवृत्त सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com